सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (18:45 IST)

रोज किती पावलं चालली तर तुम्ही फिट राहू शकता? त्यामागचं गणित माहितीये?

athlete
क्लॉडिया हॅमंड
चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. चालणे ही सुदृढ शरीराची गुरूकिल्ली आहे. ही वाक्यं अगदी माध्यमिक शाळेतल्या शारीरिक शिक्षणाच्या तासापासून कानावर पडलेली असतात. त्यामुळे इतर कुठला व्यायाम केला नाही तरी चालेल. पण दिवसातून काही वेळ तरी चालायला हवं, हे प्रत्येकालाच माहिती असतं.
 
हल्ली तर शहरी भागात सकाळी एक फेरफटका मारला तर चालणाऱ्यांची वाढलेली संख्या सहज नजरेत भरते. इतकंच नाही तर लहान मोठ्या सोसायटीमध्ये रात्रीच्या जेवणानंतर अनेकजण शतपावली करताना दिसतात.
 
आता तर एखादी व्यक्ती दररोज किती पावलं चालते, हे मोजण्यासाठीही वेगवेगळी यंत्र आली आहेत. यात स्मार्ट घड्याळी आहेत, पेडोमीटर आहेत, मोबाईलमध्ये अॅप आलेले आहेत. हे अॅप वापरणाऱ्यांच्या मोबाईलमध्ये 10,000 ही संख्या दिसली की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागतो. कारण दिवसभरात 10 हजार पावलं चालणं, हे टार्गेट मानलं गेलं आहे.
 
मात्र, पावलं मोजण्याच्या या यंत्रावरही बरीच टीका होते. शेवटी ते एक उपकरणच आहे. त्यामुळे ते अचूकच आहे, असं म्हणता येत नाही.
 
कारण एखाद्याने रोज स्प्रिंट केलं (अगदी थोडा वेळ भरधाव वेगात चालणे) आणि दुसऱ्याने हळूहळू कामं केलीत तरीदेखील स्प्रिंट करणाऱ्याचा स्कोर कमी असतो. मात्र, स्प्रिंट आणि हळू चालणे या दोघांचा फिटनेसवर होणाऱ्या परिणामात मोठा फरक असतो. असं असलं तरी पावलं मोजणारी यंत्र तुम्ही किती अॅक्टिव्ह आहात, याची एक ढोबळ कल्पना देतं.
 
तुम्ही पावलं मोजणार असाल तर किती पावलं चाललात, याला फार महत्त्व असतं. पावलं मोजणाऱ्या बऱ्याचशा यंत्रांमध्ये 10 हजार हे डिफॉल्ट टार्गेट असतं. रोजचं चालणं मोजणाऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची संख्या आहे. त्यामुळे सहाजिकच शारिरिक तंदुरुस्तीसाठी नेमकी किती पावलं चालली पाहिजे, हा आकडा शोधण्यासाठी बरंच संशोधन झालं असेल, असं तुम्हाला वाटेल. प्रत्यक्षात तसं काहीही नाही.
 
1964 च्या टोकियो ऑलिंपिकच्या काही दिवस आधी करण्यात आलेल्या एका मार्केटिंग कॅम्पेनमध्ये 10 हजार पावलं या मॅजिक फिगरचा जन्म झाला.
 
एका कंपनीने Manpo-kei नावाचं पेडोमीटर यंत्र बाजारात आणलं. यातल्या 'Man' चा अर्थ 10 हजार, 'Po' म्हणजे पावलं आणि 'kei' म्हणजे मीटर. अल्पावधीतच हे यंत्र फारच लोकप्रिय झालं आणि लोकांच्या मेंदूत 10,000 ही संख्या नोंदली गेली.
 
पाच हजार पावलं विरुद्ध दहा हजार पावलं
तेव्हापासून वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये 5 हजार पावलांचे लाभ विरुद्ध 10 हजार पावलांचे लाभ, यांची तुलना करण्यात आली. यात अर्थातच मोठी संख्या विजयी ठरली. मात्र, या दोन संख्यांच्या मधल्या आकड्यांचं काय? त्यावर अगदी आता आतापर्यंत अभ्यास झाला नव्हता. इतकंच नाही तर सर्वसामान्य प्रौढांवर अजूनही अभ्यास करण्यात आलेला नाही.
 
हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये वैद्यकीय शाखेच्या प्राध्यापिका असलेल्या आई-मिन ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्तरीच्या घरात असलेल्या 16,000 महिलांचा अभ्यास केला. चालणं आणि दीर्घायुष्य यांचा काय संबंध आहे हे तपासण्याचा संशोधकांनी प्रयत्न केला. या महिलांना आठवडाभरासाठी पावलं मोजणारं यंत्र घालायला सांगण्यात आलं होतं.
 
जवळपास 4 वर्षं 3 महिन्यांनंतर या स्त्रियांची माहिती संशोधकांनी घेतली. यातल्या 504 महिलांचा मृत्यू झाला होता. ज्या जिवंत होत्या त्या रोज किती पावलं चालल्या असतील, असं तुम्हाला वाटतं? ती 10,000 ही मॅजिक फिगर होती का?
 
खरंतर जिवंत असणाऱ्या स्त्रिया सरासरी 5,500 पावलं चालल्या होत्या. यात अभ्यासात असंही आढळलं की रोज 2,700 पावलं चालणाऱ्या महिलांपेक्षा रोज 4,000 पावलं चालणाऱ्या महिलांची जगण्याची शक्यता जास्त असते. इतका छोटा फरक आपल्या जीवन-मरणाशी संबंधित आहे, हे फारच आश्चर्यकारक होतं.
 
यावरून जेवढी जास्त पावलं चालू तेवढं दीर्घ आयुष्य मिळेल, असा निष्कर्ष तुम्ही काढणार असाल तर जरा थांबा. 7,500 पावलांपर्यंत हा निष्कर्ष बरोबर आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त चाललात तर त्याचा आणि तुमच्या दीर्घायुष्याचा काही संबंध राहात नाही.
 
या संशोधनात एक त्रुटी नक्कीच आहे. ज्या महिलांचं निधन झालं त्या आजाराने नाही तर केवळ कमी चालल्यामुळे निवर्तल्या, असं आपण म्हणू शकत नाही. संशोधकांनी या अभ्यासात केवळ त्याच महिलांना सहभागी करून घेतलं ज्या घरातून बाहेर पडून चालू शकत होत्या. मात्र, असंही अूस शकतं की यातल्या काही जणी चालण्यासाठी समर्थ होत्या. पण, कदाचित त्या फार लांब चालू शकत नसतील.
 
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर काही महिला कमी पावलं चालल्या कारण त्या आधीच आजारी होत्या आणि त्यामुळे त्या किती पावलं चालल्याने काहीच फरक पडला नाही.
 
असं असलं तरी या अभ्यासात एक बाब आढळली की या वयोगटाच्या स्त्रियांनी रोज 7,500 पावलं चालणं पुरेसं आहे. कदाचित यापेक्षा जास्त चालल्याने काही विशिष्ट आजारात मदत मिळूही शकेल.
 
ज्या स्त्रिया जास्त चालल्या त्या कदाचित आयुष्यभर सक्रिय राहिल्या आणि यामुळेच कदाचित त्यांचं आयुर्मान वाढलं असेल. हे फारच गुंतागुंतीचं आहे आणि त्यामुळेच जास्त चालण्याने आरोग्याला नेमका किती फायदा होतो, हे उलगडणं अवघड आहे.
 
छोटे छोटे लक्ष्य
रोज 10 हजार पावलं चालणं, हे मोठं लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यात रोजच अपयश येऊ लागल्यावर मात्र, आपली निराशा होते.
 
ब्रिटिश किशोरवयीन मुलांवर हा प्रयोग करण्यात आला. सुरुवातीला हे टार्गेट आपल्याला दिलं याचा 13-14 वर्षांच्या त्या शालेय मुलांना खूप आनंद झाला. मात्र, रोज हे लक्ष्य गाठणं किती अवघड आहे, हे काही दिवसांतच त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या टार्गेटविषयी कुरबुरी करायला सुरुवात केली.
 
मी माझ्या अॅपवर माझं लक्ष्य 10 हजार पावलांवरून कमी करून 9 हजार पावलांवर आणलं आणि अशा प्रकारे स्वतःवरच एक मानसशास्त्रीय प्रयोग करून बघितला. मी स्वतःचीच समजूत घालत होतो की उरलेली हजार पावलं मी मोबाईल जवळ नसताना घरातली काम करता-करता पूर्ण करेन. मात्र, यामागचं खरं कारण होतं, अधिकाधिक वेळा लक्ष्य पूर्ण करता येईल आणि त्यातून मला प्रोत्साहन मिळायचं.
 
बैठे काम करणाऱ्या व्यक्तीने लहान लक्ष्य ठेवून सुरुवात केल्यास त्याला जास्त मानसिक ताण येणार नाही.
 
मात्र, प्रत्येक पाऊल मोजल्याने आपला चालण्याचा आनंद हिरावून जात असतो. अमेरिकेतल्या ड्युक विद्यापीठातले सायकोलॉजिस्ट जॉर्डन एटकिन यांना असं आढळलं की पावलं मोजणाऱ्या व्यक्ती जास्त चालतात. मात्र, त्यांना चालण्यातला आनंद म्हणावा तितका मिळत नाही.
 
पावलं मोजल्यामुळे ते एखादं रटाळ काम केल्यासारखंच होऊन जातं. दिवसाच्या शेवटी जेव्हा अशा लोकांचं निरीक्षण करण्यात आलं तेव्हा असं आढळलं की या लोकांच्या आनंदाची पातळी पावलं न मोजता चालणाऱ्या लोकांच्या आनंदाच्या पातळीपेक्षा कमी होती.
 
अगदी तंदुरुस्त असणाऱ्या व्यक्तींसाठीदेखील पावलं मोजणं उद्दिष्टप्राप्तीतला अडथळा ठरू शकतं. त्यामुळे एकदा का 10,000 ही मॅजिक फिगर गाठली की तुम्ही थांबलं पाहिजे. आणखी फिट होण्यासाठी आणखी पावलं चालतो म्हटलं तर त्याचा उपयोग नसतो.
 
या सर्वातून काय निष्कर्ष निघतो? पावलं मोजल्याने तुम्हाला चालण्याची प्रेरणा मिळत असेल तर जरूर पावलं मोजावी. मात्र, एक गोष्ट लक्षात असू द्या 10,000 या संख्येत विशेष असं काहीच नाही. तुम्ही तुमचं उद्दिष्ट स्वतः ठरवलं पाहिजे. ते जास्तही असू शकतं किंवा कमीही असू शकतं. अगदी मी पावलं मोजणार नाही, असंही तुमचं उद्दिष्ट असू शकतं. तुमच्यासाठी काय योग्य याचा सर्वांत चांगला निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता.
 
(तुम्हाला चालण्याविषयी किंवा आरोग्याविषयी काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय म्हणून या माहितीचा वापर करू नये.)