1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (08:56 IST)

'नसबंदी' हा शब्द ऐकला तरी भारतीय पुरुष का घाबरतात? वाचा

"मी नसबंदीचं नाव घेताच ते माझ्यावर प्रचंड भडकले होते. मला खडसावत ते म्हणाले की आज बोललीस ते बोललीस पण इथून पुढे यावर चकार शब्दही काढायचा नाहीस."
 
रडवेल्या आवाजात रश्मी(नाव बदललं आहे) हा प्रसंग सांगत होत्या.
 
दिल्ली एनसीआरच्या एका सोसायटीमध्ये रश्मी जेवण बनवण्याचं काम करतात. त्या मूळच्या पश्चिम बंगालमधल्या रहिवासी असून त्यांना तीन मुलं आहेत. आता त्यांना मूल नकोय.
 
जेव्हा त्यांनी त्यांच्या नवऱ्याला नसबंदी करून घेण्याबाबत विचारलं, तेव्हा त्यांचं उत्तर होतं की, "तुला करायचं असेल तर कर, मला ते का सांगतेस. त्यानंतर ते अजून चिडले आणि म्हणाले की इथून पुढे या विषयावर चर्चा करायची नाहीस."
 
रश्मी यांना त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवायचं आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःचीच नसबंदी करून घेतली. मात्र ही शस्त्रक्रिया केल्यामुळे घरोघरी जाऊन जेवण बनवण्याचं काम मात्र त्यांना सोडावं लागलं होतं.
 
नसबंदीचं नाव काढल्यावर, नवऱ्याकडून झिडकारण्यात आलेल्या रश्मी या एकमेव आहेत का?
 
आकडे काय सांगतात?
आकड्यांचा विचार केला तर आजही भारतातल्या बहुतांश कुटुंबांमध्ये कुटुंब नियोजनाचा भार हा प्रामुख्याने महिलांच्या खांद्यावरच टाकला जातो.
 
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2008 ते 2019 दरम्यान 5.16 कोटी लोकांची नसबंदी करण्यात आली. यामध्ये पुरुषांची नसबंदी करण्याचे प्रमाण फक्त तीन टक्के होते.
 
पुरुषांची नसबंदी ही संकल्पना विकसित देशांमध्ये राहणाऱ्या पुरुषांनी तर स्वीकारली आहे पण विकसनशील देश मात्र याबाबतीत खूपच मागास राहिल्याचं दिसतंय.
 
संयुक्त राष्ट्रांच्या 2015 च्या अहवालानुसार, कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये नसबंदीचा दर अनुक्रमे 21.7%, 21% आणि 10.8% इतका होता.
 
अमेरिकेत काम करणारे कंटेंट क्रिएटर कीथ लाउस हे एका मुलीचे वडीलही आहेत. त्यांच्या पत्नीला गर्भनिरोधक उपायांचा वाईट अनुभव आल्याने त्यांनी अगदी तरुण वयातच स्वतःची नसबंदी करून घेतली होती.
 
याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, "नवरा-बायकोमधील एकाने नसबंदी करून घेणं गरजेचं होतं म्हणून मी हा निर्णय घेतला. तुलनेने हा मार्ग माझ्यासाठी अत्यंत सोपा होता."
 
यासोबतच ते हेदेखील म्हणतात की, "मला असं वाटतं की मुलांना जन्म देण्याची आणि त्यांच्या जन्मावर नियंत्रण ठेवण्याची अशा दोन्ही जबाबदाऱ्या फक्त महिलांच्या खांद्यावर टाकू नयेत."
 
अमेरिकेमधील उटाह विद्यापीठातील युरोलॉजी सर्जरीचे सहाय्यक प्राध्यापक अलेक्झांडर पास्ताझक म्हणतात की, "नसबंदी करून घेण्यासाठी आलेल्या बहुतेक पुरुषांना त्यांच्या बायकोने नसबंदी करून घ्यायला सांगितल्याने ते आलेले असतात, असं ते सांगतात."
 
भारतीय समाजात मात्र स्त्री समानता आणि या समतेचं वास्तव यामध्ये बरीच तफावत आहे.
 
त्यातही जर पुरुषांच्या नसबंदीचा विचार केला तर त्याविषयी साधं बोलायलाही लोक घाबरत असतात.
 
पुरुष नसबंदी म्हणजे नेमकं काय?
 
भारतीय पुरुष नसबंदीला का घाबरतात?
 
गुवाहाटी अपोलो एक्सेलकेअर हॉस्पिटलचे वरिष्ठ यूरोलॉजिस्ट डॉ. जॉयनारायण चक्रवर्ती सांगतात की, "नसबंदी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये पुरुषाचा अंडकोष कापून आणि शुक्राणू वाहून नेणारी नळी कापून काढली जाते."
 
ते म्हणतात की, "ही शस्त्रक्रिया सामान्य भूल देऊन केली जाते, म्हणजे नसबंदी करणारी व्यक्ती सजग असते आणि तिला वेदनाही जाणवत नाहीत. तसेच, या शस्त्रक्रियेला खूपच कमी वेळही लागतो."
 
यासोबतच ही शस्त्रक्रिया फक्त 20 मिनिटांत आटोपत असल्याचं ते सांगतात.
 
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, इतर गर्भनिरोधक उपायांपेक्षा पुरुष नसबंदीचा हा मार्ग 99 टक्के प्रभावी आहे.
 
मात्र पुरुषांच्या नसबंदीबाबत अनेक चुकीच्या धारणा आणि मिथकं आहेत. उदाहरणार्थ पुरुषांनी नसबंदी केल्याने सेक्स करतांना अडचण निर्माण होते, हीदेखील एक अत्यंत चुकीची धारणा आहे.
 
डॉ. जॉय चक्रवर्ती असं म्हणतात की, "नसबंदी केल्यानंतर सेक्स करताना अडचण येते हा निव्वळ एक गैरसमज आहे. यात कसलंही तथ्य नाहीये."
 
ते सांगतात की, "पुरुषांची नसबंदी करताना ताठरतेसाठी जबाबदार असणाऱ्या रक्तवाहिनीला साधा स्पर्शही केला जात नाही. वीर्यनिर्मिती सुरू राहते आणि ते वाहून नेणारी नळी देखील संरक्षित असते. त्यामुळे लैंगिक इच्छा आणि सेक्सवर कसलाही परिणाम होत नाही."
 
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या अहवालानुसार, नसबंदीनंतर अंडकोषातून शुक्राणू (शुक्राणु) तयार होत राहतात. त्यावर काहीही परिणाम होत नाही. नसबंदीनंतर अंडकोषामध्ये तयार होणाऱ्या शुक्राणूंच्या पेशी वीर्यामध्ये मिसळत नाहीत तर नळी कापल्यामुळे तुमच्या शरीरातच त्या विरघळतात.
 
या अहवालात हे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, पुरुषांनी नसबंदी केल्याने लठ्ठपणा वाढत नाही किंवा त्यांचं शरीरही कमकुवत होत नाही. ते पूर्वीप्रमाणेच शारीरिक मेहनत करू शकतात, त्यामुळे याबाबत कसलीही शंका घेण्याचं कारण नाहीये.
 
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या युरोलॉजी विभागातील संशोधकांच्या मते, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 1973 मध्ये गर्भपाताच्या अधिकारांवर बंदी घातल्यानंतर पुरुष नसबंदीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली होती.
 
जगभरातल्या इतर देशांमध्येही हाच ट्रेंड दिसून आला. गुगल ट्रेंड सर्चमध्येही व्हॅसेक्टोमी या शब्दाच्या सर्चमध्ये 850 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं.
 
न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, आयोवा आणि इतर देशांमध्ये देखील, 30 वर्षाखालील पुरुषांचं नसबंदी करून घेण्याचं प्रमाण दुप्पट झालं होतं.
 
तेथे, 2007 ते 2009 दरम्यान, 18 ते 45 वयोगटातील पुरुषांच्या नसबंदीच्या संख्येत 34 टक्के वाढ झाली आहे असं देखील आढळून आलंय.
 
नसबंदीची शस्त्रक्रिया नेमकी कुठे करावी?
मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमधील युरोलॉजिस्ट डॉ. सोनी मेहता सांगतात की, "सरकारी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करता येते."
 
डॉ. जॉय चक्रवर्ती यांनी आवर्जून असं सांगितलं की, "या शस्त्रक्रियेसाठी सरकारी रुग्णालये पैसे आकारत नाहीत, त्यामुळे तुम्ही ती तिथेच करून घेतली पाहिजे."
 
यासोबतच ते हेदेखील म्हणाले की, "जर तुम्हाला ही शस्त्रक्रिया खाजगी दवाखान्यात करून घ्यायची असेल तर तेथील सुविधांप्रमाणे तुम्हाला पैसे द्यावे लागतील."
 
शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात की, "कोणतीही विशेष खबरदारी घेण्याची गरज नाही. होय, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर शस्त्रक्रियेपूर्वी साखरेची पातळी सामान्य असणं आवश्यक आहे."
 
किडनी किंवा प्रोस्टेटच्या समस्या असलेल्यांनाही ही शस्त्रक्रिया करायची असेल तर करता येईल का? यावर ते म्हणाले की, "होय, कोणताही सामान्य माणूस ही नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेऊ शकतो."
 
दुसरीकडे, लैंगिक जीवनावर होणार्‍या परिणामाबद्दल बोलतांना डॉ. सोनी स्पष्टपणे सांगतात की, "या शस्त्रक्रियेनंतर शुक्राणू (शुक्राणु) तुमच्या विर्यामध्ये सुमारे सहा महिन्यांपर्यंत येऊ शकतात त्यामुळे नसबंदीनंतरही काही काळ कंडोमसारखी खबरदारी घेतली पाहिजे."
 
तुमचे वीर्य शुक्राणूविरहित झाले आहे हे कसे कळेल?
यावर डॉ. सोनी म्हणतात, "यासाठी वीर्यचाचणी केली जाते."
 
या चाचणीला नसबंदी चाचणी किंवा वीर्य विश्लेषण चाचणी असंही म्हणतात.
 
यासाठी सॅम्पल देण्यापूर्वी दोन-तीन दिवस कोणत्याही प्रकारचा सेक्स, लैंगिक क्रिया करू नयेत हे लक्षात ठेवायला हवं.
 
असं केल्यानं विर्यातली शुक्राणूंची संख्या उच्च पातळीवर जाते.
 
नसबंदीबाबत काही महत्त्वाचे प्रश्न
मागील अनेक वर्षांपासून पुरुषांना नसबंदी केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल अशी भीती वाटत आलेली आहे.
 
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की, "पुरुष नसबंदीचा आणि हृदयरोग, प्रोस्टेट कॅन्सर, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आजाराशी संबंध नाही. या ऑपरेशनचा कोणताही संबंध किंवा कोणताही प्रतिकूल परिणाम अशा रोगांवर होत नाही."
 
नसबंदी केल्यानं लैंगिक संक्रमणातून होणारे आजार (Sexually Transmitted Disease) ही होत नाहीत का?
 
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालात असं स्पष्टपणे लिहिलं आहे की पुरुष नसबंदी केल्याने लैंगिक संक्रमित रोग (STI) दुसऱ्याच्या शरीरात जाण्यापासून रोखले जाऊ शकत नाहीत. त्यासाठी कंडोमचा वापर हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे.
 
नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर परिस्थिती पूर्ववत होऊ शकते का?
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालात असं लिहिलं आहे की, 'हो हे होऊ शकतं.'
 
मात्र नसबंदी करणाऱ्या पुरुषाला हे आधीच कळवलं गेलं पाहिजे की अशा पद्धतीची शस्त्रक्रिया करणं ही एक अत्यंत जटिल प्रक्रिया असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी होईलच हे ठामपणे सांगता येत नाही. अशी शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता कमी असते.
 
लोकसंख्या नियंत्रण गरजेचं आहेच पण हेही लक्षात असू द्या.
 
भारताची वाढती लोकसंख्या ही देशापुढे निर्माण झालेलं एक मोठं आव्हान आहे हे नक्की.
 
15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची लोकसंख्या 140 कोटींपर्यंत पोहोचल्याचं सांगितलंय.
 
दुसरीकडं, संयुक्त राष्ट्रांच्या मते, 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या पुढे जाईल.
 
देशाच्या स्वातंत्र्यानंतर, जन्मदर कमी करणे आणि लोकसंख्या वाढीचा दर कमी करणे या ध्येयाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता.
 
नंतरच्या काळात, विशेषतः 1972 ते 1980 पर्यंत, कुटुंब नियोजन ही लोकसंख्या नियंत्रणाची व्यापक मोहीमही बनली होती.
 Published By- Priya Dixit