रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 28 जुलै 2024 (15:51 IST)

हेपेटायटिस : लिव्हर निकामी करणारा हा आजार कशामुळे होतो आणि त्यावर उपाय काय?

आज (28 जुलै) जागतिक हेपेटायटिस दिन आहे. विषाणूमुळे होणाऱ्या या आजारामुळे दरवर्षी जगभरात लाखो लोकांचे प्राण जातात. या आजाराविषयी समजून घेऊ.
 
'हेपेटायटिस' हा यकृताचा आजार असून तो हिपॅटायटीस या विषाणूमुळे होतो. ज्यामुळे यकृताचा कर्करोग, यकृत निकामी होणे या सारख्या यकृताशी संबंधित अनेक आजार उद्भवू शकतात.
या विषाणूचे ए, बी, सी, डी, ई असे पाच प्रकार आहेत. यातील बी आणि सी हे जास्त धोकादायक आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) अंदाजानुसार दरवर्षी 13 लाख लोक या आजाराने दगावतात. म्हणजेच दर 30 सेकंतदाला एका व्यक्तीचा या हेपेटायटिसमुळे मृत्यू होतो.
हेपेटायटिसचा विळखा किती मोठा आहे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार 25.4 कोटी लोक हेपेटायटिस बी ने तर 5 कोटी लोक हेपेटायटिस सी ने ग्रस्त आहेत. तर दरवर्षी 20 लाखांहून अधिक नवीन प्रकरणांची भर यात पडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
 
हेपेटायटिस बी ने किती लोकं प्रभावित आहेत?
जागतिक आरोग्य संघटनेच्या पश्चिम पॅसिफिक क्षेत्रातील 9.7 कोटी लोक या दीर्घकाळापासून या आजाराने संक्रमित असून यात चीन, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड यांचा समावेश आहे.
 
आफ्रिकेतील 6.5 कोटी लोक या आजाराच्या विळख्यात आहेत. तर WHOच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्र ज्यात भारत, थायलँड आणि इंडोनेशियाचा समावेश आहे, तेथील 6.1 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत.
WHOनुसार दरवर्षी 2 कोटी लोक ही हेपेटायटिस-ई ने संक्रमित होतात. या संक्रमणाने 2015 साली 44 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. ही स्थिती दक्षिण आणि पूर्व आशियात सामान्यरीत्या आढळते.
 
हेपेटायटिस कसा पसरतो?
'हेपेटायटिस ए' हा विष्ठा, दूषित अन्न किंवा पाण्याने, संक्रमित व्यक्तीच्या सरळ संपर्कात आल्याने होतो.
 
हे कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांत सामान्य आहे, जिथे स्वच्छतेचा अभाव आहे. याची लक्षणेही लगेच संपतात व रुग्ण त्यातून बराही होतो. मात्र, यकृत निकामी होण्याची भीती असते.
हेपेटायटिस ए हा दुषित अन्न किंवा दूषित पाणी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात महामारीसारखा पसरतो.
 
सन 1998मध्ये चीनच्या शांघायमध्ये 3 लाख लोक याने आजारी झाले होते. त्यानंतर तेथील लोकांना 'हेपेटायटिस ए'ची लस देण्यास सुरु करण्यात आले.
 
'हेपेटायटिस बी' कसा पसरतो?
हेपेटायटिस बी संक्रमण हे जन्मादरम्यान मातेपासून नवजात शिशुला, संक्रमित मुलाच्या संपर्कात इतर मुले आल्याने, दूषित सुईद्वारे गोंदण (टॅटू) काढणे, टोचणे, संक्रमित रक्त तसेच शरीरातील द्रव पदार्थाच्या संपर्कात आल्याने (उदा. शारीरिक संबंधादरम्यान)
 
हेपेटायटिस सी आणि डी हे संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्याने पसरतात. जसे की, सुई किंवा सिरिंजचा वापर, वेगवेगळ्या रुग्णांना एकच सुई किंवा सिरिंज टोचल्याने किंवा संक्रमित रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिल्याने पसरतो.
'हेपेटायटिस बी'ची लागण असलेल्या व्यक्तींनाच 'हेपेटायटिसडी'ची लागण होऊ शकते. याचे प्रमाण जवळपास 5 टक्के असून दीर्घकाळापासून 'हेपेटायटिस बी'ची लागण असलेल्या लोकांना गंभीर संक्रमण होऊ शकते.
 
'हेपेटायटिस ई' दूषित पाणी पिल्याने, दुषित अन्नाचे सेवन केल्याने होतो. दक्षिण आणि पूर्व आशियात हे सामान्य आहे. मात्र, गर्भवती महिलांसाठी ते खूप धोकादायक ठरू शकते.
 
'हेपेटायटिस'ची लक्षणे
WHOनुसार हेपेटायटिसची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत - ताप, अशक्तपणा, भूक न लागणे, उलटी, पोटदुखी, अतिसार, गडद पिवळसर लघवी आणि विष्ठा, काविळ (त्वचा आणि डोळे पिवळसर होणे. मात्र, काही लोकांना संक्रमण असूनही त्यांच्यात अगदी कमी प्रमाणात लक्षणं आढळून येतात तर काहींमध्ये लक्षणे दिसून येत नाही.
 
WHOच्या 2022च्या आकडेवारीनुसार, जगातील 13 टक्के लोकांना क्रोनिक हेपेटायटिसबी तर 36 टक्के लोकांना हेपेटायटिस सी आजार झाला आहे. अशी व्यक्ती जी संक्रमित आहे अनवधानाने या संसर्गाची वाहक ठरू शकते.
 
त्यामुळे त्याला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी चाचणी करण्याचं आवाहन डब्ल्यूएचओ आणि डॉक्टरांकडून करण्यात आलंय.
 
हेपेटायटिस चाचणी आणि उपचार
हेपेटायटिस ए, बी आणि सी च्या चाचणीसाठी आपल्या फॅमिली डॉक्टरकडे अथवा सेक्शुअल हेल्थ क्लिनिकमध्ये जाऊन रक्ततपासणी करता येते.
 
हेपेटायटिस ए साठी कोणताही विशेष उपचार नाही. यातून लोक लवकर बरे होतात आणि या विषाणूविरोधात रोग प्रतिकारशक्तीही विकसित होत जाते.
क्रोनिक हेपेटायटिस बी आणि सी या दोन्ही विषाणूंच्या संक्रमणावर अ‍ॅन्टीव्हायरल एजंट्सच्या माध्यमातून उपचार करता येतो, जो सायरोसिस वाढण्यापासून रोखता येतो आणि त्यामुळे यकृताच्या कर्करोगाची शक्यता कमी होते.
 
हेपेटायटिस ए आणि बी रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे.
 
जन्मादरम्यान बाळाला देण्यात येणारी हिपॅटायटीस बी ची लस बाळाला आईपासून होण्याऱ्या संसर्गापासून रोखण्यास मदत करते आणि हिपॅटायटीस डी पासून संरक्षणही करते.
 
हेपेटायटिस सी साठी सध्या कुठली लस नाही तर हिपॅटायटीस ई साठीची लस सगळीकडे उपलब्ध नाहीये.
 
हेपेटायटिसपासून बचावाचे पर्याय
हेपेटायटिस ई पासून बचावासाठी प्राण्यांचे यकृत खाण्याआधी ते व्यवस्थित पूर्णपणे शिजवून घ्यावे
 
या संक्रमणापासून बचावासाठीची WHOची मार्गदर्शक तत्त्वे यानुसार आहेत -
 
जेवणाआधी तसेच शौचालयात गेल्यानंतर हाथ स्वच्छ धुवावेत
घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन व पुरवठा
समुहांमध्ये योग्य सांडपाण्याची व्यवस्था करावी
हेपेटायटिस बी, सी आणि डी पासून बचावासाठी डब्ल्यूएचओची मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे -
 
सुरक्षित लैंगिक संबंध, निरोधचा वापर, एकाहून अधिक स्त्रियांशी शारीरिक संबंध टाळून स्वत:चे संरक्षण
इंजेक्शन किंवा गोंदण (टॅटू) साठी पावरलेल्या सुईचा पुन्हा वापर करू नये
हेपेटायटिस बी साठी रक्त आणि दुषित भागाच्या संपर्कात आल्यानंतर हात स्वच्छ धुणे
प्रौढ आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी हिपॅटायटीस बी ची लस घ्यावी, कारण जन्मावेळी देण्यात येणाऱ्या लसीचा प्रभाव 20 वर्षांपर्यंत असतो
हेपेटायटिस ई पासून बचावासाठी स्वच्छता राखा व मांसाहार करतांना व्यवस्थितरित्या शिजवलेले प्राण्यांचे यकृत खावे, खासकरून पोर्क खाताना त्याचे यकृत पूर्णपणे शिजले असावे याची काळजी घ्यावी
हेपेटायटिस दूर करण्यासाठी आरोग्य अधिकारी कसे प्रयत्न करत आहेत?
 
2030 पर्यंत हेपेटायटिस बी आणि सी ग्रस्त लोकांची संख्या 90 टक्के तर या संक्रमणाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या 65 टक्क्यांपर्यंत कमी करायचे असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.
 
मात्र, हेपेटायटिस व्हायरस ने होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असल्याचेही त्यात म्हटले आहे. त्यांच्या नवीन डेटानुसार 2019 मध्ये जगभरात 11 लाखांवरुन वाढ होऊन हा आकडा 2022 मध्ये 13 लाखांवर पोहोचलाय.
Published By- Priya Dixit