गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 16 एप्रिल 2023 (10:23 IST)

Mental Health: मूड चांगला ठेवायचा आहे? मग या 4 हार्मोन्सकडे लक्ष द्यावे

आपल्यापैकी बहुतांश लोक दैनंदिन जीवनामध्ये संप्रेरकांबद्दल- म्हणजेच हार्मोन्सबद्दल विचार करत नाही. आपल्या शरीरात संप्रेरकं असतात, पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये संप्रेरकांमुळे बदल घडत असतात, हे आपल्याला माहीत असतं.
 
मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना किमान एकदा तरी 'हार्मोनल' असल्याचा आरोप सहन करावा लागलेला असतो.
 
आपल्यापैकी बहुतांश लोकांना किमान टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन यांची मानवी विकासातील भूमिका कोणती आहे याची तरी माहिती असते.
 
खरं तर आपण सर्वच 'हार्मोनल' असतो. संप्रेरकंच सगळं काही चालवत असतात- आपल्याला कधी चांगलं वाटतं, कधी त्रस्त वाटतं, कधी राग येतो, या सगळ्याचं श्रेय किंवा त्याचा दोष संप्रेरकांकडे जातो.
 
संप्रेरकं म्हणजे काय, ती कुठून येतात?
साध्या भाषेत सांगायचं तर, संप्रेरकं म्हणजे अंतःस्त्रावी संस्थेने निर्माण केलेले रासायनिक संदेशवाहक असतात. रक्तप्रवाहामध्ये संप्रेरकं निर्माण करण्याची व त्यांच्या वितरणाची जबाबदारी ज्या ग्रंथींवर व अवयांवर असते, त्यांचा समावेश अंतःस्त्रावी संस्थेमध्ये होतो.द्या.
 
आपलं शरीर संप्रेरकांद्वारे स्वतःशी संवाद साधतं. पियुषिका ग्रंथी, अवटु (थायरॉइड) ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी, अंडाशय आणि वृषण, हे सर्व या संस्थेचा भाग असतात. या व्यतिरिक्त कमी ज्ञात असेही अनेक अवयव असतात.
 
या संस्थेचा अभ्यास करणाऱ्या अंतःस्त्रावशास्त्रामध्ये अजून बऱ्याच गोष्टींचा शोध घ्यायचा आहे, आपल्या संप्रेरकांविषयी व त्यांची निर्मिती करणाऱ्या ग्रंथींविषयी बरीच माहिती प्रकाशात यायची आहे.
पण आता मी लैंगिकता व नातेसंबंध या संदर्भातील अध्यापक होण्यासाठीचं प्रशिक्षण पूर्ण करत आणलं आहे, त्यामुळे मी संप्रेरकांच्या कार्याने खूपच भारावून गेले आहे. आपल्या जीवनातील जवळपास प्रत्येक वर्तनामागे संप्रेरकांचं कार्य असतं, पण आपल्याला काय घडतंय याची जाणीव प्रत्येक वेळी असेलच असं नाही.
 
उदाहरणार्थ, तुमच्या जवळच्या व्यक्तींशी बोलत असताना तुम्हाला स्नेहाची आणि समाधानाची उर्मी उचंबळून येत असल्याचं जाणवतं का? हे कार्य ऑक्सिटॉसिन संप्रेरक पार पाडतं. त्यातून कौटुंबिक बंध बळकट करणाऱ्या वर्तनाला प्रोत्साहन मिळतं.
धावून आल्यावर तुम्हाला ऊर्जा वाढल्याचं आणि समाधानी वाटतं का? त्यामागे एन्डोमॉर्फिन संप्रेरकांचा हात असतो. अशा वेळी आपली वेदनेची जाणीव कमी होते आणि सुखाच्या भावना वृद्धिंगत होतात.
 
आपल्याला मनातून चांगलं वाटेल अशा कृती आपण करतो तेव्हा आपोआप संप्रेरकं स्त्रावण्याची वाट बघत राहण्यापेक्षा हेतूतः संप्रेरकांना उत्तेजित करणाऱ्या कृती आपण केल्या तर? आपल्या कामामध्ये, विश्रांतीच्या वेळेमध्ये आणि नातेसंबंधांमध्ये अधिक सुदृढ वर्तनसाठी प्रेरणा मिळावी, याकरता आपण असं संप्रेरकांना उत्तेजित केलं तर?
उदाहरणार्थ-तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी वाद घातलात आणि अशा वेळी तुमची अजिबात इच्छा नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीला सुमारे 20 सेकंद मिठी मारलीत, तर त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिटॉसिन संप्रेरक स्त्रवायला सुरुवात होते (शिवाय, मनस्थिती स्थिर करणारं व आनंदाचं सेरोटोनिन संप्रेरकसुद्धा स्त्रवतं).
अशा वेळी आपल्याला एकमेकांच्या जवळ आल्यासारखं वाटतं, तणाव निवळतो आणि तुम्ही सुरक्षित आहात, तुमच्यावर समोरच्या व्यक्तीचं प्रेम आहे, असं तुमच्या मेंदूला जाणवतं. अशा वेळी तुटल्यासारखा वाटणारा बंध ऑक्सिटॉसिनच्या उबदार, अस्पष्ट व बळकट नात्याने पुन्हा जोडला जातो.
 
सर्वोत्कृष्ट चौकडीशी ओळख: तुमची सर्वांत आनंद व सर्वांत प्रिय संप्रेरके!

ऑक्सिटॉसिन
ऑक्सिटॉसिन बहुतेकदा 'स्नेहबंधाचं संप्रेरक' म्हणून ओळखलं जातं. आपल्या सुरक्षित, इतरांशी जोडल्यासारखं आणि आपल्या विश्वासातील लोकांच्या निकट असल्यासारखं वाटतं, तेव्हा हे संप्रेरक स्त्रवतं.
 
(मूल जन्माला येतं, ती वेळ वगळता इतर वेळी) या संप्रेरकाचा उद्देश मानवांमधील स्नेहबंध बळकट करण्याचा असतो, त्यामुळे पालकांना त्यांच्या बालकांशी जवळीक साधता येते, कौटुंबिक रचना टिकवता येते आणि जोडीदार एकमेकांच्या जवळ यायला मदत होते.
 
नैसर्गिकरित्या हे संप्रेरक उत्तेजित करण्यासाठी:
पाळीव प्राण्याशी लाडाने खेळावं.
मित्रांशी अथवा कुटुंबाशी मायेने वागावं.
प्रशंसा करावी.
हात हातात घ्यावेत.
मसाज करावा अथवा करवून घ्यावा.
प्रिय व्यक्तींसोबत जेवण तयार करावं आणि खावं.
सेरोटोनिन
तुमच्या ओळखीत कोणाला 'सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर' (एसएसआरआय) हे औषध डॉक्टरांनी लिहून दिल्याचं तुमच्या कानावर आलंय का? निराशा घालवण्यासाठी अनेकदा हे औषध दिलं जातं. मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवणं, हा या औषधाचा उद्देश असतो.
 
सेरोटोनिन हे संप्रेरक मनस्थितीचं नियमन, समतोल झोप, आनंदवृद्धी आणि चिंता कमी करणं, यांच्याशी संबंधित आहे.
 
नैसर्गिकरित्या हे संप्रेरक उत्तेजित करण्यासाठी
थोडं उन्हात उभं राहावं.
धावायला, पोहायचा किंवा सायकल चालवायला जावं-
एरोबिक व्यायाम यासाठी सर्वांत उत्तम, कारण त्यातून ट्रिप्टोफन अधिक सहजपणे रक्तप्रवाहात स्त्रवतं. आपलं शरीर ट्रिप्टोफनचं रूपांतर सेरोटोनिनमध्ये करतं.
ध्यानधारणा करावी.
निसर्गरम्य परिसरात फिरायला जावं
डोपामाइन
हे लाभदायक रसायन आहे. स्तुती झाली, सकारात्मक निष्पत्ती झाली, विजय झाला किंवा जेवलो की सेंद्रीयरित्या या संप्रेरकाला उत्तेजना मिळते.
 
यातून आपल्या शरीराला अधिक काही मिळवण्यासाठीची प्रेरणा मिळते (अन्न व यश यांच्याबाबतीत अधिक काही मिळवण्याची प्रेरणा महत्त्वाची ठरते.
 
नैसर्गिकरित्या हे संप्रेरक उत्तेजित करण्यासाठी-
तुमचं आवडतं जेवण खावं (पण अर्थात जबाबदारीने व समतोलपणे)
दैनंदिन जीवनातील लहानसहान विजय साजरे करावेत.
स्वतःची काळजी घ्यावी.
चांगलं संगीत ऐकावं.
तुम्ही सुरू केलेलं काम किंवा प्रकल्प पूर्ण करावा.
एन्डोर्फिन
एन्डोर्फिन हे संप्रेरक नैसर्गिक वेदनाशामक आहे. वेदना हाताळण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, आणि सुख वाढवण्यासाठी त्याची मदत होते. आपण तणावामध्ये असतो किंवा वेदनेत असतो तेव्हा हे संप्रेरक स्त्रतं. शिवाय, आपण व्यायामशाळेत किंवा जेवताना घामाघूम होतो तेव्हासुद्धा एन्डोर्फिन स्त्रवतं.
 
नैसर्गिकरित्या हे संप्रेरक उत्तेजित करण्यासाठी:
व्यायाम करावा.
मित्रमैत्रिणींसोबत खिदळावं किंवा विनोदी कार्यक्रम पाहावेत/ऐकावेत.
डार्क चॉकलेट खावं.
कलात्मक दृष्टी राखावी.
लव्हेन्डर, सायट्रस, सारखी तेलं किंवा धूप, उद यांचा वापर करुन पाहावा.
आणि अर्थातच सेक्स.
तर, तुमच्या मेंदूला व शरीराला उत्तम स्थितीत असल्याचं जाणवावं, यासाठी आवश्यक संप्रेरकांना उत्तेजना देण्याकरता या काही दैनंदिन सवयी अंगी बाणवायला हरकत नाही.

Published By - Priya Dixit