शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

गर्भनिरोधक गोळ्या घेताय? सावधान

गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा उपयोग करत असाल तर सावधान. या गोळ्या तुमची हाडे ठिसूळ करू शकतात. या गोळ्यांमुळे मासिक पाळीत बदल घडतो व त्याचा परिणाम हाडांवर होऊन ते कमजोर होतात. हाडे मजबूत राखण्यासाठी महिलांना रोज चांगला व्यायाम व दूध पिणे गरजेचे आहे.

न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठ व हेलन हेज हॉस्पिटल यांच्यातर्फे संयुक्त संशोधक पथकातर्फे यासंदर्भात संशोधन करण्यात आले. त्यात ही बाब आढळली. या पथकाचे सदस्य डॉ. जेरी नीव्ज यांनी महिलांची जीवनशैली, त्यांचे खाणेपिणे व व्यायामाच्या सवयींचा अभ्यास केला. या सर्व महिलांचे सरासरी वय १८.४ होते. 

संशोधन करणाऱ्या पथकाने महिलांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले. दूध, दही, पनीर व कॅल्शियमचा समावेश असणाऱ्या भाज्यांचा वापर कोण व किती करतात याकडे लक्ष देण्यात आले. याशिवाय कॅफीन, अल्कोहोल, तंबाखू खाण्याचा काय परिणाम होतो, हेही अभ्यासण्यात आले. 

या महिलांच्या मासिक पाळी व गर्भ निरोधक गोळ्यांच्या उपयोगासंदर्भातील आकडेवारी एकत्र करण्यात आली. 

विश्लेषणानंतर गर्भ निरोधक गोळ्या घेण्यामुळे मासिक पाळीत बदल होतो व त्याचा हाडांवर परिणाम होऊन ती कमजोर होतात असे लक्षात आले. ज्या महिला दूध घेण्याचे टाळतात, त्यांची हाडे जास्त कमकुवत असल्याचे लक्षात आले.