सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 8 एप्रिल 2021 (21:11 IST)

कोरोना व्हायरस : कोव्हिड 19मुळे वाढत आहे नैराश्य, विस्मरणाचा धोका

-रेचल श्रेअर
गेल्या सहा महिन्यांत ज्या लोकांना कोव्हिड-19 ने ग्रासलं होतं, त्यांना नैराश्य (डिप्रेशन), विस्मरण (डिमेन्शिया), मानसिक आजार आणि स्ट्रोकचा त्रास होण्याची अधिक शक्यता असल्याचं संशोधकांना आढळलंय.
 
या कालावधीच्या पूर्वी कोव्हिडचा संसर्ग झालेल्यांपैकी एक तृतीयांश जणांना मानसिक किंवा मज्जासंस्थेचे विकार झाल्याचं आढळलून आलंय.
 
हॉस्पिटलमध्ये वा आयसीयूमध्ये ज्यांना अॅडमिट करावं लागलं होतं, त्यांना याचा धोका जास्त आहे.
 
व्हायरसचा मेंदूवर होणारा थेट परिणाम आणि या आजारपणाचा तणाव या दोन्हींचा मिळून अशा रुग्णांवर जास्त परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
 
युके मधल्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेतल्या पाच लाखांपेक्षा जास्त रुग्णांच्या मेडिकल रिपोर्ट्सचा अभ्यास केला.
 
कोव्हिड -19 होऊन गेलेल्या या लोकांना मानसिक वा मज्जासंस्थेचे विकार होण्याची शक्यता किती आहे, याचा अभ्यास करण्यात आला.
 
हे आहेत ते विकार
ब्रेन हॅमरेज
स्ट्रोक
पार्किन्सन
गिलीयन बॅरे सिंड्रोम
डिमेन्शिया
सायकोसिस
मूड बदलणं
अँक्झायटी (कासावीस वा व्यथित होणं)
कोव्हिड होणाऱ्यांमध्ये अँक्झायटी (Anxiety) म्हणजे कासावीस होणं आणि मूड डिसॉर्डर (Mood Disorder) म्हणजे मूड्समधले बदल होणं हे सर्वांत जास्त आढळतं. आजारपण किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागणं यामुळे येणाऱ्या तणावातून ही लक्षणं निर्माण होत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
 
याशिवाय या व्हायरसच्या शरीरावर होणाऱ्या परिणामामुळे स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात किंवा डिमेन्शिया म्हणजेच विस्मरण होण्याची शक्यता असते.
 
पण कोव्हिड-19 मुळे पार्किन्सन्स किंवा गिलियन बॅरे सिंड्रोम होण्याचा धोका वाढत नसल्याचं आढळून आलंय.
 
कारणं आणि परिणाम
रुग्णांच्या रिपोर्ट्सच्या निरीक्षणांमधून संशोधकांनी हा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना इतर त्रास झाला, तो कोव्हिडमुळेच निर्माण झाला का, हे सांगता येणार नाही. यापैकी काहींना कदाचित पुढच्या सहा महिन्यांत डिप्रेशन वा स्ट्रोकचा त्रास झाला असताच.
 
या अभ्यासासाठी कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांचा एक गट, आणि फ्लू व श्वसनाचे इतर विकार झालेल्या रुग्णांचा दुसरा गट यांमध्ये तुलना करण्यात आली.
 
कोव्हिड-19 होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये नंतर मेंदूशी संबंधित गुंतागुंत आढळण्याचं प्रमाण जास्त असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या संशोधकांना आढळलं.
 
या दोन्ही गटांची अधिक योग्यरीतीने तुलना करता यावी यासाठी या दोन्ही गटांतील व्यक्तींचं वय, लिंग, वांशिकता, आरोग्याबाबतची परिस्थिती या बाबी समान ठेवण्यात आल्या होत्या.
 
श्वसन यंत्रणेच्या इतर कोणत्याही विकारांपेक्षा कोव्हिड झालेल्या व्यक्तींना मानसिक किंवा मेंदूंचे विकार होण्याची शक्यता 16% जास्त असल्याचं, तर फ्लू झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत 44% जास्त असल्याचं यात आढळून आलं.
 
शिवाय कोव्हिडमुळे एखादी व्यक्ती जितकी जास्त गंभीर आजारी पडेल, तितकी तिला मानसिक विकार वा मेंदूचे आजार होण्याची शक्यता जास्त आढळलंय.
 
सगळ्या प्रकारच्या श्वसन विकारांमध्ये आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये मूड्स, अँक्झायटी आणि मानसिक विकारांचं प्रमाण 24% होतं, पण ज्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं त्यांच्यात हे प्रमाण 25 टक्के, ICU रुग्णांमध्ये 28 टक्के तर आजारी असताना भ्रम वा गोंधळल्यासारखं होणाऱ्यांमध्ये हे प्रमाण 36 टक्के होतं.
 
पाहणी करण्यात आलेल्या कोव्हिड रुग्णांपैकी 2 टक्के जणांना स्ट्रोक्स वा पक्षाघाताचा त्रास झाला. ICU मध्ये अॅडमिट झालेल्यांमध्ये याचं प्रमाण 7 टक्के तर भ्रम झालेल्यांमध्ये 9 टक्के होतं.
 
एकूण कोव्हिड रुग्णांपैकी 0.7% जणांना डिमेन्शियाचं निदान झालं. पण डिमेन्शियाचं निदान झालेल्यांपैकी 5 टक्के जणांमध्ये याची लक्षणं ही भ्रमाच्या स्वरूपात दिसली होती.
 
अल्झायमर्स रिसर्च युके, संस्थेच्या प्रमुख डॉ. सारा इमारिसिओ सांगतात, "आधीच्या अभ्यासांमधून हे दिसून आलंय की डिमेन्शिया असणाऱ्या लोकांना कोव्हिड-19 गंभीर स्वरूपात होण्याचा धोका जास्त आहे. याचप्रमाणे इतर आजारांशीही कोव्हिडचा संबंध आहे का, हे शोधण्याचा हा प्रयत्न होता. असं का होतं, हे शोधण्यासाठी मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे."
 
कोरोना व्हायरस मेंदूत शिरतो आणि त्यामुळे थेट नुकसान होतं, हेच यावरून सिद्ध होत असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठाचे न्यूरॉलॉजीचे प्राध्यापक मसूद हुसैन म्हणतात.
 
याशिवाय काही कोव्हिड 19चे काही अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याचंही दिसून आलंय. म्हणजे यामुळे रक्तात होणाऱ्या गुठळ्यांमुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो.
 
लंडनच्या किंग्स कॉलेजचे सायकियाट्री, सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्सच्या प्राध्यापक डेम टिल वाईक्स सांगतात, "कोव्हिड 19 हा फक्त श्वसन यंत्रणेपुरताच मर्यादित नाही अशी शंका होतीच, पण आता याचा मानसिक आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो, हे देखील सिद्ध झालंय. कोव्हिडचे दुष्परिणाम हे बऱ्याच कालावधीनंतरही दिसू शकतात हे गेल्या 6 महिन्यांत दिसून आलंय. लाँग कोव्हिडचा सामना करणाऱ्यांमध्ये हे आढळतंच."
 
"पण अपेक्षेनुसार हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावं लागणाऱ्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे, पण जे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट नव्हते, त्यांच्यावरही गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलंय," त्या सांगतात.