सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (13:14 IST)

अल्झायमर : समज आणि गैरसमज

अल्‍झायमर म्हणजे विस्मरण. या व्याधीबाबत बरेच गैरसमज आहते. तसंच यासंबंधी फारशी जागरूकताही नाही. मुळात अल्झायमर समजून घेणं गरजेचं आहे. अल्झायमर हा डिमेन्शियाचा सर्वसाधारणपणे आढळणारा प्रकार आहे. यात मेंदूतल्या पेशी हळूहळू नष्ट होत जातात. आजघडीला भारतात अल्झायमरचे चार दशलक्ष रुग्ण आहेत. 2030पर्यंत ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अल्झायमरच्या रुग्णांना विस्मरण होऊ लागतं. यामुळे त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होतो. मात्र या व्याधीबाबत काही गैरसमजही प्रचलित आहेत. हे गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. 
 
अल्झायमरचं निदान झालं की सगळं काही संपलं, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र या विकाराचं निदान झाल्यानंतरही रुग्ण पुढची बरीच वर्षं निरोगी आयुष्य जगू शकतो. काही प्रसंगी औषधांमुळे या विकाराच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवता येतं. यासोबतच पोषक आहार घेणं, लोकांमध्ये मिसळणं, मेंदूला चालना देणार्‍या गोष्टी करणं, व्यायाम करणं, शारीरिक हालचाल करणं यामुळे ही व्याधी बळावण्याची प्रक्रिया मंदावते.
 
सत्तरीच्या पुढे अल्झमायर होतो असाही एक समज आहे. पण जीवनशैलीतले बदल, आहाराच्या चुकीच्या सवयी अशा कारणांमुळे तिशीतही हा विकार जडू लागला आहे. अल्झायमर कोणत्याही वयाच्या आणि लिंगाच्या व्यक्तीला होऊ शकतो. बैठी जीवनशैली आणि ताण या बाबी अल्झायमरला कारणीभूत ठरतात.
 
ज्येष्ठांना विस्मरण होतंच असंही अनेकांना वाटतं. ही अत्यंत सर्वसाधारण बाब मानली जाते. एखाद्या प्रसंगी विस्मरण होणं समजू शकतं. पण सातत्याने गोष्टी विसरल्या जात असतील तर हे अल्झायमरचं लक्षणं असू शकतं. विस्मरण इतर काही विकारांचं लक्षण असू शकतं. लक्षणांचं वेळेत निदान झालं तर विस्मरणाचा धोका टळू शकतो.
 
अल्झायमर हा अनुवंशिक आजार असल्याचाही समज आहे. अनुवंशिक कारणांमुळे डिमेन्शिया होऊ शकतो. पण याचं प्रमाण बरंच कमी आहे. अल्झायमरचं जनुक पालकांकडून मुलांकडे जाऊ शकतं. त्यामुळे पालकांना अल्झायमर असेल तर मुलांनाही जडू शकतो. पण अल्झायमर झालेल्या पालकांच्या मुलांना ही व्याधी जडेलच असं नाही. अनेक कारणांमुळे या व्याधीला प्रतिबंध घालता येऊ शकतो. जीवनशैलीतले सकारात्मक बदल, नियमित व्यायाम, पोषक आहार यामुळे अल्झायमरला आळा घालता येतो.  
 
पंकजा देव