"मला हा त्रास कधीपासून सुरू झाला, मला माहीत नाही. पण कधीही रात्री-अपरात्री त्रास सुरू झाला की माझे हात-पाय माझ्या नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं मला वाटायचं.”
“रात्री अचानक मला जाग यायची. जणू काय मी कुठेतरी पळून आलो आहे, टेनिस खेळून थकलो आहे, असं मला वाटायचं. प्रत्यक्षात काय घडत आहे, ते मला समजत नव्हतं.
“नंतर वाटलं, कदाचिम मी खूप जास्त कॅफीनचं सेवन करतो, त्यामुळे असं होत असेल की काय.”
हॉवर्ड टिम्बरलेक सांगत होते. हॉवर्ड हे रेस्टलेस लेग सिंड्रोमने पीडित आहेत.
हा सिंड्रोम म्हणजे एक अशी समस्या, जिचा त्रास अनेकांना होतो, पण याविषयी त्यांना फारसं माहीत नसतं.
रेस्टलेस लेग सिंड्रोम हा मज्जातंतूचा विकार आहे. यालाच विलिस-एकबॉम डिसिज असंही संबोधण्यात येतं.
जगातील दहा टक्के लोकांमध्ये या विकाराशी संबंधित समस्या आढळून येतात.
तर मग रेस्टलेस लेग सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये कोणती लक्षणे आढळतात? महत्त्वाचं म्हणजे त्यावर उपचार काय, या प्रश्नांची उत्तरे आपण पाहू.
लक्षणे काय आहेत?
“रेस्टलेस लेग सिंड्रोमची लक्षणे विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री दिसून येतात. यादरम्यान पाय प्रचंड दुखतात. पण, सुदैवाने मला दिसून आलेली लक्षणे जास्त गंभीर अशी नव्हती,” हॉवर्ड टिम्बरलेक म्हणतात.
मग, या विकारामुळे झोपेवर परिणाम होतो का?
ते सांगतात, “ज्यांना यासंदर्भात गंभीर लक्षणे जाणवतात, त्यांच्या झोपेवर नक्कीच परिणाम होईल.”
जर्मनीतील गॉटिंगेन युनिव्हर्सिटीच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक क्लॉडिया ट्रेंकवाल्डर यांनी या विकाराच्या कारणांवर संशोधन केलं.
त्यांच्या मते, “रेस्टलेस लेग सिंड्रोम हा विकार दोन कारणांमुळे जाणवतो. यामध्ये पहिलं कारण आनुवंशिक असू शकतं. म्हणजेच, तुमच्या कुटुंबातील कोणाला हा विकार असेल तर तुम्हाला तो होण्याचा धोका जास्त असतो.”
प्रा. क्लॉडिया यांनी सांगितलं, “रेस्टलेस लेग सिंड्रोमचं कारण ठरणारी 23 गुणसूत्रे संशोधकांनी आतापर्यंत शोधली आहेत. या गुणसूत्रांपैकी एक जरी गुणसूत्र शरीरात असल्यास हा विकार होण्याची शक्यता असते.
“शिवाय, कधीकधी आपण ज्या वातावरणात वाढतो त्यातूनही हा विकार उद्भवण्याची शक्यता असते,” असंही प्रा. क्लॉडिया यांनी सांगितलं.
सिंड्रोमचे प्रकार
यूकेच्या RLS धर्मादाय संस्थेत डॉक्टर म्हणून काम पाहणारे ज्यूलियन स्पिंक्स यांनाही रेस्टलेस लेग सिंड्रोमने ग्रासलं आहे.
ते सांगतात, “RLS विकाराचे दोन मुख्य प्रकार आहेत. यामधील पहिला प्रकार वयाच्या विशीदरम्यान जाणवण्यास सुरुवात होते. त्यानंतर आयुष्यभर तो कायम राहतो.
“दुसऱ्या प्रकारचा सिंड्रोम हा बहुतांश जणांमध्ये आढळतो. यामध्ये लोहाची कमतरता, मूत्रपिंडाच्या समस्या, गर्भधारणा या गोष्टींमध्ये हा आजार डोकं वर काढतो. पण कालांतराने तो कमी होत जातो,” स्पिंक्स सांगतात.
प्रसिद्ध विज्ञानविषयक नियतकालिक लॅन्सेटमध्ये रेस्टलेस लेग सिंड्रोमसंदर्भात एक संशोधन अहवाल प्रकाशित झाला होता.
या संशोधनामध्ये काम करणाऱ्यांपैकी एक असलेल्या ज्युली गोल्ड या ब्रिटनच्या डॉक्टरांमध्ये या विकाराबाबत जागरुकता निर्माण करण्यासंदर्भात काम करत आहेत.
ज्युली रेस्टलेस लेग सिंड्रोमविषयी बोलताना सांगतात, “असं वाटतं की आपल्या शरीराभोवती काहीतरी घट्ट गुंडाळलेलं आहे. त्रास वाढत जाऊन वेदना असह्य होतात. कोणताही मार्ग वापरून या समस्येतून मुक्त होण्याचा विचार आपण करू लागतो.”
उपचार काय?
स्पिंक्स म्हणतात, “या आजारापासून आराम मिळण्यासाठी झोप महत्त्वाची भूमिका बजावते.
“थंड पाण्याने अंघोळ केल्यानेही काही प्रमाणात फायदा होतो. डॉक्टर याबाबत डोपामाईनची पातळी वाढवणारी औषधे लिहून देतात. त्यानेही आराम मिळू शकतो,” असं त्या म्हणतात.
ज्युली गोल्ड म्हणाल्या, “मला जेव्हा पहिल्यांदा या विकाराचं निदान झालं, त्यावेळी मला सहा ते आठ आठवड्यांच्या औषधोपचारानंतर मला आराम मिळाला. झोपही चांगली येऊ लागली..”
शंका असल्यास काय कराल?
रेस्टलेस लेग सिंड्रोमसंदर्भात लक्षणे असल्याची शंका असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं.
स्पिंक्स म्हणाल्या, “डॉक्टरांना देखील या विकाराबद्दल कमी माहिती आहे. दुर्दैवाने, वैद्यकीय शिक्षणात त्याचा कुठेच उल्लेख नाही. जर्नल्समध्ये वाचून तुम्हाला याबद्दल माहिती मिळवावी लागते.”
डॉक्टरांना सल्ला देताना प्रा. क्लॉडिया म्हणतात, “डॉक्टरांनी सर्व शारिरीक बदल, अनुवांशिक आजारांचा धोका आदी गोष्टी तपासून निरीक्षण पूर्ण झाल्यानंतरच सिंड्रोमसंदर्भात निदान करावं.”
“रुग्णांनीही आपली लक्षणे काळजीपूर्वक पाहावीत. केवळ क्लिनिकला जायचं म्हणून जाऊ नये. लक्षणे काळजीपूर्वक डॉक्टरांना सांगावीत.
“यानंतर, डॉक्टरांना काही काळ शांत झोप लागणारी औषधे देता येऊ शकतील. या औषधानंतरही परिस्थिती न सुधारल्यास मग रेस्टलेस लेग सिंड्रोमच्या दिशेने उपचार करता येतील.”
“अनेक रुग्ण प्रकृती गंभीर होईपर्यंत डॉक्टरांकडे जात नाहीत. असं करणे चुकीचे आहे. लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा," स्पिंक्स म्हणाले.
Published By -Smita Joshi