सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (11:02 IST)

Asthma and pregnancy अस्थमा आणि गर्भावस्था

Asthma and pregnancy
अस्थमा हा आजार गर्भावस्थेत महिला व होणार्‍या बाळाचा कर्दनकाळ ठरू शकतो. महिलांनी गर्भावस्थेत तपासणी करताना अस्थमा आहे किंवा नाही याचे ही निदान करणे आवश्यक आहे. वेळीच अस्थमावर उपचार केला नाही तर ते त्या महिलेसाठी व होणार्‍या बाळाच्या दृष्टीने धोकादायक असते. अस्थमा झालेल्या गर्भवती महिलांनी धूळ व सिगारेटच्या धुरापासून दूर राहिले पाहिजे. कारण त्यापासून त्यांच्यासह पोटातील बाळाचा जीव गुदमरतो.
 
गर्भधारणा झाल्यानंतर लागलीच महिलांनी अस्थमाचे निदान करून त्यावर उपचार सुरू केले तर त्याचा होणार्‍या बाळाच्या आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वेळेत उपचार केले तर दम्याने त्रासलेली गर्भवती महिला सुरक्षित राहू शकते. मात्र वेळीच उपचार केला नाही तर त्याचा गंभीर परिणाम होणार्‍या बाळामध्ये दिसून येतो. गर्भामध्ये वाढ घेत असलेल्या बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण एकदम कमी होते. त्यामुळे बाळाची वाढ होणे थांबते. गर्भ वाढीच्या दृष्टीने गर्भवती महिलेला अस्थमावर उपचार करून होणार्‍या बाळाला ऑक्सिजनची पूर्तता करणे गरजेचे असते.
 
गर्भावस्थेच्या द्वितीय, तृतीय महिन्यात अस्थमा वाढण्याला सुरवात होते. मात्र स्त्रीला दोन-तीन आठवड्यानंतर त्याची लक्षणे जाणवतात. तेव्हापासूनच स्त्रियांनी त्यावर उपचार सुरू केले पाहिजे. कारण प्रसूतीपर्यंत नियंत्रणात आणता येऊ शकते. अस्थमा ग्रस्त महिला नवजात शिशूला स्वतःचे दूध पाजत नाही. कारण त्यांना भीती असते की, त्यांच्या दुधाद्वारे बाळालाही अस्थमा होईल. मात्र हा गैरसमज त्यांनी आधी मनातून काढून टाकला पाहिजे. नवजात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मातेचे दूध उत्तम आहे. आतापर्यंत अस्थमाग्रस्त महिलेच्या स्तनपानाने शिशुवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे तरी उदाहरण नाही. मात्र गर्भावस्थेत वेळीच अस्थमावर उपचार करणे हे ती महिला व तिच्या होणाऱ्या पाल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.