बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (14:09 IST)

गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी कोरोनाची लस घेणं कितपत सुरक्षित?

-मयांक भागवत
भारतात 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण आजपासून (1 मे 2021) सुरू होत आहे. मात्र, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना यातून वगळण्यात आलंय. त्यांना लस कधी मिळणार? हा प्रश्ना सर्वांना पडलाय. बीबीसी मराठीनं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
 
कोव्हिड-19 व्हायरस संक्रमणाची चेन ब्रेक करण्यासाठी लसीकरण एकमेव प्रभावी पर्याय आहे. लशीमुळे घरात संसर्ग पसरण्याची शक्यता कमी झाल्याचं संशोधनातून स्पष्ट झालंय.
 
लस घेतल्याने आजाराची तीव्रता कमी होऊन, मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, असं तज्ज्ञ म्हणतात. भारतात 15 कोटीपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आलीये. 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण खुलं करण्यात आलं.
 
केंद्रांच्या सूचनेनुसार, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनी सद्यस्थितीत लस घेऊ नये. त्यामुळे या महिलांना लस देण्यात यावी, अशी मागणी करत स्त्रीरोगतज्ज्ञांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.
 
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेचं मत?
'फॉग्सी' (Federation of Obstetric and Gynecological Society of India) देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञांची सर्वात मोठी संघटना आहे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत 'फॉग्सी'ने एक पत्रक जारी केलंय.
 
त्या पत्रकात खालील मुद्दे आहेत -
 
गर्भवती महिला, स्तनदा मातांना लस देण्यात यावी. लशीची सुरक्षा त्यांनाही मिळाली पाहिजे
महिलांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असावं. स्त्रीरोगतज्ज्ञांना लस देण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून योग्य काळजी घेता येईल
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचा गर्भवती महिला आणि स्तनदा मातांवर चाचणीचा डेटा उपलब्ध नाही. पण प्राण्यांवर झालेलं संशोधन आणि शास्त्रीय माहितीनुसार, लशीचा गर्भावर किंवा जन्माला येणाऱ्या बाळावर प्रतिकुल परिणाम होत नाही
आईच्या दुधावर असलेल्या बाळावर लशीचा प्रतिकुल परिणाम होत नाही. त्यामुळे स्तनदा मातांना लस मिळाली पाहिजे.
या निर्णयाचा 50 दशलक्ष लोकांवर परिणाम होणार आहे
स्त्रीरोगतज्ज्ञांची संघटना फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. अल्पेश गांधी सांगतात, "कोरोनाची लाट येण्यापासून प्रतिबंध करायचा असेल. तर लसीकरण प्रभावी आणि दिर्घकाळ उपाय आहे. त्यामुळे गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना लशीची सुरक्षा मिळाली पाहिजे."
 
"गर्भवती महिला, स्तनदा मातांना लस दिल्यामुळे होणारे फायदे, सौम्य धोक्यांपेक्षा अधिक जास्त मोलाचे आहेत," असं डॉ. गांधी पुढे म्हणतात.
 
गर्भवती, स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत केंद्राची भूमिका?
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, "गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचा लशीच्या चाचणीत सहभाग नव्हता. त्यामुळे, गर्भवती आणि ज्यांना आपण गर्भवती आहोत का नाही. याची खात्री नसेल त्यांनी सद्य स्थितीत लस घेऊ नये. स्तनदा मातांनी सद्यपरिस्थितीत कोरोनाविरोधी लस घेऊ नये."
 
कोरोनाविरोधी लसीचे गर्भवती महिला आणि स्तनदा मातांवर प्रतिकुल परिणाम होऊ शकतात, असं केंद्राचं मत आहे. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांनी याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पत्रक जारी केलंय.
 
फॉग्सीच्या माजी अध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर सांगतात, "केंद्र सरकारला मत बदलण्यासाठी आम्ही विनंती केलीये. आमची सरकारसोबत चर्चा सुरू आहे."
 
दुसऱ्या लाटेत गर्भवती महिलांना संसर्ग जास्त?
देशभरात कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलाय. गर्भवती महिलांनाही कोरोनासंसर्गाचा मोठा फटका बसलाय.
 
"कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तूलनेत, दुसऱ्या लाटेत गर्भवती महिलांना गंभीर संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे," असं फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. गांधी सांगतात.
 
फोर्टिस रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल कुमटा सांगतात, "तज्ज्ञांच्या मते गर्भवती महिलांना लस मिळाली पाहिजे. याचं कारण संसर्गाचा धोका खूप वाढलाय."
 
स्त्रीरोगतज्ज्ञ काय म्हणतात?
डॉ. नंदिता पालशेतकर मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञांची संघटना फॉग्सीच्या माजी अध्यक्ष राहिल्या आहेत. गर्भवती महिलांसाठी लस सुरक्षित आहे का?
 
त्या म्हणतात, "भारतात उपलब्ध असलेल्या कोणत्याही लशीमुळे गर्भवती महिलांना धोका नाही. गर्भवती महिलांवर याची चाचणी न झाल्यामुळे, त्यांना देण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं होतं. पण, आता संशोधन स्पष्ट आहे."
 
भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लशी उपलब्ध आहेत.
 
मुंबईतील व्हॉकार्ड रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरूखकर सांगतात, "सामान्य व्यक्तीप्रमाणेच गर्भवती महिला आणि स्तनादा मातांना लस दिली जाऊ शकते. मधूमेहाचा त्रास असलेल्या गर्भवती महिलांना लस दिलीच पाहिजे. जेणेकरून गर्भावस्थेत संसर्ग झाला. तर आजार गंभीर होण्याची शक्यता कमी होईल."
 
लस घेतल्यानंतर दोन-तीन दिवस ताप येणं, अंगदुखी, पाय दुखणं हे साईडइफेक्ट जाणवू शकतात. त्याच्यासाठी भरपूर पाणी प्यावं. काही दिवस आराम करावा. हे केलं तर गर्भवती महिलांना काहीच त्रास होणार नाही, असं तज्ज्ञ म्हणतात.
 
स्तनदा मातांना लस फायदेशीर आहे?
महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त कोव्हिडग्रस्त महिलांची प्रसूती करण्यात आली आहे.
 
नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या डॉ. सुषमा मलिक सांगतात, "लशीचा स्तनपान करणाऱ्या महिलांवर किंवा बाळावर काहीच परिणाम होणार नाही. त्यांना याचा धोका नाही. पण यावर अजूनही फारसा अभ्यास करण्यात आलेला नाही."
 
तर स्तनपान करणाऱ्या महिलांचं समुपदेशन करणाऱ्या डॉक्टर नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "स्तनपान करणाऱ्या महिलांना लस मिळाली नाही. तर कोरोनाच्या भीतीने लस घेता येत नाही, असा विचार करून या महिला स्तनपान बंद करू शकतील. ज्याचा परिणाम बाळांवर होईल."
 
"स्तनपान करणाऱ्या महिलांना लस मिळाली तर, अन्टीबॉडीज बाळालाही मिळण्याची शक्यता आहे," असं डॉ. कुमटा म्हणतात.
 
गर्भवती महिलांना कोणती लस धोक्याची?
स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात, "गर्भवती महिलांना जिवंत पण, कमकुवत कोरोना व्हायरसपासून (Live Attenuated) बनवण्यात आलेली लस धोकादायक आहे. ही लस दिल्यास आईपासून गर्भाला संसर्ग होण्याचा धोका आहे."
 
"भारतात आणि जगभरात जिवंत, पण कमकुवत व्हायरसपासून बनवण्यात आलेली लस नाही. त्यामुळे गर्भाला धोका पोहोचण्याची शक्यता नाही," असं स्त्रीरोगतज्ज्ञांनी या पत्रकात म्हटलंय.
 
डॉ. नंदिता पालशेतकर म्हणतात, "निष्क्रिय व्हायरसपासून बनवण्यात आलेली लस गर्भवती महिलांना देण्यात काहीच हरकत नाही. त्यामुळे लस देण्यात आली पाहिजे."
 
"अमेरिकेत M-RNA लस 35 हजार गर्भवती महिलांना देण्यात आली आहे. या लशीचा तिहेरी फायदा आहे. गर्भवती महिला, गर्भ आणि जन्माला येणाऱ्या बाळाला फायदा होतो. शरीरात चांगल्या अंटीबॉडी तयार होतात," असं डॉ. नंदिता म्हणतात.
 
आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मार्गदर्शक सूचना
आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या संघटनांनी गर्भवती आणि स्तनदा मातांना लस देण्याबाबत सकारात्मक पवित्रा घेतल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
कोरोनाविरोधी लस निर्माण करणाऱ्या फायझरने फेब्रुवारी महिन्यात गर्भवती महिलांवर लशीची चाचणी सुरू केली आहे. गर्भवती महिलांना याचा काय फायदा होते, हे तपासण्यासाठी ही ट्रायल सुरू करण्यात आली आहे.
 
तर, युकेतील लसीकरणाचे मार्गदर्शक सांगतात, फायझर आणि मॉडेर्नाच्या लशीची 90 हजार महिलांवर चाचणी करण्यात आली. यात लशीचे कोणतेही प्रतिकुल परिणाम समोर आले नाहीत. त्यामुळे, गर्भवती महिलांना लस देण्यात यावी.