मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 जुलै 2024 (11:44 IST)

लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरणारा चांदीपुरा व्हायरस काय आहे? त्याचा संसर्ग कसा होतो?

गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यात चांदीपुरा व्हायरसमुळे सहा मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
मात्र, या मुलांचा मृत्यू चांदीपुरा व्हायरसमुळेच झाला आहे का? हे जाणून घेण्यासाठी गुजरात सरकारने मुलांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत.
 
माश्यांद्वारे पसरणाऱ्या या आजाराला बळी पडलेल्या बालकाचा 24 ते 48 तासांत मृत्यू होतो.
 
डॉक्टरांच्या मते, या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण 85 टक्के इतके आहे, ज्यामधून या आजाराची तीव्रता लक्षात येते.
पावसाळ्यात दमट वातावरणामुळे माश्या, डास आणि किडींचा प्रादुर्भाव तुलनेने जास्त वाढतो. त्यामुळे संसर्गजन्य रोग ताबडतोब पसरतात.
 
चांदीपुरा व्हायरस हा असाच एक संसर्गजन्य रोग आहे.
 
जो सँडफ्लाय माशीच्या चाव्याव्दारे पसरतो.
 
गुजरातमधील अरावली आणि साबरकांठा जिल्ह्यांमध्ये आढळलेल्या पीडित बालकांच्या लक्षणांमुळे त्यांचा मृत्यू चांदीपुरा व्हायरसमुळेच झाला असावा, असं डॉक्टरांना वाटू लागलं आहे.
 
चांदीपुरा व्हायरस काय आहे; तो कसा पसरतो?
दरम्यान, गुजारातमधील मृत मुलांच्या पालकांना या आजाराची माहिती नव्हती. पण बालकांचा तब्येत बिघडल्याने त्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
 
पण शेवटी अनेकांचे प्राण वाचू शकले नाहीत.
या मुलांमध्ये चांदीपुरा व्हायरसची शक्यता व्यक्त करणारे हिंमतनगर सिव्हिल हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. आशिष जैन म्हणाले, "काही पालक मुलांना घेऊन आमच्या रुग्णालयात आले. तेव्हा त्यांना उच्च ताप, जुलाब, उलट्या झाल्याचं सांगण्यात आले. त्यानंतर 24 तासांतच मुलाला मेंदूचा झटका येऊ लागला आणि किडनी आणि हृदयावर झपाट्याने परिणाम होऊ लागला. त्यामुळे आम्ही हा आजार जपानी एन्सेफलायटीस किंवा चांदीपुरा व्हायरसचा असू शकतो, असं आम्हाला वाटतंय."
 
ते पुढे म्हणाले की, गेल्यावर्षी आमच्याकडे चांदीपुरा व्हायरसची पॉझिटिव्ह केस होती. तसेच सध्या पावसाळा आहे. या मोसमात चांदीपुरा संसर्गाची प्रकरणे दिसून येतात.
 
जूनच्या शेवटी ते ऑक्टोबरपर्यंत केसेस येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आम्ही मुलांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मंगळवार किंवा बुधवारपर्यंत (23-24 जुलै) निकाल अपेक्षित आहेत, अशी माहिती जैन यांनी दिली.
 
चांदीपुरा व्हायरसचं महाराष्ट्र कनेक्शन
महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चांदीपुरा मेंदूज्वर आहे एक व्हायरस आहे.
 
सर्वात आधी 1965मध्ये तो नागपूर परिसरातील चांदीपुरा या भागात रुग्‍णांच्‍या रक्‍तजल नमुने सर्वेक्षणात आढळून आला. त्‍यावरुन त्‍याचे नाव चांदीपुरा ठेवण्‍यात आलेले आहे.
 
चांदीपुरा आजाराच्‍या व्हायरसचा प्रसार सँडफ्लाय माशी चावल्‍यामुळे होतो.
 
सँडफ्लाय ही माशी डासापेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो. माशीचे पंख केसाळ असतात.
 
माशीचा आकार 1.5 ते 2.5 मिलीमिटर असतो. भारतातामध्‍ये सँडफ्लायच्‍या एकूण 30 प्रजाती आढळून येतात.
सँडफ्लाय या माश्या रात्रीच्या वेळी जास्‍त क्रियाशील असतात आणि त्‍यांचा चावा अत्‍यंत वेदनादायक असतो.
 
त्‍या क्‍वचितच डोळ्याने दिसतात. दिवसा सँडफ्लाय माशा घरातील अंधा-या जागा, भिंतीमधील भेगा आणि खड्डे यामध्‍ये राहतात.
 
सँडफ्लाय रात्री क्रियाशील होऊन घरातील व्‍यक्‍तीचा चावा घेतात. मादी माशीला दर 3 किंवा 4 दिवसांनी अंडी घालण्‍याकरीता रक्‍ताची आवश्‍यकता असते.
 
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हा आजार मुख्‍यतः ग्रामीण आणि आदिवासी भागात आढळतो. पण सध्या शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये देखील रुग्‍णांचे प्रमाण आढळून येत आहेत.
 
हा रोग कसा होतो आणि तो संसर्गजन्य आहे का?
या आजाराच्या प्रसाराबाबत बोलताना डॉ. आशिष जैन सांगतात, "चांदीपुरा व्हायरस सहसा मातीतल्या माश्यांद्वारे आणि कधी कधी डासांमुळे पसरतो.
 
या मातीतल्या माश्या गळक्या घरांमध्ये किंवा मातीच्या घरांच्या भेगांमध्ये आढळतात.
"सँडफ्लायचा प्रादुर्भाव सिमेंटच्या छताच्या घरांच्या भेगांमध्ये देखील आढळू शकतो. जर आजूबाजूला चिखल आणि धूळ असेल तर माशीचे प्रजनन अंधुक प्रकाश असलेल्या किंवा कमी सूर्यप्रकाश असलेल्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये देखील आढळू शकते.
 
ते पुढे म्हणाले, "हा काही साथीचा आजार नाही. जर एका मुलाला झाला तर तो दुसऱ्या मुलाला होत नाही, पण जर एखाद्या संक्रमित मुलाला चावणारी माशी सुदृढ बालकाला चावली तर त्या निरोगी बालकालाही हा संसर्ग होऊ शकतो. सध्या, विशिष्ट गावात किंवा परिसरात जास्त प्रकरणे आढळून आली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रकरणे येत आहेत."
 
डॉ. या आजाराच्या गांभीर्याबद्दल बोलताना आशिष जैन पुढे म्हणाले, "या आजाराने बाधित मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे 85 टक्के आहे. याचा अर्थ चांदीपुरा व्हायरसने बळी पडलेल्या 100 मुलांपैकी केवळ 15 मुलांनाच वाचवता येऊ शकते."
 
मातीच्या घरांमध्ये किंवा गलिच्छ भागात राहणाऱ्या 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांची प्रतिकारशक्ती इतरांच्या तुलनेत कमी असते, ज्यामुळे ते रोगाशी लढण्यास कमी सक्षम असतात.
 
या आजाराची लक्षणे काय आहेत?
उच्च दर्जाचा ताप येणं
अतिसार 
उलट्या होणं 
स्ट्रेचिंग 
निद्रानाश 
अर्ध चेतना अवस्था 
काही तासातच कोमात जाणं 
त्वचेवर वाढलेल्या खुणा 
 
या रोगाचा उपचार काय आहे?
डॉक्टरांच्या मते या व्हायरसवर सध्यातरी कोणताही विशिष्ट उपचार नाही.
 
या व्हायरसचा उपचार लक्षणांवर आधारित आहे. या आजारावर अद्याप कोणतीही लस शोधलेली नाही.
 
हिंमतनगर सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. परेश शिलादरिया बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले, "27 जून रोजी पहिल्या संशयित व्हायरसचे बाळ आमच्या रुग्णालयात आले होते. त्या मुलामध्ये फ्लूसारखी लक्षणे होती. तसेच, मुलाचा मलेरियाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे आमच्या बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांना संशय आला की यांना चंडीपुरा व्हायरसचा संसर्ग झाला असावा."
त्यामुळे मुलांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
अरवली जिल्हा मुख्य आरोग्य अधिकारी एम. ए. सिद्दीकी यांनी बीबीसी गुजराती यांना सांगितले की, "अरवली जिल्ह्यातील पहिली केस 3 जुलै रोजी दिसून आली, तर भिलोडा तालुक्यातील एका मुलाला ताप वाढल्याने त्याला सरकारी आरोग्य केंद्रात (CHC) आणण्यात आले."
 
"तेथे मुलाला अचानक अचानक त्रास वाढला. त्यामुळे उपस्थित डॉक्टरांनी मुलाला ताबडतोब हिंमतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथे 5 जुलै रोजी 48 तासांच्या आत या मुलाचा मृत्यू झाला."
 
ते पुढे म्हणाले, आतापर्यंत आमच्याकडे एकूण दोन बालकांचा मृत्यू झाला आहे, एक भिलोडा तालुक्यात आणि एक अरवली जिल्ह्यातील मेघराज तालुक्यात. आम्ही या आजारापासून बचावासाठी उपाययोजना करत आहोत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गावातील मुलांची तपासणी केली जात आहे. तसेच जंतुनाशक आणि फवारणी केली जात आहे.
 
कोणती खबरदारी घ्यावी?
घर व परिसर स्वच्छ ठेवावा.
उकरडा गावापासून दूर ठेवावा.
मच्छरदाणीत झोपावे.
पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
डास आणि माशांचा उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
या आजाराची सँडफ्लाय माशी ही वाहक आहे आणि ती उत्‍पत्‍ती स्‍थानापासून फार दूर जाऊ शकत नाही त्‍यामुळे त्‍यांचे नियंत्रण करणे सोपे आहे. सँडफ्लाय माशीचे नियंत्रण खालीलप्रमाणे करता येते.
 
गावी घर असेल तर जनावरांच्या गोठयात आणि इतर अंधार असलेल्‍या जागेवर किटकनाशकाची फवारणी करावी.
राहत्‍या घराच्‍या परिसरात चांगली स्‍वच्‍छता करावी. घरातील भिंतीच्‍या भेगा बुजविणे तसेच पाळीव प्राण्‍यांचा गोठा आणि कोंबडयांची खुराडे राहत्‍या घरापासून दूर ठेवावी.
शेणखताचे ढिगारे गावापासून दूर ठेवावेत.
गुजरात सरकारने काय म्हटलं?
आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी या आजाराबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, चांदीपुरा व्हायरल एन्सेफलायटिस या आजाराने घाबरण्याची गरज नाही, परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे. हा काही नवीन आजार नाही.
ते म्हणाले, "1965 मध्ये महाराष्ट्रात या तापाच्या लक्षणांसह सेरेब्रल फिव्हर (CHPV) ची साथ आढळून आली होती. नंतर आंध्र प्रदेश आणि गुजरातसह इतर राज्यांमध्ये ही साथ आढळून आली."
 
हा व्हायरस व्हेसिक्युलोव्हायरस कुटुंबातील आहे. या आजाराची प्रकरणे गुजरातमध्ये दरवर्षी आढळतात. विशेषतः उत्तर-मध्य गुजरातच्या जिल्ह्यांमध्ये, पावसाळ्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात हा रोग सामान्य आहे.
 
ते पुढे म्हणाले, "राज्यात आतापर्यंत चांदीपुरा व्हायरसचे 12 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे."
 
"तसेच 6 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. साबरकाठामध्ये 4, अरावलीमध्ये 3, महिसागर आणि खेडा जिल्ह्यात प्रत्येकी 1 संशयित रुग्ण आढळले आहेत."
 
"राजस्थानमधील 2 रुग्ण आणि मध्य प्रदेशातील 1 रुग्ण सध्या गुजरातमध्ये उपचार घेत आहेत. नमुन्यांच्या निकालानंतरच हे चांदीपुरा आजाराचे प्रकरण होते की नाही हे निश्चित होईल."
 
Published By- Priya Dixit