गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (22:07 IST)

Nipah Virus : निपाह व्हायरस संसर्गाची लक्षणं काय? हा व्हायरस कसा पसरतो?

Nipah Virus:केरळच्या कोळिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे.
तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम केरळला रवाना करण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे.
 
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केरळ सरकारला सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं आहे.
 
दरम्यान आणखी चार संशयितांचे नमुने तापसणीसाठी पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत.
 
केरळ सरकारनं तातडीनं कोळिकोडमध्ये कंट्रोलरूम सुरू केली आहे. तसंच लोकांना मास्क वापरण्याचं आवाहन देखील केलं आहे.
 
काय आहे निपाह व्हायरस?
पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (NIV) शास्त्रज्ञांना वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये 'निपाह' व्हायरस आढळून आलाय. NIV च्या संशोधकांनी 'जर्नल ऑफ इन्फेक्शन आणि पब्लिक हेल्थ' मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
वटवाघुळांवर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड म्हणतात, "निपाह व्हायरसचे धोकादायक प्रकार प्रामुख्याने मलेशियातील वटवाघुळांमध्ये आढळून येतात. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेणं गरजेचं आहे."
वटवाघुळांपासून पसरणाऱ्या 'निपाह' व्हायरस संसर्गामुळे 2018 मध्ये केरळात 18 लोकांचा मृत्यू झाला होता. भारतात आतापर्यंत चार वेळा 'निपाह' व्हायरसचा उद्रेक झाल्याची माहिती NIV ने दिलीये.
 
डॉ. महेश गायकवाड पुढे सांगतात, "हेनिपाव्हायरस मलेशियातील टेरोपस व्हॅमपायरस प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये सापडतो. ही प्रजाती भारतात सापडत नाही."
 
तर, भारतात पहिल्यांदाच R. lechenaulitti प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये 'निपाह' व्हायरस सापडला असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.
 
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. राहुल तांबे म्हणतात, "NIV च्या शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचं संशोधन केलंय. आजार पसरू नयेत यासाठी अशा प्रकारची संशोधनं फार महत्त्वाची आहेत."
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या 10 प्रमुख जीवघेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरसचा समावेश आहे.
तज्ज्ञ सांगतात, 'निपाह' व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता 40 ते 70 टक्के असल्याचं आढळून आलंय. WHO च्या माहितीनुसार, निपाह एक झूनॉटिक (zoonotic) व्हायरसचा प्रकार आहे.
 
याचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र, काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांमध्ये गंभीर स्वरूपाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
 
'निपाह' व्हायरस पसरण्याची कारणं?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,
 
'निपाह' व्हायरसचा संसर्ग वटवाघूळं आणि डुकरांपासून माणसांना होतो.
एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते.
फ्रूट बॅट्स म्हणजे फळं खाणारी वटवाघूळं 'निपाह' व्हायरसचे नैसर्गिक वाहक असतात.
वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड सांगतात, "निपाह व्हायरस वटवाघुळांच्या लाळेमध्ये असतो. वटवाघुळांनी खालेल्ली उष्टी फळं माणसांनी खाल्ली, तर, व्हायरस आपल्या शरीरात जातो. त्यामुळे झाडाखाली पडलेली उष्टी फळं खाऊन नयेत."
 
तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, वटवाघूळांची लघवी किंवा लाळेने दुषित झालेली फळं किंवा फळांचे पदार्थ खाल्याने निपाह व्हायरसचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता असते.
 
'निपाह' संसर्गाची लक्षणं काय?
नानावटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. राहुल तांबे सांगतात, "ताप, डोकेदुखी, कफ, घसादुखी आणि श्वास घेण्यात अडथळा ही निपाह संसर्गाची लक्षणं आहेत."
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया आणि मेंदूला सूज येण्याची शक्यता असते.
 
निपाहचा विषाणू शरीरात गेल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी 4 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. RT-PCR टेस्ट करून निपाह व्हायरस संसर्गाचं निदान करण्यात येतं.
 
'निपाह' व्हायरसवर लस उपलब्ध आहे?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'निपाह' व्हायरसवर सद्यस्थितीत कोणतीही ठोस उपचार पद्धत किंवा लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 'निपाह' व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर सपोर्टिव्ह केअरच्या मदतीने उपचार केले जातात.
 
भारतात 'निपाह'चा उद्रेक कुठे झाला?
NIV च्या माहितीनुसार,
 
भारतात सर्वात पहिल्यांदा 'निपाह' व्हायरस संसर्गाचा उद्रेक 2001 मध्ये झाला होता
 
2007 मध्ये पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात तर 2018 आणि 2019 मध्ये केरळच्या कोळिकोड जिल्ह्यात 'निपाह' व्हायरसचा संसर्ग पसरला होता.
 
Published By- Priya Dixit