मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (18:56 IST)

कोरोना आहार : 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारक क्षमता

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी पोषक आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
 
या पार्श्वभूमीवर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश हवा यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
 
पौष्टिक आणि समतोल आहारासाठी मासे, अंडी ते डार्क चॉकलेट अशा अनेक अन्नपदार्थांचा समावेश या यादीत आहे. शरीरात जीवनसत्त्वं, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंटयुक्तचं प्रमाण वाढण्यासाठी काही अन्नपदार्थ सरकारकडून सुचवण्यात आले आहेत.
 
केंद्र सरकारच्या 'mygovindia' या ट्विटर हँडलवर याबाबतची सूचना केली आहे.
कोव्हिड रुग्णांसाठी स्नायू बळकट होणे, प्रतिकारशक्ती पुन्हा तयार करण्यासाठी आणि त्यांना उत्साह वाटण्यासाठीही हा आहार फायदेशीर ठरू शकतो असंही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.
 
नाचणी आणि ओट्ससारख्या संपूर्ण धान्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रोटिनसाठी चिकन, मासे, अंडी खाऊ शकता. सोयाबीन, डाळींसारखे पदार्थही प्रोटीनचा चांगला स्रोत ठरु शकतात.
 
अक्रोड, ऑलिव्ह ऑईल आणि मोहरीचे तेल याचाही वापर अन्नपदार्थात केला पाहिजे. हे निरोगी फॅट्स आहेत.
 
या मार्गदर्शक तत्त्वानुसार, आहारासोबतच व्यायाम करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. यात योगा आणि प्राणायामचा उल्लेख आहे. दोन्ही गोष्टी आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार कराव्यात.
 
पुरेशी जीवनसत्त्व आणि खनिज मिळविण्यासाठी रंगीत फळं आणि भाज्या खाण्याची सूचनाही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आलेली आहे.
 
कमीतकमी 70 टक्के कोको असलेले डार्क चॉकलेट खावे. यामुळे भीती वाटणे कमी होईल, असंही सांगण्यात आलं आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दिवसातून एकदा हळदीचे दूध घेणं महत्वाचं आहे.
 
कोव्हिड रुग्णांमध्ये चव, वास जाणे आणि गिळण्यास त्रास होत असल्याचे दिसून येतं. यासाठी अन्नात चिमूटभर आमचूर घालावं. तसंच थोड्या थोड्या वेळाने मऊ अन्न खात रहावं असाही सल्ला देण्यात आला आहे.