शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (22:36 IST)

ऑफिस सिंड्रोम : ताण, कामाचे जास्तीचे तास यांमुळे होणारा हा आजार काय आहे?

sleep in office
आज बरेच तरुण ऑफिस सिंड्रोमला बळी पडत आहेत. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून काम केल्याने त्यांच्या पाठीचा कणा झिजतोय, असं चेन्नईचे ऑर्थोपेडिक सर्जन पी आर अश्विन विजय सांगतात.
 
डॉ. अश्विन विजय पुढं सांगतात की, तरुणांना ऑफिस सिंड्रोमबाबत खूपच कमी माहिती आहे. कार्यालयांनी कर्मचाऱ्यांसाठी अर्गोनॉमिक खुर्च्या आणल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांनाही ऑफिस सिंड्रोमपासून सुटका करून घ्यायची असेल तर सोप्या पद्धतीचे व्यायाम करावे लागतील.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जे लोक आठवड्यात 55 तासांपेक्षा जास्त काम करतात, त्यांचा अतिकामाने मृत्यू होण्याची शक्यता असते. याचीच सुरुवात ऑफिस सिंड्रोमपासून झाल्याचं डॉ अश्विन विजय सांगतात.
 
ऑफिस सिंड्रोम म्हणजे नेमकं काय ? त्याचा काय परिणाम होतो?
बऱ्याचदा आपण ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर तासनतास बसतो. अति काम केल्यामुळे आपल्या पाठीचा मणका दुखू लागतो त्याला 'ऑफिस सिंड्रोम' म्हणतात.
तसं बघायला गेलं तर 'ऑफिस सिंड्रोम' हा कोणता रोग नाहीये. तुमची हाडं आणि मज्जातंतू संबंधित जे रोग उद्भवणार आहेत त्याची लक्षणं 'ऑफिस सिंड्रोम'मध्ये आढळून येतात. यात पाठीचा कणा दुखणे, सांधेदुखी, स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू होतो. याला 'ऑफिस सिंड्रोम बॅक बोन अॅलर्जी' देखील म्हणतात. तरुणांमध्ये यासंबंधी जागरूकता करणं गरजेचं आहे.
 
जर याकडे दुर्लक्ष केलं तर माणूस तारुण्यात गतिहीन होतो.
 
ऑफिस सिंड्रोमची लक्षणं काय आहेत ?
काम करत असताना 8 ते 14 तास एकाच पोजिशन मध्ये बसल्याने पाठ, मान, खांदे दुखू लागतात. गुडघेदुखी, हातापायाची बोटं सुन्न पडतात. यात टेनिस एल्बोसारखे स्नायू दुखतात, डोकेदुखी, डोळे कोरडे पडतात, चक्कर येते, नैराश्य, निद्रानाश आणि तीव्र थकवा अशा गोष्टी घडतात.
 
ऑफिस सिंड्रोम होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?
तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या कामाच्या वेळा ठरवणं गरजेचं आहे. ऑफिसला जाणं आपण टाळू शकत नाही, पण कामाच्या ठिकाणी आपण स्वतःच स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
 
सर्वात आधी तुम्ही खुर्चीवर योग्य पध्दतीने बसलात का याची खात्री करा. जे लोक कम्प्युटरवर तासनतास काम करतात त्यांनी तासाभरात एकदा उठून काही मिनिटं चालावं, इकडे तिकडे फिरून पाय मोकळे करावे.
 
काही सेकंद डोळे बंद करून पडावं. त्यानंतर आपले हात आणि पाय झटकून हलकेच व्यायाम करावा.
 
काही व्यायाम खुर्चीवर बसूनही करता येतात. यामुळे तुम्हाला काही मिनिटातचं फ्रेश झाल्यासारखं वाटेल.
 
ज्यांना ऑफिसमध्ये व्यायाम करता येणं शक्य नाहीये त्यांनी कामावर जाण्याआधी 40 मिनिटं हलका व्यायाम करावा. तुम्ही योगाभ्यासातील साधे व्यायाम प्रकार जरी केले तरी तुम्हाला रोज फ्रेश वाटेल. सलग एक महिना नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला शरीरात झालेले बदल जाणवतील.
 
आपण जे काम करतो त्यातून आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळतं. पण ते काम सुरळीतपणे सुरू राहावं यासाठी आपलं मशीन म्हणजेच आपलं शरीर सुद्धा नीट काम करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे.
 
ऑफिस सिंड्रोमवर उपचार काय?
हल्लीच एक तरुण माझ्याकडे आला होता. त्याच वय 24 होतं. तो दिवसातले 14 तास काम करतो. आम्ही त्याचा एक्सरे काढून पाहिल्यावर समजलं की, त्याच्या पाठीची आणि मानेची झीज झाली होती. अशा पध्दतीची झीज 60 वयोगटातील रुग्णांमध्येच आढळून येते. हे फारच धक्कादायक होतं.
 
अवघ्या 24 व्या वर्षी अशा पद्धतीची झीज होणं चांगलं नव्हतं. मी त्याला एक महिना काम बंद करायला सांगितलं. त्याला बरं होण्यासाठी बरेच महिने लागले. जर त्याला त्याचं काम कॉम्प्युटरवरच करावं लागणार असेल तर त्याने मधेमधे ब्रेक घ्यावा असा सल्ला मी दिला. कारण फक्त उपचार करून त्याचा त्रास कमी होणार नव्हता.
 
जर उपचार करायचेच असतील तर एक्सरे, अल्ट्रासाऊंड स्कॅन किंवा ब्लड टेस्ट करून जे काही डॅमेज झालंय ते बघावं लागेल आणि मग काय तो निर्णय घ्यावा लागेल. यात त्याला व्यायाम प्रकार सांगितले जातील. आहारात कोणत्या पध्दतीचं पोषण, फळे, हिरव्या भाज्या, मांस घ्यावं याचा सल्ला दिला जाईल.
 
ज्यांना ऑफिस सिंड्रोमचा त्रास सुरू आहे, त्यांना विश्रांती आणि व्यायामामुळे आराम मिळू शकतो. पण ज्यांनी आयुष्यभर आवश्यक असे उपचारचं केलेले नाहीत, त्यांना शस्त्रक्रिया करावी लागू शकते.