"कॅन्सर झाला आहे हे समजताच काही सेकंदांसाठी मी सुन्न झाले होते. पण पुढच्याच क्षणी मी असं ठरवलं की, मला लवकरात लवकर या आजारापासून सुटका मिळवायची आहे."दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या रहिवासी अनिता शर्मा सांगत होत्या.
				  													
						
																							
									  
	 
	त्या म्हणाल्या, त्यांना जेव्हा स्तनांचा किंवा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे हे समजलं तेव्हा काहीसा धक्का बसला. त्यांच्या मते,"त्यांच्या कुटुंबाची अवस्था तर आणखी वाईट झाली होती."
				  				  
	 
	"मी यासमोर हार मानणार नाही, हे मी ठरवलं होतं. एका आठवड्यानंतरच मी ऑपरेशन करून घेतलं. मला फार गंभीर आजार झाला आहे, हा विचार मी कधीही माझ्या मनात येऊ दिला नाही," असं त्या म्हणाल्या.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	अनिता यांची 2013 मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. पण त्या आता अगदी सामान्य जीवन जगत आहेत. त्या लोकांना सकारात्मक विचार करण्यासाठीही प्रेरित करत आहेत.
				  																								
											
									  
	योग आणि मेडिटेशनचं महत्त्व
	अनिता शर्मा यांच्या इच्छाशक्तीनं त्यांना कधीही दुबळं होऊ दिलं नाही. त्यांना माहिती होतं की, त्यांचा आजार आव्हानात्मक आहे. पण विश्वासाच्या जोरावरच त्यांना सहजपणे त्याचा सामना करता आला.
				  																	
									  
	 
	तज्ज्ञांच्या मते, तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकतात.
				  																	
									  
	 
	याबाबतच मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटीच्या एक्सरसाइझ फिजिओलॉजी विभागाशी संलग्न डॉ. जचारी एम. गिलेन म्हणाले की, आत्मविश्वास स्वतःला प्रेरणा मिळवण्यासाठी मदत करतो आणि त्याचा सकारात्मक परिणामही होतो.डॉ. जचारी बीबीसी रील्सबरोबर बोलताना म्हणाले की, "यामुळं एपिनेफ्राइन, एड्रिनालिन आणि नोराएड्रिनालिन हार्मोनच्या पातळीतही खूप वाढ होते. या हार्मोन्समुळं शक्तीची जाणीव अधिक वाढते."
				  																	
									  
	 
	डॉ. गिलेन यांच्या मते, "संपूर्ण आत्मविश्वासानं व्यायाम केल्यास स्नायूंची शक्ती खूप जास्त वाढवली जाऊ शकते. अॅथलिटच्या शक्तीचं खरं रहस्य हेच आहे."
				  																	
									  
	 
	"स्नायू जेवढे मोठे असतात शरीर तेवढंच मजबूत आणि शक्तीशाली बनतं. जे अॅथलिट जास्त शक्तीशाली असतात, त्यांच्या स्नायूंचा आकार तेवढाच मोठा असतो," असं ते सांगतात.
				  																	
									  
	
	सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास गरजेचा का?
	डॉ. जचारी एम गिलेन यांच्या मते, "स्नायू शरिराच्या गरजेनुसार भूमिका निभावण्यात सक्षम असतात. सामान्य लोकांचं शरीर जरी एखाद्या अॅथलिट सारखी कामगिरी करू शकत नसलं तरी, ते शक्तीशाली बनू शकतं आणि आणि सातत्यानं कामगिरीत सुधारणा आणू शकतं. त्याचवेळी सकारात्मक विचार तुम्हाला तुमच्या लक्ष्याच्या दिशेनं एकाग्र करण्यास मदतीचे ठरू शकतात."
				  																	
									  
	 
	अनिता शर्मा यांच्या प्रकरणी स्पष्टपणे लक्षात येतं की, उपचारादरम्यान त्यांचा उजवा हात खराब झाला होता.
				  																	
									  
	अनिता यांनी बीबीसीचे सहयोगी आर द्विवेदी यांच्याशी बोलताना सांगितलं की, किमोच्या दरम्यान चुकीच्या पद्धतीनं औषध दिल्यानं त्यांचा हात अचानकपणे सूजला आणि नंतर तीन बोटांनी काम करणं बंद केलं.
				  																	
									  
	अनिता म्हणाल्या की, सुरुवातीला त्यांना वाटलं होतं की, त्यांना त्या हातानं काहीही करता येणार नाही. पण त्यांनी आशा सोडली नाही.हळू-हळू त्या बोटं हलवत राहिल्या. त्याचा परिणाम म्हणजे आता पीठ मळायचं असो किंवा एखादी जड वस्तू उचलनं असो त्यांना बोटं वाकडी असूनही फार काही अडचण येत नाही.
				  																	
									  
	
	स्वतःला असहाय्य समजू नका
	अनिता यांच्या मते व्यक्तीनं कधीही स्वतःला असहाय्य समजता कामा नये. स्वतःवर विश्वास असणं हीच सर्वांत मोठी शक्ती आहे. त्यामुळंच ऑपरेशननंतरही त्यांना एकदम अंथरुणावर पडून राहणं आवडत नव्हतं.
				  																	
									  
	 
	अनिता यांना जुलै 2013 मध्ये त्यांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समजलं होतं. त्यानंतर एका आठवड्यातच त्यांनी ऑपरेशन केलं. ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्या एकट्याच वॉशरूमाही जायला लागल्या होत्या. कोणाचीही मदत त्या घेत नव्हत्या.त्यांचा सकारात्मक विचारावर जोर असतो.
				  																	
									  
	व्यायामानं शरीर मजबूत बनतं आणि सकारात्मक विचारानं मानसिक दृढता निर्माण होते. त्यानंतर कठोर आव्हानंही छोटी वाटू लागतात, असं त्यांना वाटतं.
				  																	
									  
	
	मानसिक आजारातही व्यायाम उपयोगी
	तज्ज्ञांच्या मते, मानसिक आजाराची समस्या अधिक गंभीर नसेल तर योग आणि व्यायामाच्या मदतीनंही यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकतं.
				  																	
									  
	देहराडूनमधील राजकीय दून मेडिकल कॉलेजमधील ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जे एस बिष्ट यांनी बीबीसीचे सहयोगी आर. द्विवेदी यांना म्हटलं की, "फिजिकल फिटनेसमुळे तुमचे स्नायू मजबूत होऊन शारीरिक क्षमता वाढते. ते मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं ठरतं."
				  																	
									  
	 
	डॉ. बिष्ट यांच्या मते, "भिती, डिप्रेशन, एन्झायटी अशा मानसिक आजारांचा सामना करण्यासाठी नियमित व्यायामापेक्षा अधिक फायदेशीर दुसरं काहीही ठरू शकत नाही."
				  																	
									  
	
	कोणता व्यायाम अधिक उत्तम?
	डॉ. जे एस बिष्ट यांच्या मते, मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं वेगळं पाहता येणार नाही. त्यात आत्मविश्वासाची भूमिका अत्यंत मोठी असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येतही दोन्ही एकमेकांना पूरक असल्याचं म्हटलं गेलं आहे.
				  																	
									  
	 
	त्यानुसार, सर्व मानसोपचारतज्ज्ञ त्यांच्या रुग्णांना औषधांबरोबरच नियमित व्यायामाचा सल्ला देतात. कारण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्यांसाठी मानसिक आव्हांनाचा सामना करणं अधिक सोप ठरतं.
				  																	
									  
	त्यांच्या मते, व्यक्ती कोणत्याही वयाची असली तरी त्यांनी व्यायाम करायला हवा. कारण त्याचे अनेक फायदे असतात.
				  																	
									  
	
	व्यायामाने स्नायू मजबूत होतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढते.
	नियमितपणे जॉगिंग, अॅरोबिक, दोरीवरच्या उड्या हे करणं फायदेशीर ठरतं.
				  																	
									  
	बॅडमिंटन, टेबिल टेनिस अशा खेळांनीही शारीरिक क्षमता वाढते.
	फार काही शक्य नसेल तर ब्रिस्क वॉकिंग करता येऊ शकतं.
				  																	
									  
	
	वाढत्या वयात स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी हलका व्यायाम फायद्याचा ठरतो.जचारी एम गिलेन यांच्या मते, आत्मविश्वास असेल तर व्यायामाने तुम्ही स्नायू मजबूत बनवून अॅथलिटसारखी शक्ती मिळवू शकता. पण अति-आत्मविश्वासापासूनही दूर राहणं गरजेचं आहे.
				  																	
									  
	 
	ते सांगतात की, सराव करताना स्नायूंकडे दुर्लक्ष करू नये. सहज शक्य असेल तेवढाच व्यायाम करावा. वजन उचलण्याची घाई करू नये. कधी कमी तर कधी जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळं स्नायू सहजपणे शरिराच्या गरजेनुसार तयार होतात. तसंच व्यायामानंतर लगेचच प्रोटीन घेण्याचा सल्लाही ते देतात.