मास्कमुळे डोळ्यांचे विकार
कोरोनामुळे मास्क घालणे आयुष्याच भाग बनून गेले आहे. न्यू नॉर्मल असे म्हणत आपण मास्क स्वीकारले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे आवश्यक असले तरी याचे बरेच दुष्परिणाम दिसून येतात. बराच वेळ मास्क घालणार्यांहना त्वचेशी संबंधित आजार होतात. इतकेच नाही तर आता मास्कमुळे डोळ्यांशी संबंधित तक्रारी वाढू लागल्या आहेत. बराचकाळ मास्क घातल्यानंतर डोळ्यांमध्ये होणारी जळजळ ही सर्वसामान्य बाब बनून गेली आहे.चुकीच्या पद्धतीने मास्क घातल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मास्क चुकीच्या पद्धतीने घातल्यास किंवा नाक उघडे राहिल्यास उच्छ्वासावाटे बाहेर पडणारी उष्ण हवा डोळ्यात जाऊन डोळे कोरडे पडतात. यामुळे नैसर्गिक अश्रू वाळून डोळ्यांचा दाह होतो. मास्क बराच काळ घातल्यानंतर पापण्यांलगतचा जंतूसंसर्ग, बुब्बुळांचे होणारे नुकसान, मास्कवर राहिलेल्या साबणाच्या कणांमुळे डोळे खाजणे अशा समस्या घेऊनही रुग्ण येत आहेत. कोरोना महामारीच्या काळातला ताण, काळजीमुळेही डोळ्यांच्या समस्या उद्वत असल्याचेही तज्ज्ञ सांगत आहेत.
डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी मास्क नीट घाला. मास्कने फक्त तोंड झाकणे, सैल मास्क घालणे यामुळे नाकातून बाहेर पडणारी गरम हवा अगदी सहज डोळ्यांपर्यंत पोहोचते आणि त्रास सुरू होतात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळतात. चेहर्याीवर नीट बसणारे तसेच आरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेले मास्क वापरा. मास्क घालताना किंवा काढताना डोळ्यांना हात लावू नका. खाजवण्यासाठी डोळ्यांना हात लावण्याची इच्छा होऊ शकते. पण ते शक्यतो टाळा. डोळे चुरचुरत असतील तर एखादा गरमकपडा डोळ्यांवर ठेवा. यामुळे तुम्हाला बरे वाटेल. तुमचा स्क्रीन टाइमही कमी करा. सतत मोबाइल किंवा लॅपटॉपसमोर बसल्यानेही डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाकाळात डोळ्यांबाबत सजग व्हायला हवे.
महेश जोशी