बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (10:36 IST)

चिकनगुनिया : लस आणि औषध उपलब्ध नसलेला हा आजार किती धोकादायक आहे?

चिकनगुनिया आजार भारतातील ज्या राज्यांमध्ये वेगानं पसरतोय किंवा ज्या राज्यात अधिक रुग्ण आहेत, त्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे आणि तेही पहिल्या क्रमांकावर. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने 'चिकनगुनिया' निश्चितच गांभीर्यानं दखल घेण्याजोगा आजार ठरतोय.
 
आधीच कोरोनानं थैमानं घातलं असताना, नाशिक आणि औरंगाबादसारख्या जिल्ह्यांमध्ये चिकनगुनियाचे काही रुग्ण आढळल्यानं चिंताही वाढलीय.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, चिकनगुनिया रोखण्यासाठी लस किंवा हा आजार झाल्यावर त्यावरील स्वतंत्र औषधं उपलब्ध नाहीत. त्यामुळे आजाराच्या विविध लक्षणांवर स्वतंत्रपणे उपचार करावे लागतात. पर्यायानं या आजाराचं गांभीर्यही वाढतं.
 
अनेकदा तर ग्रामीण भागात आपल्याला झालेला आजार चिकनगुनिया असल्याचं लक्षात न आल्यानं त्यावर उपचार घेण्यास उशीर होतो आणि हा उशीर अनेकदा जीवावर बेततो.
चिकनगुनिया आजाराचं हेच गांभीर्य ओळखून, बीबीसी मराठीनं या आजाराचा इतिहास, लक्षणं, धोका, उपाय इत्यादी सर्व बाबींचा आढावा घेतला. सुरुवात आपण इतिहासापासून करू.
 
चिकनगुनिया नाव का पडलं?
टांझानिया आणि मोझँबिक देशाच्या सीमेवरील माकोंडे पठारावर 1952 च्या सुमारास 'चिकनगुनिया'चा पहिला रुग्ण आढळल्याची नोंद आहे. पुढे 1955 मध्ये रॉबिन्सन आणि लुम्स्डेन या वैद्यकीय संशोधकांनी या रोगांचं निदान केलं.
'चिकनगुनिया' हा माकोंडे (Kimakonde) या आफ्रिकन भाषेतला शब्द आहे. या भाषेत या शब्दाचा अर्थ 'To become contorted' म्हणजे 'वाकवणारा' असा आहे. हे नाव देण्यामागचं कारण म्हणजे, या आजारात सांधे दुखून रुग्ण वाकून चालू लागतो.
 
टोगाविरिडी अल्फा व्हायरस या प्रजातीतल्या चिकव्ही (CHIKV) या विषाणूपासून चिकनगुनिया आजार होतो. हा विषाणूजन्य आजार आहे. एडीस इजिप्टी (Aedes Aegypti) या डासाच्या माध्यमातून चिकनगुनिया पसरवणारे 'चिकव्ही' विषाणूंचा प्रसार होतो.
 
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, दर चार-पाच वर्षांनी चिकनगुनियाची साथ उद्भवते, असं या आजाराच्या इतिहासाकडे पाहिल्यास लक्षात येतं.
 
चिकनगुनियाचा विषाणू सामान्यत: उष्ण प्रदेशात आढळतो. आफ्रिका आणि आशिया खंडात हा आजार अधिक प्रमाणात पसरण्याचे हे कारण मानलं जातं.
 
जगात कुठल्या देशात आणि भारतात कुठल्या राज्यात प्रसार?
डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "1960-80 दरम्यान या आजाराच्या साथी आफ्रिका आणि आशिया खंडात वरचेवर येऊ लागल्या. जगभरातील वाढते दळणवळण आणि प्रवासी वाहतुकीमुळे 2004 सालापासून आशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेतील जवळपास 60 देशात चिकनगुनियाच्या साथी येतात."
 
गेल्या काही वर्षात भारत, मालदीव, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया या देशांमध्ये चिकनगुनियाच्या साथी मोठ्या प्रमाणात आल्याचंही डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
 
जगात कुठं-कुठं चिकनगुनियाच्या साथी आल्या, ते पाहू.
 
1952 साली पहिल्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर फार तुरळक ठिकाणी काही साथी दिसल्या. मात्र, 2004-05 नंतर चिकनगुनियाच्या साथी वाढल्या.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2004 साली केनियात सर्वात मोठी साथ आली. जवळपास 5 लाख लोकांना हा आजार झाला. त्यानंतर इटली, अमेरिका खंडातील कॅरेबियन बेटं, युरोपमधील फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, तसंच ब्राझील, कोलंबिया, बोलिव्हिया या देशांमध्येही साथी आल्या.
 
भारतापुरतं मर्यादित बोलायचं झाल्यास, 2010 साली दिल्लीत चिकनगुनियाची साथ आली होती.
 
भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं NVBDCP च्या वेबसाईटवर भारतातील चिकनगुनियाच्या रुग्णांची 2015 सालापासूनची आकडेवारी प्रसिद्ध केलीय.
 
या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, कर्नाटक, गुजरात या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्याचे दिसते.
 
भारतात कोणत्या साली किती रुग्ण आढळले?
 
2015 साली 3,342 रुग्ण
2016 साली 26,364 रुग्ण
2017 साली 12,548 रुग्ण
2018 साली 9,756 रुग्ण
2019 साली 12,205 रुग्ण
2020 साली 6,263 रुग्ण
2021 च्या जुलैपर्यंत 2,764 रुग्ण
विशेष म्हणजे, या आकडेवारीत गेल्या सहा वर्षात सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये कायम आहे.
 
महाराष्ट्रात कोणत्या साली किती रुग्ण आढळले?
 
2015 साली 207 रुग्ण
2016 साली 2,949 रुग्ण
2017 साली 1,438 रुग्ण
2018 साली 1,009 रुग्ण
2019 साली 1,646 रुग्ण
2020 साली 782 रुग्ण
2021 च्या जुलैपर्यंत 757 रुग्ण
लागण कशी होते आणि लक्षणं कोणती आढळतात?
पाण्याची भरलेली पिंपं, फुलदाण्या, नारळाच्या करवंट्या, जुने टायर अशा मानवी वस्तीभोवती आढळणाऱ्या पाण्यावर चिकनगुनिया पसरवणाऱ्या एडीस इजिप्टी डासांच्या अळ्या वाढतात. मानवी वस्तीतच हे डास असल्यानं त्यांचा माणसांमधील प्रसार वेगानं वाढतो.
चिकनगुनिया पसरवणारा हा डास चावल्यानंतर साधारणपणे तीन ते सात दिवसांनी आजाराची लक्षणं दिसू लागतात. यामध्ये थंडी वाजून ताप येणं हे प्रमुख लक्षण दिसतं.
 
चिकगुनियाची लक्षणं
थंडी वाजून ताप येणं
गुडघा, घोटा दुखणं
तीव्र सांधेदुखी, तसंच सांधे सुजणं किंवा सांध्यांची हालचाल वेदनादायी होणं
डोकेदुखी
स्नायू दुखणं
अंगावर पुरळ येणं
मळमळ होणं, ओंकारी येणं
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार "या आजारात वाक येणे किंवा कमरेतून वाकलेला रुग्‍ण हे अतिशय नेहमी आढळणारे लक्षणे आहे. चिकनगुनिया आजारातून बरे होताना पुष्‍कळदा नेहमी व सतत राहणारी सांधेदुखी आढळून येते. त्‍याकरीता दीर्घकाळ वेदनाशामक उपचारांची गरज भासू शकते."
 
चिकनगुनिया आजार झाल्याचं कसं लक्षात येतं किंवा त्याचं निदान कसं केलं जातं, याबाबत डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "थंडी वाजून येणारा ताप आणि सुजलेले सांधे ही लक्षणं आढळल्यास रुग्णाची रक्तचाचणी करून निदान पक्के करता येते. यात हिमोग्रॅम, ईएसआर, सीआरपी, आयजीएम या चाचण्या महत्त्वाच्या ठरतात."
 
तसंच, खास चिकनगुनिया आजाराची ओळख पटवण्यासाठीची RTPCR चाचणीसुद्धा केली जाते, असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
 
चिकनगुनिया किती धोकादायक आहे?
डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, साथीच्या बऱ्याच कमी आजारांवर लशी किंवा औषधं उपलब्ध आहेत. कोरोनावर लस आली, मलेरियावरही काही दिवसांपूर्वी लस आली. मात्र, असं सगळ्याच साथीच्या आजारांबाबत नाही. त्यामुळे या आजारांच्या लक्षणांवर स्वतंत्ररित्या उपचार करावे लागतात.
 
चिकनगुनिया आजार साधरण 35-40 वर्षांपुढील वयोगटात अधिक आढळतो, असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
"गरोदर स्त्रियांना चिकनगुनिया आजाराची लागण झाल्यास अर्भकांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता वाढते. तसंच, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, लठ्ठ व्यक्ती किंवा 65 वर्षांवरील व्यक्तींना या आजाराची लागण झाल्यास लक्षणांची तीव्रता वाढते," असं डॉ. भोंडवे सांगतात.
 
मात्र, डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात, या आजारात मृत्यूदर अत्यंत कमी आहे. मात्र, आजार अगदी सर्वोच्च पातळीवर गेल्यास रूग्ण विकलांग होण्याची शक्यता असते.
 
तसंच, अनेकदा ग्रामीण भागात निदान नीट होत नाहीत. निदान नीट झाल्यास चिकनगुनिया बरा होण्यास किंवा प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकते, असंही डॉ. भोंडवे सांगतात.
 
काय काळजी घ्यायला हवी?
चिकनगुनियावर स्वतंत्ररित्या कुठलीही लस आणि औषधं उपलब्ध नसल्यानं प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करण्याशिवाय पर्याय नसल्याचं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात. डॉ. भोंडवेंशी चर्चेदरम्यान त्यांनी काही उपाययोजना प्रामुख्यानं सांगितल्या.
डासांची उत्पत्ती रोखणं हा सर्वात पहिला उपाय मानला जातो. चिकनगुनियाचे डास स्वच्छ पाण्यात वाढतात. त्यामुळे घरातील फुलदाण्या, टेरेस गार्डनमधील कुंड्या यांमध्ये पाणी साठू देऊ नये. तसंच, फ्रीज, एसी यांमधील पाणीही स्वच्छ करत राहावं.
 
घरात पाणी भरून ठेवलेली भांडी स्वच्छ करावीत, त्यातील पाणी वापरत राहावं.
 
घराभोवती पाणी साठू शकेल असे खड्डे ठेवू नयेत. तसंच, खिडक्यांना जाळ्या बसवून घ्याव्यात.
 
दिवसा किंवा रात्री झोपताना अंगावर पूर्ण कपडे असावेत, जेणेकरून डास चावणार नाहीत. मच्छरदाणी वापरावी
 
चिकनगुनियाची साथ असलेल्या भागात जाणं टाळावं. तसंच, लक्षणं दिसल्यास रक्ततपासणी करून घ्यावी.