1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

किटो डाएट म्हणजे काय? यामुळे मृत्यू होऊ शकतो का?

आज काल आपले आरोग्य सदृढ आणि निरोगी राहावे या दृष्टीने इंटरमिटंट फास्टिंग, किटो डाएट, डिटॉक्स डाएट, व्हेगन डाएट असे विविध प्रकारचे डाएट केले जातात. यातून कधी चांगले परिणाम मिळतात तर कधी कधी ते धोक्याचेही ठरू शकते.
 
अशा डाएट पैकीच एक अत्यंत लोकप्रिय प्रकार सध्या पाहायला मिळतोय तो म्हणजे किटोजेनिक डाएटचा. हे डाएट काय असतं, याचे चांगले आणि वाईट परिणाम कोणते हे आपण या लेखातून पाहू.
 
किटो म्हणजेच किटोजेनिक डाएट. हे एक हाय फायबर डाएट आहे. या डाएटमध्ये शरीराला फॅट्समधून ऊर्जा मिळते. या डाएटमध्ये कर्बोदकं म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनं म्हणजेच प्रोटीन्सचं सेवन अतिशय कमी किंवा नियंत्रित प्रमाणात केलं जातं.
न्यूट्रिशनिस्ट डॉ. शिखा शर्मा सांगतात, "शरीर जेव्हा किटॉन्सचा वापर ऊर्जा स्रोत म्हणून करतं, तेव्हा त्याला किटो डाएट म्हटलं जातं. या डाएटमध्ये फॅट्सच्या सेवनाचं प्रमाण जास्त असतं आणि कर्बोदकांचं सेवन केलं जात नाही.
 
या डाएटमध्ये किटो शेक्स, काही निवडक भाज्या खाल्ल्या जातात. फळं खात नाहीत. प्रोटीन्स मिळण्यासाठी चिकन, मटण, मासे, नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. हे डाएट करताना भारतात चीजचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं."
 
वजन कसं कमी होतं?
किटो डाएटचा परिणाम साधारण आठवड्याभरामध्ये शरीरावर दिसू लागत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
डॉ. शिखा शर्मा सांगतात, "अशाप्रकारचं डाएट करत असताना तुमचं शरीर हे जेवण पचवत नसतं. सगळ्या गोष्टी आतड्यांतून निघून जातात. आणि जे खाणं पचतं ते तुमच्या यकृतात (लिव्हर) आणि स्वादुपिंडात (गॉलब्लॅडर) साठत राहतं."
 
"शरीर अशावेळी सर्व्हायवल मोडमध्ये जातं आणि आवश्यक असणारी ऊर्जा किटॉन्समधून मिळवतं. पण याचे दुष्परिणामही शरीरावर दिसू लागतात. दोन ते तीन दिवसांमध्ये किटो डाएटचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतो."
जर तुम्हाला यकृत वा स्वादुपिंडाच्या तक्रारी आधीपासून असतील तर या डाएटचे दुष्परिणाम तुमच्यावर दोन - तीन दिवसांतच दिसू लागतात. पण जर तुम्हाला आधीपासून कोणताही त्रास नसेल तर मग हे दुष्परिणाम दिसायला तीन ते चार महिने लागू शकतात.
 
'सिंपल कार्ब्स'मुळे आपलं वजन वाढत असल्याचं डाएटिशियन्स सांगतात. साखर, मैदा, रवा आणि कॉर्नफ्लारपासून तयार होणाऱ्या पदार्थांचा यात समावेश आहे.
 
या गोष्टींचं सेवन थांबवणं लोकांना कठीण वाटतं खरं, पण वजन कमी करायचं असेल तेव्हा फटाफट वजन कमी करणारे पर्याय शोधले जातात. किटो डाएट हा असाच एक पर्याय मानला जातो.
डॉ. शिखा शर्मा सांगतात, "माझ्या माहितीतला कोणताही डाएटिशियन किटो डाएटचा सल्ला देत नाही. अनेक लोक घरगुती उपाय म्हणून अशाप्रकारचं डाएट करतात. पण कोणताही डाएट प्लान स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि डाएट त्यांच्याच देखरेखीकाली करणं गरजेचं आहे. कारण अशा डाएटचे दुष्परिणामही होऊ शकतात."
 
किटो डाएटचे शरीरावर परिणाम
डॉ. शिखा शर्मा सांगतात, "सहसा एका दिवसात शरीराला 20 ग्रॅम फॅट्स, एक ग्रॅम प्रति किलो या दराने तुमच्या वजनानुसार प्रोटीनची गरज असते. म्हणजे जर तुमचं वजन 55 ते 60 किलो असेल तर 60 ग्रॅम प्रथिनांचं सेवन तुम्ही दररोज करायला हवं. याशिवाय 50 ते 60 टक्के कर्बोदकांचीही गरज असते. पण या गोष्टी तुमचं शरीर, तुम्ही करत असलेलं काम आणि हालचाल यानुसार कमी - जास्त होऊ शकतात.
 
म्हणजे खेळाडूंना याची जास्त गरज असते. पण तुमच्या शरीराला फक्त 20 ग्रॅम फॅट्सची गरज असताना तुम्ही हे प्रमाण वाढून 60 ते 80 टक्के केलं, तर याचा यकृत आणि स्वादुपिंडावर परिणाम होईल."
 
या डाएटमध्ये ऊर्जा कर्बोदकांद्वारे न मिळता फॅट्सद्वारे मिळते. यामध्ये तुमचं वजन तर कमी होईल पण तुमच्या यकृत आणि स्वादुपिंडासाठी तुम्ही सेवन करत असलेल्या फॅट्सचं पचन करणं कठीण जातं.
 
कारण तुमच्या शरीराराला रोज 20 ग्रॅम फॅट्स पचवण्याची सवय असते. पण किटो डाएट सुरू केल्यावर शरीराला एका दिवसात 100 ग्रॅम फॅट्सचं पचन करावं लागतं.
 
डॉ. शिखा शर्मा सांगतात, "अशा परिस्थितीत याचं पचन करण्यासाठी तुमच्या या दोन अवयवांना अनेक पटींनी जास्त मेहनत करावी लागते. जर तुमचं यकृत कमकुवत असेल तर मग अशा डाएटमुळे त्याचं काम बिघडतं. अशा डाएट्सचा महिलांवर सगळ्यांत जास्त परिणाम होतो.
 
जर 40 वर्षांची एखादी महिला असेल, जिचं वजन जास्त आहे किंवा जर तिचा फर्टिलिटी पिरिएड (फलन काळ) सुरू असेल तर स्वादुपिंडात खडे होऊ शकतात. कारण अशावेळी तुमच्या स्वादुपिंडामध्ये आम्लता निर्माण झालेली असते आणि शरीरातली सूज यामुळे वाढू शकते."
 
"या डाएटमुळे तुमची हार्मोन सायकल विस्कळीत होण्याची शक्यता असते. किटो डाएटमुळे तुमचं बीपी आणि शुगर लेव्हलही वरखाली होते. हे डाएट करणाऱ्या व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो, घाबरल्यासारखं वाटतं, पचन क्रिया बिघडते आणि गॅसेस वा अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो."
 
डॉ. शिखा शर्मा सांगतात, "सामान्यतः कोणीही डॉक्टर किटो डाएटचा सल्ला देत नाही. काही विशिष्ट परिस्थितीमध्येच या डाएटचा सल्ला दिला जातो. म्हणजे जर रुग्णाला कर्बोदकं पचवता येत नसतील किंवा त्यांच्या शरीरात एन्झाईम्स नसतील तर हे सुचवलं जातं. पण या डाएटमुळे वजनही घटत असलं तरी हे डाएट कधीही वजन कमी करण्यासाठी नव्हतं."
 
"पण झटपट वजन कमी करण्यासाठी हे डाएट प्रसिद्ध झालं आणि लोक असं डाएट करतात हे वाईट आहे. असं करू नये. हे एखाद्या चिट फंड योजनेप्रमाणे आहे. याच्यात लोकांना झटपट फायदा होताना दिसतो, हा चांगला पर्याय असल्याचं वाटतं, पण त्यातलं नुकसान काही काळाने लक्षात येतं.
 
अगदी असंच किटो डाएटमुळेही झटपट वजन कमी होत असल्याचं दिसतं पण त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणामही होतात. योग्य आणि संतुलित आहार औषधासारखं काम करतो. पण जर तुम्ही त्याला विषरूप देऊन सेवन केलंत तर त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणामही होऊ शकतो."
 
Published By- Priya Dixit