गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जून 2018 (13:33 IST)

आज रक्तदान दिन. त्या निमित्त ...

द्रव्यदानं परम दानम्   
अन्नदानं ततोधिकम्  
ततः श्रेष्ठ रक्तदानम् 
 
रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते.
 
जागतिक रक्त संक्रमणामध्ये एडस या रोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे ऐच्छिक रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे. 14 जून हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे असे या दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. रक्तदान केल्यास आपणास काहीही त्रास होत नाही, हे सांगणेही आवश्यक आहे.
 
हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ सेंटर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल रेडक्रॉस व रेडक्रिेसंट सोसायटी कार्यरत आहेत. सुरक्षित रक्त रुग्णाला मिळवून देण्यासाठी ऐच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते. मानवतेच्या दृष्टीने रक्तदात्यांची संख्या वाढविणे, नियमित रक्तदाते तयार होण्यासाठी काय करावे याचा अभ्यास या दिवशी करून मोबदल्याची अपेक्षा न करता रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे हे मोलाचे कार्य आहे. एकविसाव्या शतकात मानवाचे सर्वच क्षेत्रात अनेक शोध लावले आहेत. शरीरात कृत्रिम अवयव बसविले जातात. परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र मानवाने अद्याप आत्मसात केलेले नाही. मानव रक्तावर प्रकिया करतो, त्याचे विघटन करू शकतो, परंतु प्रत्यक्षात रक्त तयार करू शकत नाही. त्यामुळे मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही. मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते. म्हणून रक्तदान करून ही गरज भागवावी लागते. त्याची रक्तगटानुसार नोंद ठेवावी लागते.
 
रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. सुदृढ, सशक्त, रोग न झालेला माणूस रक्तदान करू शकतो. वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम  करू शकतो. रक्तदातचे वजन 45 किलोच्या वर असावे. रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
 
आज धकाधकीच्या बर्‍याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे ओणि तो आपणासारखा सूज्ञ नागरिकच करू शकतो. आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प युवकांनी करावा.