1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2024 (12:43 IST)

दूध रोज पिणं चांगलं आहे का? दूध कोणी पिऊ नये? वाचा

milk
'आमच्या कंपनीच्या बिस्किटांमध्ये दुधाचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही ही उत्पादनं दुधासोबत घेतलीत तर तुमची मुले आणखी हुशार होतील,’ अशा जाहिराती अनेकदा आपण पाहतो.
 
भारत हा जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देशांपैकी एक आहे.
 
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये भारताने 23 कोटी लिटरपेक्षा अधिक दुधाचे उत्पादन केले आहे.
 
गाईचं दूध हे माणसांसाठी आवश्यक आणि आरोग्यदायी आहे, असा भारतीय समाजात व्यापक समज आहे.
 
रात्री एक ग्लास दूध पिणे ही अनेकांची सवय असते.
 
पण तुम्हाला माहितीये बाल्यावस्थेनंतर मनुष्याशिवाय इतर कोणताही प्राणी आयुष्यभर दूध पित नाही,
 
मग माणसं रोज दूध पिऊ शकतात का? त्यात कोणते पोषक घटक असतात? तुम्ही एका दिवसात किती दूध प्यावं? दूध कोणी पिऊ नये? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेऊया.
 
मांसाहार करणाऱ्यांना दुधाची गरज असते का?
पोषणतज्ज्ञ डॉ. अरुण कुमार यांच्यामते, दुधात कॅल्शियम आणि प्रथिने यांसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांचा समावेश असतो.
 
नवाश्मयुगात मानवामध्ये अनेक प्रकारच्या पौष्टिक कमतरता होत्या. त्या भरून काढण्यासाठी त्यांनी प्राणी पाळले आणि त्यांचं दूध प्यायला सुरुवात केली. केवळ शेती उत्पादनांवर अवलंबून राहणं अशक्य होतं. त्यामुळे मानवाला दूधाची सवय लागली. ही गोष्ट पुढे 10 हजार वर्षांपर्यंत चालू राहिली.
 
आता दूध हा आपल्या आहारतील एक गरजेचा भाग बनला आहे.
 
पण आताच्या युगातील आहाराचा विचार केला तर सगळ्यांना दुधाची गरज नसल्याचं डॉ. अरुण कुमार सांगतात.
 
“शाकाहारी लोकांनी दूध पिणे अपेक्षित आहे. पण प्रत्येकासाठी दूध किंवा दुधाचे पदार्थ पचतील, असं नाहीये. कारण दुधात लॅक्टोज असते. ते पचवण्यासाठी लॅक्टेज नावाच्या एन्झाइमची आवश्यकता असते. जर आपल्या आतड्यांमध्ये ते एन्झाइम नसेल तर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात," असं कुमार सांगतात.
 
दुधात कोणते पोषक घटक असतात?
आपण सर्वाधिक गाईचे दूध वापरतो. त्यानंतर म्हशीचे दूध वापरलं जातं.
 
कॅलरीजच्या बाबतीत, गायीच्या 100 ग्रॅम दुधात 67 कॅलरीज असतात आणि म्हशीच्या तितक्याच प्रमाणातील दुधात 117 कॅलरीज असतात.
 
म्हणूनच म्हशीचं दूध हे नियमित प्यायल्याने शरीराचं वजन वाढतं.
 
गायीच्या 100 ग्रॅम दुधात 120 मिलीग्राम कॅल्शियम असते आणि म्हशीच्या दुधात 210 मिलीग्राम कॅल्शियम असते.
 
प्रथिनांच्या बाबतीत, गायीच्या दुधात 3.2 मिलीग्रॅम आणि म्हशीच्या दुधात 4.3 मिलीग्रॅम प्रथिने असतात. पण ही प्रथिने सहज पचत नाही. म्हणूनच आपल्या पचनमार्गात लॅक्टेज एन्झाइम नसल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
 
दूध कोणी पिऊ नये?
 
आईचं दूध पिणाऱ्या बाळांच्या शरीरात लॅक्टेज एन्झाइम बऱ्यापैकी तयार होते.
 
पण इतरांनी रोज दूध प्यायल्याने माणसाच्या वाढत्या शरीरात आणि अवयवांमध्ये बदल होतात. त्यामुळे दूध हे प्रौढांसाठी नैसर्गिक पेय नाही, असे डॉ.अरुण कुमार सांगतात.
 
शिवाय, दुधामुळे थेट अपचन होऊ शकते.
 
काही लोक दिवसातून एक लिटर दूध पिऊ शकतात. पण लॅक्टोज ऍलर्जी असलेल्या लोकांनी एकावेळी अर्धा ग्लास दूध प्यायलं तर त्यांना गॅस, छातीत जळजळ आणि जुलाब होऊ शकतात. अशा समस्या असलेल्यांनी दूध टाळावं, असं कुमार सांगतात.
 
ते पुढं सांगतात, गायीच्या दुधात भरपूर पोषक घटक असतात म्हणून ते मुलांना दिल्यास त्यांचे वजन वाढतं. पण फक्त दूध पिणं चांगलं नाही. गायीचं दूध प्यायल्याने काही मुलं इतर पदार्थ खाऊ शकत नाहीत. ते खूप धोकादायक आहे. कारण गायीच्या दुधात लोहाचं प्रमाण खूप कमी असतं.
 
केवळ दुधातून लोहाची कमतरता भरून काढायची असेल तर मुलांना रोज 13 लिटर दूध प्यावं लागेल!
 
इतकं दूध पिणं मात्र शक्य नसतं. याउलट दुधातील कॅल्शियममुळे शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होतं. यामुळे ॲनिमिया होऊ शकतो, अशी भीतीही कुमार व्यक्त करतात.
एक वर्षांखालील मुलांना आईच्या दुधाशिवाय दुसरं अन्न नसतं.
 
काही मुलं चार महिन्यांपासून गायीचे दूध पितात. त्यामुळे या बाळांना प्रथिनांची ऍलर्जी आणि पोटात रक्तस्त्राव यांसारख्या समस्या निर्माण होतात.
 
काहीवेळा दुधाने त्यांना डिहायड्रेशन होऊ शकते.
 
गायीचे दूध फक्त दोन वर्षांवरील मुलांमध्ये सहज पचते.
 
आपण दररोज किती दूध पिऊ शकतो?
काही वर्षांपूर्वीच्या एका जाहिरातीमध्ये क्रिकेटर धोनीचं आवडतं पेय हे दूध असल्याचं सांगण्यात आलं होतं. तो रोज चार लिटर गायीचे दूध पिऊन सहज हेलिकॉप्टर फटके मारू शकतो, असाही यामध्ये दावा करण्यात आला हातो.
 
पण धोनीने एका मुलाखतीत यावर उत्तर देताना सांगितले की, तो दिवसभरात फक्त एक लिटर दूध पितो.
 
"प्रत्येकजण रोज धोनीसारखं दूध पिऊ शकत नाही. त्याच्या वर्कआउटसाठी ते पुरेसं आहे. पण ते इतर व्यक्तींसाठी आरोग्यदायी नाही. गरज पडल्यास तुम्ही रोज 400 मिली लिटर पुरेसं आहे," असं पोषणतज्ज्ञ धरिणी कृष्णन सांगतात.
 
आजकाल बऱ्याच कुटुंबांना आठवड्यातून दोनदा किंवा एकदाच मांस खाणे परवडतं. त्यामुळे त्यांनी दररोज दूध घेणं चांगलं आहे. पण जर वृद्ध लोकांना दुधाशी संबंधित अपचन होत असेल तर ते 400 मिली लीटर व्हे प्रोटीन घेऊ शकतात," असंही कृष्णन सांगतात.
 
साखर घालून दूध प्यावं का?
तुम्ही सकाळी 200 मिली लिटर आणि संध्याकाळी 200 मिली लिटर दूध पिऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल तर तुम्ही रोज एकूण 400 मिली लिटरपर्यंत दूध घेतल्यास काही हरकत नाही. पण साखर घालून दूध पिणे चांगलं नाही. दुधात आधीच पुरेशा कॅलरीज असतात. त्यामुळे जास्त काळ साखर घालून दूध पिणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते, असं आहारतज्ज्ञ सरवण कुमार सांगतात.
ते पुढं सांगतात, आपण दिवसातून दोन वेळा दुधात एक चमचा साखर घालून प्यायलो, तर ती 40 ग्रॅम साखर असते.
 
असं रोज केलं तर एका महिन्यात आपण फक्त दुधासोबत एक किलोपेक्षा जास्त साखर खातो. त्यामुळे साखरेशिवाय दूध पिणे हा एक चांगला मार्ग आहे.
 
"तुम्हाला अल्सर किंवा लॅक्टोज ऍलर्जी असल्यास, तुम्ही दूध पिणे टाळावे. तुम्हाला अपचनाचा त्रास असला तरीही तुम्ही दूध पिऊ नये. याशिवाय तुम्ही मांस, मटण सूप, अंडी, तूप, लोणी, शेंगदाणे आणि हिरव्या भाज्या असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खाऊ शकता, असं सरवण कुमार सांगतात.
 
A1 किंवा A2 दूध, कोणतं दूध चांगलं?
स्थानिक गायींच्या A2 प्रकारच्या दुधात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात का? विदेशी गायींचं A1 दूध रोज प्यायल्याने मधुमेह आणि इतर अनेक आजार का? असा प्रश्न डॉ अरुण कुमार यांना विचारला असता ते सांगतात,
 
“जगभरात यावर संशोधन झालंय. दुधातील काही प्रथिनांच्या संरचनेत फरक आहे आणि A1 दूध शरीरासाठी हानिकारक असल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही. 98% पाळीव गायी A2 दूध देतात. म्हशीचे दूध हे 100% A2 असते. तसंच जर्सी गायीसारख्या परदेशी गायींचं A2 दूध देतात.”
 
याबाबत पोषणतज्ज्ञ धारिणी कृष्णा सांगतात की, A1 दूध आणि A2 दुधावर कोणतीही वेगळी प्रक्रिया करण्याची गरज नाही. दुकाने आणि डेअरी फार्ममध्ये विकले जाणारे दूध उकळल्यानंतर ते पिण्यासाठी योग्य असतं.
 
Published By- Priya Dixit