1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (05:33 IST)

कॉफी नेमकी किती आणि केव्हा प्यावी? कॅफीनचा शरीरावर काय परिणाम होतो?

coffee
कॉफी आणि चहा जगभरात लोकप्रिय आहेत. कॉफी प्यायल्यानं नेमका फायदा होतो की तोटा याबद्दल माहितीपेक्षा गैरसमजच अधिक आहेत.
कॉफीचे शरीरावर काय परिणाम होतात, कॉफी किती प्रमाणात, कशी आणि कोणत्या वेळी प्यायली पाहिजे या मुद्द्यांची उकल करणारा हा लेख...
 
कॅफीन हा जगातील काही आवडत्या पेयांमधील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर जबरदस्त परिणाम होतो.
 
आपल्याला जर थोडसं आळसावल्यासारखं वाटत असेल तर कॅफीनमुळे आपल्यापैकी अनेकांना ताजतवानं वाटू शकतं.
 
कॅफीनचा शरीरावर कसा परिणाम होतो
आपल्या शरीरात एकाचवेळी अनेक महत्त्वाच्या क्रिया होत असतात. यामध्ये हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह आणि झोपेचं चक्र यांचा समावेश आहे. यातील बहुतांश क्रियांवर 'अ‍ॅडेनोसिन' या आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या रसायनाचा परिणाम होत असतो. या रसायनमुळंच आपल्याला थकवा येतो.
 
"अ‍ॅडेनोसिन हा आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या घटकांपैकी एक घटक असतो. तणावाखाली असलेल्या किंवा ऊर्जेची आवश्यकता असलेल्या विविध अवयवांची क्रिया या रसायनामुळं थंडावली जाते," असं अमेरिकेतील नॅशनल इस्टिट्यूट ऑफ डायबेटीस अँड डायजेस्टीव्ह अँड किडनी डिसीसेस मधील मॉलेक्युलर रेकग्निशन सेक्शनचे प्रमुख असलेल्या केनेथ जेकबसन म्हणतात.
 
आपल्या शरीरातील अनेक पेशींच्या बाह्य आवरणावर अ‍ॅडेनोसिनचे रिसेप्टर्स असतात. पेशीचं काम कमी करण्यासाठी हे रिसेप्टर्स पेशीच्या जवळ असलेल्या अ‍ॅडेनोसिनच्या बदलणाऱ्या पातळ्यांबाबत पेशीच्या आत संदेश पाठवतात. यामुळे हृदय, मूत्रपिंड, रोगप्रतिकार शक्ती आणि इतर ऊतींना झोपेसाठी किंवा आरामासाठी प्रोत्साहन मिळतं.
आपण जेव्हा कॅफीनचं सेवन करतो तेव्हा ते तात्काळ आपल्या रक्तप्रवाहात शोषलं जातं. त्यानंतर ते रिसेप्टर्स आणि अ‍ॅडेनोसिनमध्ये एकप्रकारचा अडथळा निर्माण करतं आणि परिणामी अ‍ॅडोसिन आवश्यक ते काम करू शकत नाही. त्यामुळेच कॅफीनच्या सेवनानंतर आपल्याला ताजंतवानं आणि सतर्क झाल्यासारखं वाटतं.
 
"डोपामीन आणि अ‍ॅड्रेनॅलीन सारख्या इतर न्यूरोट्रान्समीटर्सची पातळी देखील कॅफीनमुळं वाढते. त्यामुळंच तुम्हाला अधिक उत्तेजित झाल्यासारखं वाटतं," असं यूकेमधील साऊथ वेल्स विद्यापाठातील फिजिऑलॉजीचे प्राध्यापक डोमियन बेली म्हणतात.
 
"मेंदू हा एक मोठ्या स्नायूसारखा आहे. त्याला काम करावं लागतं आणि डोपामीन, अ‍ॅड्रेनॅलीन आणि कॅफीनमुळं मेंदू उत्तेजित होतो," असं बेली म्हणतात.
 
कॅफीनचे आरोग्याला असणारे फायदे
कॅफीनचा आपल्या आरोग्यावर जो परिणाम होतो त्याबाबतीत असंख्य पुरावे आहेत. विशेष करून कॉफीबाबत मोठ्या प्रमाणात पुरावे आहेत. कारण बहुतांश वेळा कॉफीद्वारेच कॅफीन आपल्या शरीरात जात असतं.
 
2017 मध्ये 200 हून अधिक स्वतंत्र अभ्यासांच्या एकत्रित निष्कर्षांचा आढावा घेतल्यानंतर असं आढळलं की दिवसभरात तीन ते चार कप कॉफी प्यायल्यामुळं आरोग्याला अपायापेक्षा फायदाच होतो. जे लोक जास्त प्रमाणात कॉफी पितात आणि धूम्रपानसुद्धा करतात त्यांच्या बाबतीत कॅफीनमुळं शरीरावर होणाऱ्या अपायाबाबत जे अभ्यास झाले आहेत, त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं.
 
हृदयाच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र अधिक सूक्ष्म स्वरुपात विचार करावा लागतो.
 
जवळपास 19,000 लोकांच्या अभ्यासातून असं आढळलं की ज्या लोकांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास होतो आहे असे लोक जर दिवसभरात दोन कपपेक्षा जास्त कॉफी पित असतील तर ह्रदयविकारामुळं त्यांचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. त्याउलट ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास नाही अशा लोकांमध्ये ही शक्यता नसते.
 
कॉफीमुळं (चहामुळं नाही) नैराश्यापासून बचाव होत असल्याचं सातत्यानं आढळलं आहे.
प्रयोगातून समोर आलेल्या पुराव्यांचा आढावा घेतल्यानंतर वैज्ञानिक म्हणतात, माफक स्वरुपात कॉफीचं सेवन केल्यास मृत्यू, उच्च रक्तदाब आणि ह्रदय बंद पडण्याचा धोका कमी होऊ शकतो. मात्र यातून ह्रदयरोगाच्या धोक्याबाबत काय होतं हे स्पष्ट झालं नाही.
 
अभ्यासातून दिसतं की कॉफीचा परिणाम आपण किती चांगला व्यायाम करतो यावर देखील होऊ शकतो. हौस म्हणून सायकल चालवणाऱ्यांवर कॉफीचा काय परिणाम होतो यावर एक अभ्यास करण्यात आला. त्यात असं दिसलं की यामुळे शारीरिक कामगिरीत 1.7 टक्क्यांपर्यत सुधारणा होऊ शकते. विविध कर्करोग, ह्रदयविकार आणि टाइप 2 मधुमेह यांचा धोका कमी होण्याशीदेखील कॅफीनचा संबंध आहे.
 
कॉफीमुळं (चहामुळं नाही) नैराश्यापासून बचाव होत असल्याचं सातत्यानं आढळलं आहे.
 
त्याचबरोबर असादेखील पुरावा आहे की कॅफीनसह अ‍ॅडेनोसिन्स अँटागोनिस्ट मेंदूचं वय वाढण्यासाठी उपयोगाचे आहेत. ते अ‍ॅडेनोसीन रिसेप्टर्सना अटकाव करतात, असं जेकबसन म्हणतात.
 
"कॅफीन आणि इतर कृत्रिम कॅफीनसारखा अधिक शक्तिशाली रेणूंचा वैद्यकीयदृष्ट्या अभ्यास करण्यात आला आहे. ते अल्झायमर्स डीमेन्शियासह न्युरोडीजनरेटीव्ह आजारांमध्ये फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे," असं ते म्हणतात.
 
किंबहुना, संशोधनातून असं दिसलं आहे की कॅफीनच्या सेवनामुळं अल्झायमर्स होण्याचा धोका 60 टक्क्यांपर्यत कमी होतो.
यामागचं कारण असं आहे की कॅफीनमुळं मेंदूला होणारा रक्तप्रवाह वाढतो. मेंदू आपल्या शरीरातील बरीचशी ऊर्जा वापरत असतो. मेंदूचं वजन आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या जवळपास 2 टक्केच असतं. मात्र मेंदू आपल्या संपूर्ण शरीरातील एक चतुर्थांशापेक्षा अधिक ऊर्जा वापरतो, असं बेली सांगतात.
 
"कॅफीनमुळं मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो ही एक चांगली बाब आहे. यामुळं डोकेदुखी देखील होऊ शकते. त्यामुळं मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठी कॅफीन धोकादायक असतं," असं ते म्हणतात.
 
जठर आणि आतड्यात असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या (gut microbes) निरोगी रचनेशीदेखील कॉफीचा संबंध आहे. यात त्यामध्ये असलेल्या बायोअ‍ॅक्टीव्ह पॉलीफिनॉल आणि अल्कलॉईड संयुगामुळं थोडी फायदा होतो. कॅफीनदेखील त्यापैकीच एक आहे. आपल्या आरोग्यासाठी जठर आणि आतड्यातील सूक्ष्मजीवांची योग्य रचना महत्त्वाची असते ही बाब चांगलीच सिद्ध झालेली आहे.
 
इथं ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की आरोग्याला कॉफीमुळं होणारे काही फायदे हे त्यामधील कॅफीनवर अवलंबून नाहीत. उदाहरणार्थ, क्लोरोजेनिक अ‍ॅसिड या कॉफीमधील अनोख्या संयुगाची कॉफीमुळं आरोग्याला होणाऱ्या फायद्यांमध्ये खासकरून मधुमेहाबाबत महत्त्वाची भूमिका असू शकते, असं कॉर्नेलिस म्हणतात.
 
"लोकसंख्येची आकडेवारी ठळकपणं दाखवते की कॉफी प्यायल्यामुळं मधुमेह कमी होतो. मात्र हेच परिणाम बहुतांश कॅफीन काढलेल्या कॉफीच्या बाबतीत देखील दिसून आले आहेत. त्यामुळं बहुधा कॅफिनशी त्याचा संबंध नाही," असं त्या म्हणतात.
 
कॅफीन असलेल्या अनेक पेयांमधील घटकांचे विविध परिणाम असू शकतात. ही बाब अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीच्या बाबतीत देखील खरी आहे.
 
उदाहरणार्थ रोस्टेड कॉफीमध्ये बायोअ‍ॅक्टीव्ह संयुगं असतात. या संयुगांचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी परिणाम असतात.
 
तर इन्स्टन्ट कॉफीमध्ये फिल्टर कॉफीच्या तुलनेत अधिक निरोगी पॉलीफिनॉल्स असतात. त्यामध्ये अधिक कार्सिनोजन अ‍ॅक्रीलअमाईड असतात, असं रॉरी सांगतात.
 
चहामध्ये फ्लेवेनॉल असतं. त्यामुळे चहामध्ये देखील याच प्रकारचे अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळले आहेत.
 
सर्व कॅफीन सारख्याच पद्धतीने काम करतं?
कॉफी ही तिच्यातील कॅफीनमुळं असणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. त्याचप्रमाणं चहामध्ये सुद्धा या प्रकारचे गुणधर्म असतात.
 
"अधिक तीव्र ब्लॅक आणि ग्रीन चहा देखील कॅफीनएवढाच प्रभावी असू शकतो," असं बेली म्हणतात.
 
फक्त कॉफी पिण्याऐवजी काही वेळा चहा प्यायल्यास त्याचे आरोग्याला संभाव्य फायदे असू शकतात.
 
कॉफी पिणाऱ्या पाच लाखांपेक्षा अधिक लोकांचा दोन दशकं अभ्यास करण्यात आला. त्यातून दिसून आलं की जे लोक फिल्टर कॉफी पितात किंवा हळूहळू फिल्टर केलेली कॉफी पितात अशा लोकांमध्ये धमनीशी संबंधित आजार होण्याचं आणि त्यामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण जे लोक कॉफी पित नाहीत किंवा फिल्टर न केलेली कॉफी पितात अशा लोकांच्या तुलनेत कमी आहे. यावरून संशोधकांनी निष्कर्ष काढला की यामागं कदाचित कॅफीन हे कारण असेल.
 
कॉफीच्या ऐवजी चहा पिण्याचे काय परिणाम होतात यासंदर्भात देखील अभ्यास करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या पहिल्या ज्ञात अभ्यासात संशोधकांना असं आढळलं की फक्त कॉफी पिण्याऐवजी काही वेळा चहा प्यायल्यामुळं आरोग्याला काही संभाव्य फायदे होतात. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की जे पुरुष त्यांच्या रोजच्या कॉफीतून एक तृतीयांश किंवा निम्म्या प्रमाणातच कॅफीन घेतात, त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका सर्वात कमी असतो. तर ज्या महिला फक्त कॉफी पितात किंवा 40 टक्क्यांपर्यत चहा पितात त्यांच्यात मृत्यूचा धोका सर्वात कमी असतो. संशोधकांनी आणखी एक बाब नोंदवली ती म्हणजे जे यापेक्षा अधिक प्रमाणात चहा पितात त्यांच्या बाबतीत मात्र मृत्यूचा धोका वाढतो.
अलीकडच्या एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीनचा वापर करण्याचा ट्रेंड आहे. कॅफीन असलेल्या पेयांमध्ये साखर आणि इतर उत्तेजक घटकांसह ग्वारानासारखे इतर घटक असतात. यामध्ये कॉफीपेक्षा चार पट अधिक कॅफीन असतं, तर ग्वारानामध्ये इतर नैसर्गिक रसायनांचं मिश्रण असतं आणि ते एकट्या कॅफीनपेक्षा अधिक उत्तेजक असू असतं.
 
20 मिनिटांनंतर रक्तप्रवाहात कॅफीनची पातळी वाढते आणि कॅफीनची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी जवळपास एक तास लागतो - डॅमियन बेली
 
अभ्यासातून दिसतं की यूके आणि अमेरिकेतील काही सर्वाधिक लोकप्रिय कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिंक्समध्ये 75 ते 160 मिलीग्रॅम कॅफीन असतं. मात्र काही एनर्जी ड्रिंक्समध्ये 500 मिलीग्रॅमपर्यत कॅफीन असतं.
 
"एनर्जी ड्रिंक्समध्ये अनेकदा व्हिटामिन बी, एल-कार्निटाइन, एल-थिअ‍ॅनीन आणि ग्लुकुरोनोलॅक्टोन सारखे उत्तेजक घटक असतात. हे सर्व घटक एकत्र आल्यावर मेंदू आणि ह्रदयासह शरीरातील अनेक बाबींवर परिणाम करू शकतात. दीर्घकाळ एनर्जी ड्रिंक्सचं सेवन केल्यामुळं हायपोटेन्शन आणि अ‍ॅरीथमिया आणि पॅनिक अटॅक्स आणि सिझर्ससारखे न्युरोलॉजिकल त्रास होऊ शकतात," असं लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधील न्युट्रीशन सायन्स एज्युकेशनचे पीएचडीचे संशोधक अ‍ॅलेक्स रुआनी म्हणतात.
 
योग्य वेळी
कार्यालयातील मीटिंगमध्ये उत्साही राहण्यासाठी किंवा जिममध्ये स्टॅमिना वाढवण्यासाठी कॅफीनचं सेवन केलं जातं. कारण त्यामुळे ताजतवानं वाटतं. मात्र दिवसातील कोणत्या वेळी कॅफीन घेतलं जातं ते महत्त्वाचं ठरतं.
 
"20 मिनिटांनंतर रक्तप्रवाहात कॅफीनची पातळी वाढते आणि कॅफीनची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी जवळपास एक तास लागतो," असं बेली म्हणतात.
 
"कॅफीनमुळं स्नायू अधिक ताकदीनं आकुंचन पावतात आणि थकवा सहन करण्याची आपली सहनशक्ती वाढते. त्यामुळे जर तुम्ही व्यायामाच्या एक तास आधी कॅफीन घेतलं तर त्यामुळं व्यायामात लक्षणीय सुधारणा होऊ शकते."
सकाळी उठल्यानंतर कॉफीचा पहिला कप पिण्यापूर्वी 90 मिनिटं ते दोन तास वाट पाहायला हवी अशी सूचना काही संशोधक करतात. त्यांनी हे सांगण्यामागचा तर्क असा आहे की सकाळी उठल्यानंतर सुरूवातीच्या काही तासांमध्ये तुमच्या शरीरातील पेशींच्या बाहेरील रिसेप्टर्सना चिकटलेलं अ‍ॅडेनोसिन हळूहळू साफ होईल. त्यामुळे कॅफीन शरीरात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र काही संशोधक या कल्पनेला प्रतिवाद करताना म्हणतात की शरीरात असंच घडतं असं दाखवून देणारे फार थोडे वैज्ञानिक पुरावे आहेत.
 
कॅफीन जठरात आणि आतड्यात गेल्यानंतर त्याचे परिणाम कमी व्हायला काही तास लागू शकतात. तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी आठ तास आणि 48 मिनिटे अगोदर शेवटची कॉफी किंवा कॅफीनजन्य पेय प्यायलं पाहिजे असं वैज्ञानिक सांगतात.
 
कॅफीनचं सेवन कधी करू नये?
युके आणि अमेरिकेतील राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार गर्भवती असताना दररोज 200 मिलीग्रॅम पर्यतच कॅफीनचं सेवन केलं पाहिजे.
 
मात्र कॅफीन सेवनाशी निगडीत 37 वेगवेगळ्या अभ्यासांचं विश्लेषण करताना 32 अभ्यासांमध्ये असं आढळून आलं की कॅफीनमुळे गर्भधारणेच्या प्रतिकूल परिणामांचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. त्यामध्ये आईला गेस्टेशनल मधुमेह किंवा प्रीक्लेम्पसिया होणं किंवा गर्भाच्या वाढीस प्रतिबंध यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. संशोधकांना आढळून आलं की दररोज कॅफीनच्या सेवनात प्रत्येक 100 मिलीग्रॅमच्या वाढ झाल्यामुळं गर्भपात आणि मृत अर्भकासाठी धोका वाढतो, तर कॅफीनच्या सेवनात दररोज 10 मिलीग्रॅमची वाढ झाल्यास जन्मदर घटतो.
 
आई जेव्हा बाळाला स्तनपान देते तेव्हा तिच्या दूधाद्वारे त्या बाळाच्या शरीरातदेखील कॅफीन जातं, असं आईसलॅंडमधील रेकजॅविक विद्यापाठीताल प्राध्यापक जॅक जेम्स म्हणतात.
 
"जरी बाळाच्या रक्तातील कॅफीनचं प्रमाण आईच्या रक्तातील कॅफीनपेक्षा कमी असलं तरी लहान बाळा कॅफीन पचवू शकत नाही ही बाब लक्षात घेणं महत्वाचं आहे," असं ते म्हणतात.
 
फक्त झोप लागण्यावरच कॅफीनचा परिणाम होतो असं नाही तर तुम्ही किती गाढ झोप घेता यावरदेखील त्याचा परिणाम होऊ शकतो.
या प्रकारे लहान मुलांना कॅफीन दिल्यास त्यांच्यात कॅफीन विथड्रॉवलची लक्षणं दिसू शकतात, असं जेम्स म्हणतात.
 
"हे ठामपणानं सिद्ध करण्यात आलं आहे की कॅफीनमुळे प्रौढांच्या झोपेत व्यत्यय येतो आणि नियमितपणे कॅफीनचं सेवन करणारे शारीरिकदृष्ट्या परावलंबी बनतात. अनेक लक्षणांमधून याचा पुरावा मिळतो," असं ते म्हणतात.
 
ते पुढे म्हणतात की कॅफीनपासून दूर राहिल्यानंतर सहा तासानंतर ही लक्षणं उद्भवू शकतात. खासकरून दररोज कॅफीनचं सेवन करणाऱ्यांमध्ये ही दिसू शकतात. या लक्षणांमध्ये डोकेदुखी आणि चिडचिड यांचा समावेश असू शकतो.
 
"लहान बाळांमधील कॅफीनच्या विथड्रॉवल लक्षणांचा थोडासा अभ्यास झालेला असला तरी आपण असं गृहीत धरू शकतो की प्रौढांनी अनुभवलेल्या परिणामांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ असू शकतात," असं ते म्हणतात.
 
कॅफीनमुळे फक्त झोप लागण्यात अडथळा निर्माण होत नाही तर तुमच्या गाढ झोपेवर सुद्धा त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो, असं रुआनी म्हणतात.
 
रोगप्रतिकारक आणि इन्फ्लेमेटरी आजारांविरुद्ध अ‍ॅडेनोसिनचा अँटी-इन्फ्लेमेटरी परिणाम होत असल्याचे दर्शविणारे पुरावे देखील आहेत.
 
"या परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर कॅफीनचं सेवन कमी करणं योग्य ठरतं," असं जेकबसन म्हणतात.
 
जास्तीत जास्त किती कॅफीनचं सेवन करावं?
यूकेमध्ये यासंदर्भात विशेष मार्गदर्शक तत्वे नाहीत. मात्र युरोपियन अन्न सुरक्षा नियमन यंत्रणा म्हणजेच ईएफएसए (EFSA)निरोगी लोकांना दररोज 400 मिलीग्रॅमपेक्षा अधिक कॅफीन न पिण्याचा आणि एकावेळी 200 मिलीग्रॅमपेक्षा अधिक कॅफीन न पिण्याचा सल्ला देते.
 
सर्वसाधारणपणे, दररोज 200 ते 300 मिलीग्रॅम कॉफी पिणं हे अजिबातच कॉफी न पिण्यापेक्षा चांगलं आहे यावर एकमत दिसतं, असं बेली म्हणतात. मात्र कोणत्याही पेयामध्ये किती प्रमाणात कॅफीन आहे हे आपल्याला माहित नसल्यास या प्रकारच्या सूचना निरर्थक ठरू शकतात. प्रत्येक पेयातील कॅफीनचं प्रमाणदेखील वेगवेगळं असतं, असंही ते पुढे म्हणतात.
 
जर आपण असं गृहीत धरलं की एक कपामध्ये 100 मिलीग्रॅम कॉफी असते. तर दररोज चार कप कॉफी प्यायल्यास ती 400 मिलीग्रॅम होते. मात्र काही वेळा चार कप कॉफीमध्ये 400 मिलीग्रॅमपेक्षा अधिक कॅफीन असू शकतं, असं बेली म्हणतात.
 
असं असण्याचं कारण म्हणजे कॉफीच्या बियांचे वेगवेगळे प्रकार. कॉफीचा प्रकार आणि त्याची तयार करण्याची पद्धत याचासुद्धा त्यामध्ये किती प्रमाणात कॅफीन आहे यावर परिणाम होऊ शकतो.
 
दररोज साधारण दोन किंवा तीन कप कॉफीच्या माफक सेवनामुळे निरोगी लोकांना कोणत्याही प्रकारचे गंभीर स्वरुपाचे आजार झालेले दिसले नाहीत, असं जेकबसन म्हणतात.
 
"जे कॉफी पुरवतात किंवा त्याचं उत्पादन करतात त्यांना हे माहित नसतं की ते तुम्हाला किती कॅफीन देत आहेत. एसप्रेसोमध्ये 250 मिलीग्रॅम ते 700 मिलीग्रॅम कॅफीन असू शकतं. तर काही एनर्जी ड्रिंक्समध्ये 500 ते 600 मिलीग्रॅम कॅफीन असू शकतं," असं ते म्हणतात.
 
त्यामुळे वेगवेगळ्या पेयांमध्ये कॅफीनचं प्रमाण सहजपणे जास्त असू शकतं. कॅफीनचं शरीरातील प्रमाण वाढेल तेव्हा ते तुम्हाला कळेल. कारण त्यानंतर तुम्हाला मळमळ, चिंता, चिडचिड आणि डोकेदुखी होऊ शकते. तुमच्या ह्रदयाचे अतिरिक्त ठोके वाढतील (premature ventricular contractions) कारण याचा ह्रदयातील पेसमेकर वर नकारात्मक परिणाम होतो, असं ते पुढे सांगतात.
 
दररोज साधारण दोन किंवा तीन कप कॉफीच्या माफक सेवनामुळे निरोगी लोकांना कोणत्याही प्रकारचे गंभीर स्वरुपाचे आजार झालेले दिसले नाहीत, असं जेकबसन म्हणतात.
 
जर लोकांना कॉफी पिणं बंद करायचं असेल तर ते काही दिवसात हळूहळू कॉपी पिणं थांबवण्याचा सल्ला देतात. जेणेकरून कोणत्याही प्रकारची विथड्रावल लक्षणं दिसू नयेत.
 
जर तुम्ही सातत्यानं जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केलंत आणि अचानक कॅफीनचं सेवन थांबवलंत तर तुम्हाला विथड्रॉवल लक्षणं दिसू शकतात. मात्र संशोधनातून असं दिसतं की दररोज 100 मिलीग्रॅम इतक्या कमी प्रमाणात कॅफीन घेतल्यास ते होऊ शकतं. ज्या प्रकारे कॅफीन घेतल्यावर उत्तेजना मिळते त्याचप्रकारच्या प्रक्रियेतून विथड्रॉवल लक्षण निर्माण होतात, असं कॉर्नेलिस म्हणतात.
 
"जे लोक खूप काळ अती प्रमाणात कॅफीनचं सेवन करतात त्यांच्या शरीरात ते सहन करण्याची क्षमता निर्माण होते. कारण त्यामुळे शरीरात अ‍ॅडेनोसिन रिसेप्टर्सचा गुणाकार होतो. जर अशा प्रकारचे रिसेप्टर्स जास्त प्रमाणात असतील तर अ‍ॅडेनोसिनसाठी कॅफीनच्या अनुपस्थितीत प्रभावी होण्याची अधिक संधी असते," असं त्या म्हणाल्या.
 
व्यक्तीपरत्वे असणारा फरक
कॅफीनच्या सेवनाशी संबंधित किमान आठ जनुकं असतात जी आपल्याला वारशानं मिळतात. यामध्ये न्यूरोलॉजिकल उत्तेजनावर परिणाम करणारे, मेंदूवर होणारे कॉफीचे सायकोअ‍ॅक्टिव्ह परिणाम, आपण किती वेगानं कॉफी पचवतो, आपण किती प्रमाणात कॉफी सहन करू शकतो आणि आपण किती आनंद घेऊ शकतो यांचा समावेश असतो, असं रुआनी म्हणतात.
 
आपण सेवन केल्यापैकी निम्मे कॅफीन पचण्यासाठी दोन तासांचा वेळ लागू शकतो. मात्र काही लोकांना यासाठी 12 तासांपेक्षाही अधिक वेळ लागू शकतो, असं कॉर्नेलिस सांगतात.
 
यातून प्रत्येकाची कॅफीन पचवण्याची वेगवेगळी क्षमता लक्षात येते.
 
कॅफीन हे एक अनोखं औषध आहे. कारण ते सहजरित्या उपलब्ध आहे
आपल्या शरीरातील CYP1A2 या एन्झाइममधील अनुवांशिक प्रकारांमुळे मुख्यत: कॅफीन पचवण्यासंदर्भातील हा फरक असतो. कॅफीन पचवण्यामध्ये या एन्झाइमची भूमिका 90 टक्क्यांपेक्षा अधिक असते, असं कॉर्नेलिस म्हणतात.
 
सर्वसाधारणपणे कॅफीन सेवनासंदर्भात लोकांची विभागणी दोन प्रकारात केली जाते. कॅफीनला प्रतिसाद देणारे आणि कॅफीनला प्रतिसाद न देणारे. तुम्ही कोणत्या प्रकारात येता हे तुम्हाला कळू शकतं. बहुतांश लोकांच्या कॉफी पिण्याच्या सवयी या त्यांच्या जनुकीय वारशाशी जुळतात. कारण आपण किती प्रमाणात कॉफी सहन करू शकतो हे आपण जाणून घेऊ शकतो. आपल्याला सहन होईल इतकी कॉफी पिणं आपल्याला जमतं, असं कॉर्नेलिस म्हणतात.
 
मात्र इथेच कॅफीनशी निगडीत आरोग्याचे फायदे अधिक गुंतागुंतीचे होतात.
 
"ज्या लोकांना कॉफी लगेच पचते त्यांना आरोग्याचे फायदे मिळवण्यासाठी अधिक प्रमाणात कॉफी प्यावी लागू शकते. कारण त्यांच्या शरीरात कॉफीचं पचन लगेच झालेलं असतं," असं कॉर्नेलिस म्हणतात.
 
कॉफी प्यायल्यामुळे किती प्रमाणात आरोग्याचे फायदे होऊ शकतात यावर सुद्धा आपल्यातील जनुकीय फरकांचा परिणाम होऊ शकतो.
 
"काही लोकांना कॅफीन असलेले पेय प्यायल्यानं उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो तर काहींना तो होत नाही. काहींना कॅफीनमुळे ह्रदयासंदर्भातील फायदे होतात तर काहींना होत नाहीत."
 
यामुळे कॉफीमुळे मिळणाऱ्या आरोग्याच्या फायद्यांचे विरोधाभासी निष्कर्ष समोर येऊ शकतात , असं त्या म्हणतात.
 
तुम्ही कॅफीनचं सेवन कसं केलं पाहिजे?
कॅफीन हे एक अनोखं औषध आहे. कारण ते सहजतेनं उपलब्ध आहे. मात्र यामुळेच ते अधिक महत्त्वाचं ठरतं. कदाचित त्यामुळेच कॉफीचं सेवन माफक स्वरुपात करणं हे अधिक कठीण आहे.
 
जर तुम्ही शांत राहू शकत नसाल किंवा चिंताग्रस्त राहत असाल किंवा तुम्हाला तणाव जाणवत असेल तर कदाचित तुम्ही कॅफीनची तुमची कमाल मर्यादा गाठली असेल. मात्र याहूनही महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला रात्री झोप न लागणं.
 
"रात्रीच्या जेवणानंतर नेहमी कॉफी पिणं टाळा आणि त्याऐवजी कॅफीन नसलेली कॉफी मागवा. मेंदूसाठी झोप खूप महत्वाची असते," असं ते म्हणतात.
 
Published By- Priya Dixit