मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

जांभई का येते?

जांभया द्यायला लागल्यावर झोप आली आहे असं सगळ्यांना वाटू लागतं. या जांभया नेमक्या का येतात? कंटाळा आल्यावरच जांभया यायला सुरूवात होते का? फुफ्फुसातला ऑक्सिजनचा प्रवाह वाढवण्यासाठी जांभई गरजेची आहे, असे अगदी आत्तापर्यंत शास्त्रज्ञांना वाटत असे. जांभईमुळे रक्तप्रवाह आणि हृदयाची धडधड वाढत असल्याने हे म्हणजे शरीर ताणल्यासारखेच आहे, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. ही दोन्ही संशोधने खरी असली तरी जांभईमुळे तुम्ही ताजेतवाने होता, असे नुकतेच झालेले एक संशोधन सांगते. एका मोठ्या घटनेआधी आपण जांभई देतो. मोठ्या सामन्याआधी क्रीडापटूला जांभई येते. विमानाच्या उड्डाणाआधी पालयट जांभई देतो. तर तुम्ही मुले परीक्षेआधी जांभई देता.
 
माणसांनाच नाही तर जनावरांनाही जांभई येते. खाण्याआधी काही प्राणी जांभई देतात तर जंगली प्राणी भांडण्याआधी जांभई देतात. गंमत म्हणजे एकाने जांभई दिल्यावर दुसर्‍यालाही जांभई येते. तुम्हीही बरेचदा हे अनुभवले असेल. जांभईमुळे आपला मेंदू बदलासाठी तयार होतो, असे नव्या संशोधनांमधून समोर आले आहे. जांभई म्हणजे कंटाळा या संकल्पनेच्या हे अगदी उलट आहे. आईच्या पोटात असलेले बाळही आपली शारीरिक स्थिती बदलण्याआधी जांभई देते. हजारो, लाखो वर्षांपूर्वी लोक शेकोटी पेटवून एकत्र बसत असत. त्यावेळी मुख्य व्यक्तीने जांभई दिल्यावर इतर लोकही मान म्हणून जांभई देत असत, असाही एक विचार आहे. जांभई या संकल्पनेभोवती अनेक गोष्टी फिरत असल्या तरी झोपण्याआधी जांभई का येते यामागचे गुपित उजूनही उघड झालेले नाही. ही सुद्धा बदलाचीच तयारी असू शकते.
 
शुभांगी कापरे