गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

पाळीव प्राण्यांमुळे कोणते संसर्गजन्य आजार होतात? ते टाळण्यासाठी या 5 गोष्टी नक्की करा

अनेक जणांसाठी पाळीव प्राणी हे त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. त्यांचे घरातील व्यक्तींकडून लाडकोड होतात, ते घरात अगदी हक्काने सगळीकडे वावरत असतात, लोळत-फिरत असतात.
 
प्राण्यांसोबत राहणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी-आनंदासाठी चांगलंच आहे. पण तुमच्याकडे पाळीव प्राणी असेल तर काही मुलभूत काळजी घेणंही गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहावं.
 
कारण प्राण्यांमुळे काही आजारांचा संसर्ग होऊ शकतो. रेबीज किंवा टॉक्सोप्लाझोसिस (एकपेशीय परजीवीमुळे होणारा संसर्ग) यांसारखे गंभीर आजारही प्राण्यांमुळे होऊ शकतात.
 
झुनोसिस (मनुष्य आणि प्राण्यांमध्ये संक्रमित होऊ शकणारे आजार) या संकल्पनेअंतर्गत 200 आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
 
याचं जर अजून विश्लेषण केलं तर आपल्याला ज्या आजारांचा संसर्ग होऊ शकतो त्यातल्या 10 पैकी 6 आजार हे पाळीव प्राणी किंवा प्राण्यांमुळे पसरू शकतात. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनची ही आकडेवारी आहे.
 
आता यामुळे घाबरून प्राणी पाळण्याची कल्पनाच सोडायची का? किंवा आता जे प्राणी आपल्या घरात नांदताहेत त्यांचं काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
 
तर असं काहीही करण्याची गरज नाहीये. पाच मुलभूत गोष्टींचं पालन केलं तरी तुम्ही प्राण्यांपासून होणाऱ्या संसर्गाला दूर ठेवू शकता...व्हायरस, बॅक्टेरिया आणि इतर रोगजनकांच्या संपर्कात येण्याचा धोका टाळू शकता.
 
1. व्हेटरनरी डॉक्टर्सकडे (पशुवैद्यक) प्राण्यांना नियमित न्या
तुमच्या पाळीव प्राण्यांना कोणताही त्रास होत नसला तरी वर्षातून किमान एकदा त्यांना पशुवैद्यकाकडे न्यायला हवं, त्यांची तपासणी करून घ्यायला हवी.
 
तुम्ही व्हेटरनरी डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमच्या पेटच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. त्यांच्या काही मुलभूत चाचण्या केल्या जातात.
 
या भेटीत प्राण्यांच्या आरोग्यासाठी मूलभूत असलेल्या दोन गोष्टी आवर्जून करायला हव्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्राण्यांचं लसीकरण रेकॉर्ड अद्ययावत करणे. (यामध्ये दरवर्षी ज्या लशी घेणं आवश्यक असतं, त्यांचा समावेश आहे.)
 
आता यामध्ये आपण कुत्रे आणि मांजर हेच मुख्य पाळीव प्राणी आहेत, असं गृहीत धरलं तर सगळ्यांत महत्त्वाची आहे रेबीज विरुद्धची लस. विषाणूमुळे होणाऱ्या या रोगामध्ये मृत्यूदर हा जवळपास 100% आहे.
 
बोटुकाटू इथल्या पॉलिस्टा स्टेट युनिव्हर्सिटी (युनेस्प) च्या व्हेटरनरी मेडिसीन आणि झुटेक्निक्स विभागातील प्राध्यापक सिमोन बाल्डिनी सांगतात की, रेबीजच्या विषाणूचा संसर्ग लाळेद्वारे, प्राण्याने चाटण्यामुळे, चावण्यामुळे किंवा ओरखडल्यामुळे होऊ शकतो.
 
त्यामुळेच प्राण्यांना नियमितपणे रेबीज प्रतिबंधक लस देणं हे तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठीही अत्यावश्यक असतं.
 
दुसरी नियमित काळजी म्हणजे जंतनाशक औषध देणं. या औषधांमुळे शरीरातील परजीवी काढून टाकल्या जातात.
 
"पाळीव प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी, उद्यानांमध्ये फिरायला नेल्यावर विष्ठा केल्यास मालकांनी ती उचलावी. कारण त्यातूनही जंतुसंसर्ग होऊ शकतो," असं बाल्डिनी सांगतात.
 
2. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
प्राण्यांच्या स्वच्छतेची काळजी घेताना त्यांचे अन्न आणि पाणी ठेवलेल्या कंटेनरची देखभाल करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी ते लघवी करतात आणि मलविसर्जन करतात, त्या जागाही स्वच्छ ठेवायला हव्यात.
 
कारण या जागा जीवाणू संसर्गाचे स्रोत ठरू शकतात.
 
मांजरांबद्दल बोलायचं झाल्यास टॉक्सोप्लाझ्मा गोंडी नावाचा जीवाणू. त्याच्यामुळे टॉक्सोप्लाझोसिस नावाचा आजार होऊ शकतो.
 
साओ पाउलो मधील एमिलिओ रिबास संसर्गजन्य रोग संस्थेतील (Emílio Ribas Infectious Diseases Institute) उष्णकटिबंधीय आजार आणि झुनोसेससाठीच्या बाह्यरुग्ण क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर मार्कोस व्हिनिसियस डी सिल्वा म्हणतात, "हे सूक्ष्मजीव प्राण्यांच्या पचनमार्गात असतात आणि विष्ठेमधून शरीराबाहेर टाकले जातात."
 
"एखादी व्यक्ती अस्वच्छ पाणी किंवा न शिजवलेले अन्नपदार्थ यांच्यामार्फत या जीवाणूंच्या थेट संपर्कात येण्याची शक्यता असते."
 
काही वेळा टोक्सोप्लाझोसिस खूप गंभीर ठरू शकतो. विशेषतः गर्भवती महिलांमध्ये तो वि चिंताजनक आहे, कारण यामुळे गर्भपात होऊ शकतो किंवा गर्भात विकृती निर्माण होऊ शकते.
 
हा धोका टाळण्यासाठी मांजरींच्या विष्ठेची चाचणी करून त्यात टॉक्सोप्लाझ्मा जीवाणू आहेत की नाही हे तपासणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ही चाचणी कुत्र्यांच्या पिलांमध्ये पण घेतली जाते.
 
जर मांजरांच्या शरीरात या विषाणूचं अस्तित्व आढळलं, तर त्यावर उपचार उपलब्ध आहेत.
 
दुसरी पायरी म्हणजे मांजर 'बाथरूम' म्हणून वापरत असलेल्या बॉक्सची स्वच्छता नियमित करणे. त्यातील विष्ठा दररोज काढण्याव्यतिरिक्त हा बॉक्स आठवड्यातून किमान दोनदा स्वच्छ करायला हवा. त्यातलं खाण्याचं आणि पाण्याचं वाडगं हे नियमित साबणाने स्वच्छ करावं.
 
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हाताचे जीवाणू इतर ठिकाणी पसरू नयेत म्हणून साफसफाईनंतर आपले हात स्वच्छ धुणे.
 
गर्भवतींसाठी टोक्सोप्लाझोसिस हा इतका गंभीर आहे की, तज्ज्ञांच्या मते त्यांनी गरोदरपणात मांजरांचा बॉक्स साफ करायलाच जाऊ नये.
 
3. प्राण्यांच्या इतर गोष्टींची काळजी
जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यासाठी पाळीव प्राण्यांच्या इतर वस्तूंची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
 
उदाहरणार्थ- तुमच्या मांजराची कचरा पेटी किंवा कुत्र्याची शौचाची मॅट. या गोष्टी तुमचं स्वयंपाकघर, खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून शक्य तितक्या लांब ठेवाव्यात.
 
काही प्राण्यांना शी-शू करण्याचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, जेणेकरून ते इथे-तिथे घाण करणार नाहीत.
 
त्यांनी केलेला कचरा हा सातत्याने साफ करावं. ज्या गोष्टींशी त्यांचा सातत्याने संपर्क येतो, ते भाग ब्लीच किंवा अँटीबॅक्टेरियल द्रव्याने निर्जंतुक करायला हवेत.
 
काही प्राण्यांसाठी या गोष्टी खूप कमी प्रमाणात लागू होतात. उदाहरणार्थ- कासव.
 
कासव वारंवार साल्मोनेला बॅक्टेरिया उत्सर्जित करतात. हे जीवाणू माणसांच्या आतड्यांमध्ये होणाऱ्या संसर्गाचं प्रमुख कारण आहेत.
 
4. घराबाहेरच्या जागेचीही काळजी घ्या.
पाळीव प्राणी असतील तर केवळ घरातल्या गोष्टींचीच नाही, तर बाहेरच्या जागेचीही काळजी घ्यायला हवी.
 
आरोग्य मंत्रालयाचे झुनोसेस सल्लागार असलेले सिल्वा सांगतात की, घराबाहेरच्या जागा या पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी यांच्यातील संपर्क बिंदू असतात.
 
शहरात येणाऱ्या वटवाघळांपासून धोका असतो "किंवा उंदीर मूत्राच्या वासाने येतो," असं साओ पाउलो (PUC-SP) च्या पॉन्टिफिकल कॅथलिक विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉक्टर आणि प्राध्यापक स्पष्ट करतात.
 
उंदरांच्या शरीरात तसेच उंदरांच्या मूत्रात लेप्टोस्पायरा नावाचे जीवाणू असतात, त्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होतो.
 
हा सूक्ष्मजीव त्वचेतून किंवा श्लेष्मल त्वचेतून आत प्रवेश करतो. त्याच्यामुळे सौम्य तापापासून ते अत्यंत गंभीर रक्तस्रावापर्यंत त्रास होऊ शकतात.
 
या समस्या टाळण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे परसबागेकडे विशेष लक्ष देणे. नाले किंवा पाइप आउटलेट स्वच्छ ठेवणे. पाळीव प्राण्यांचे अन्न सुरक्षित आणि इतर प्राण्यांना पोहोचता येणार नाही अशा ठिकाणी साठवणे, कचरा रोज काढणे, भंगार सामान वेळोवेळी दूर करणे.
 
सिमोन बाल्डिनी सांगतात की, लेप्टोस्पायरोसिसबद्दल बोलायचं तर कुत्र्यांसाठी एक लस उपलब्ध आहे. ती दर बारा महिन्यांनी देणं गरजेचं आहे.
 
कुत्र्यांना होणारा अजून एक चिंताजनक रोग म्हणजे लेशमॅनियासिस. या प्रोटोझोआचा प्रसार डास चावल्यामुळे होतो. या डासांची पैदास कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये (जसे की बागेत जमा होणारी कोरडी पाने) होते.
 
हा कचरा साचू न देणे हा रोग टाळण्याचा एक मार्ग आहे.
 
"प्रतिबंधक उपाय म्हणून कुत्र्यांना रिपेलन्ट कॉलर वापरू शकता आणि लेशमॅनियासिस प्रतिबंधक लस देऊ शकता," लुचेस म्हणतात.
 
5. आपल्या पाळीव प्राण्यांचे निर्बिजीकरण करा
ही प्रक्रिया सोपी, सुरक्षित आहे. यामुळे प्राण्यामधील अनपेक्षित प्रजननाला अटकाव होतो.
 
यामध्ये अजून एक गोष्ट आहे. मांजरासारख्या काही प्रजाती प्रजनन हंगामात मारामारी करतात.
 
या संघर्षांमध्ये एकमेकांना चावतात आणि ओरखडतात. या उघड्या जखमा व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीवांच्या प्रसाराचे स्त्रोत आहेत.
 
निर्बिजीकरण केलेल्या प्राण्यांमध्ये हे वर्तन होत नाही आणि त्यामुळे आपल्यालाही संरक्षण मिळते.