गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (19:25 IST)

हार्ट अटॅक, कार्डिअ‍ॅक अरेस्टची लक्षणं कशी ओळखायची? या 5 टेस्टमुळे होऊ शकते मदत

heart attack women
Author,डॉ. प्रतिभा लक्ष्मी
अलिकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
 
आजकाल तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण का वाढत आहे? यासाठी काही टेस्ट करून धोका टाळणं शक्य आहे का? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात. या लेखातून आपण याची सविस्तर माहिती घेऊ.
 
हृदयविकाराचा झटका आल्यास व्यक्तीच्या डाव्या हातापासून जबड्यापर्यंत वेदना होतात, छातीत कळ येते, घाम येऊन थकवा जाणवतो.
 
हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या धमन्यांमध्ये फॅट जमा (कॅल्शियम कमी असल्याने) झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत, रक्तवाहिन्यांमधील अडथळा वेळेवर दूर केला नाही तर शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. आणि छातीत वेदना जाणवू लागतात. यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात आणि तो जीवघेणा ठरू शकतो.
 
पण कधीकधी अॅसिडिटी किंवा गॅसेसच्या त्रासामुळे देखील आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. हाच त्रास असेल असा गैरसमज होऊन लोक या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी योग्य उपचार न मिळाल्याने लोकांना जीव गमवावा लागल्याची अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळे छातीत भले ही शंभर वेळा दुखलं तरीही डॉक्टर शंभर वेळा ईसीजी (ईसीजी) करण्याचा सल्ला देतात.
 
जेव्हा हृदयाचे ठोके सामान्य पद्धतीने पडत नाहीत तेव्हा कार्डिअॅक अरेस्ट येण्याची शक्यता असते. यामुळे काही सेकंदात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये
 
रुग्णांकडे जास्त वेळ नसतो. अशावेळी कार्डिओपल्मोनरी रेस्क्यूसिएशनमुळे जीव वाचू शकतो.
 
रक्तसंचय हे कार्डिअॅक अरेस्टचं मुख्य कारण (80-85%) आहे. त्याशिवाय हृदयविकार, भीती, सर्पदंश, पाण्यात पडणे, करंट शॉक, यांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता (1%) असते.
 
1. ईसीजी - इलेक्ट्रोकार्डियोग्राम
ईसीजी म्हणजे इलेक्ट्रो कार्डियोग्राम अर्थात हृदयालेख. ईसीजी चाचणीद्वारे आपण हृदयाच्या इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हिटीची नोंद करू करून त्याचा आलेख तयार करतो. त्यामुळे हृदयाची गतीची नियमितता व अनियमितता कळते.
 
हृदयाच्या कोणत्याही भागात सूज असेल किंवा हृदयविकाराच्या झटक्याने हृदयाच्या कोणत्याही भागाला इजा झाली असेल किंवा हृदयाच्या वरच्या थरात पाणी झालं असेल तर या गोष्टी ईसीजी मध्ये समजतात.
 
पण आपल्याला हृदयाशी संबंधित त्रास असेल तरच ईसीजी काढतात असं नाही. ईसीजीने हार्ट अॅटॅकचं निदान करायला मदत होते, पण व्यक्ती विश्रांती घेत असताना ईसीजी केल्यास ईसीजी नॉर्मल असू शकतो. पण व्यक्ती व्यायाम करत असताना त्याचा हृदयावर काय परिणाम होतो हे कळत नाही.
 
2. टीएमटी - ट्रेड मिल टेस्ट
टीएमटी चाचणी म्हणजे ट्रेड मिल टेस्ट. ही टेस्ट हृदय, त्याच्याशी संबंधित धमन्या, शिरा यांच्याशी निगडित असते. ट्रेडमिलवर आपण चालत किंवा धावत असताना ईसीजीद्वारे आपल्या हृदयाचं निरीक्षण केलं जातं.
 
थोडक्यात तुम्ही धावत असताना तुमच्या हृदयाची गती कशी असते हे तपासले जाते. हृदयाची गती वाढल्यास काही समस्या येते का किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आहे का ? हे समजण्यास मदत होते.
 
टेस्टची ठराविक वेळ पार पडल्यानंतर कोणतीही समस्या नसेल, हृदयाचे ठोके वाढले असतील, पण थकवा किंवा वेदना नसतील तर टेस्ट नॉर्मल आहे असं समजावं.
 
ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असलेल्या लोकांनाच ही टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. वयोवृद्ध लोकांमध्ये किंवा आरोग्याच्या इतर समस्या असलेल्या लोकांनी ही टेस्ट केल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
 
3. 2 डी इको
या टेस्टमधून अनेक गोष्टींचा उलगडा होतो. हृदयाचे कप्पे किती मोठे आहेत, हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत का, हृदयातील चारही झडपा योग्य प्रकारे काम करतायत का, हृदयाच्या कप्प्यात किती दाब आहे, रक्ताभिसरण सुरळीत आहे का?
 
या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या टेस्ट मधून मिळते.
 
जर हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल, तर हृदयाचा कोणता भाग नीट काम करत नाहीये हे या टेस्टमध्ये हमखास दिसून येईल.
 
ही खूप साधी टेस्ट आहे. यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. पण तुमच्या हृदयाचं नुकसान झालं असेल तरच तुम्हाला त्याची माहिती मिळते.
 
4. सीटी कोरोनरी अँजिओग्राम
या टेस्टमुळे कोणताही धोका आधीच समजू शकतो. या सीटी स्कॅनमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या चेक केल्या जातात.
 
रक्ताभिसरण सुरळीत आहे का, रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत का, त्या मोठ्या झाल्या आहेत का? याची सविस्तर माहिती या टेस्टमध्ये कळते.
 
ही टेस्ट केल्यावर रक्तवाहिन्या नीट दिसतीलच असं नाही. शिवाय ही टेस्ट करताना रेडिएशनचा धोका ही असतो. त्यामुळे वारंवार ही टेस्ट करता येत नाही.
 
5. अँजिओग्राम
या टेस्टमध्ये धमनी किंवा रक्तवाहिनीत कॅथेटर ठेवून अँजिओग्राम करतात. धमनीमध्ये डाय इंजेक्ट करून क्ष-किरणद्वारे धमनीमधील कोणत्याही अडथळ्याची तपासणी केली जाते. हृदयातून रक्त कसं वाहतं हे बघता येतं.
 
जर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स असतील तर ते लगेच कळेल. कोणत्या कोणत्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकजेस आहेत ते समजतं. त्यानुसार स्टेंटिंग किंवा हृदय शस्त्रक्रिया (CABG) केली जाते.
 
ही टेस्ट थोडी रिस्की आहे. म्हणूनच जेव्हा हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय असं वाटतं तेव्हाच ही टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
 
याशिवाय स्ट्रेस 2 डी इको, न्यूक्लियर कार्डिअ‍ॅक स्ट्रेस टेस्ट, सीसीटीए, कार्डियाक एमआरआय यासारख्या इतरही टेस्ट आहेत.
 
लोकांच्या आरोग्याच्या समस्या बघूनच त्यांना या टेस्ट सुचवल्या जातात.
 
कोणत्याही टेस्टचे काही फायदे तर काही तोटे असतात. म्हणूनच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच टेस्ट करणं महत्वाचं आहे.
 
पण नियमित व्यायाम, सकस आहार घेऊन हृदयाचं आरोग्य निरोगी ठेवता येऊ शकतं आणि आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
 
(लेखक डॉक्टर आहेत. हा लेख वाचकांच्या सामान्य आकलनासाठी आहे.)

Published By -Smita Joshi