गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (23:49 IST)

सायंकाळी कॉफी प्यायल्यास होते झोपमोड

कॉफी पिणे हे स्टेट्स सिम्बॉल समजले जाते. कॉफी प्यायल्याने तरतरी येते. पण, कॉफी प्यायल्याने झोपमोड होत असल्याचे संशोधनात उघड झाले. झोपण्यापूर्वी सहा तास आधी कॉफी प्यायल्यास एक तास झोप कमी होते. रात्री चांगली झोप घ्यायची असल्यास सायंकाळी 5 वाजल्यानंतर कॉफी पिऊ नका, असा सल्ला संशोधकांनी दिला.
 
झोपण्यापूर्वी तीन ते सहा तास आधी दोन ते तीन कप कॉफी प्यायल्यास 400 मिलीग्रॅम कॅफेन शरीरात जाते. त्यामुळे एक तास झोप कमी होते. मात्र, झोप का उडाली याची निश्चित माहिती त्या व्यक्तीस मिळत नाही. कॅफेनमुळे झोपेचे खोबरे होते अशी शक्यता झोप विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केली, असे अमेरिकन अँकॅडमी ऑफ स्लीप मेडिसीनचे अध्यक्ष एम. सफवान बद्र यांनी सांगितले.
 
या संशोधनासाठी व्यवस्थित झोप घेणार्‍या 12 जणांचा अभ्यास केला. त्यांच्या शारीरिक चाचण्या करून त्यांच्या मुलाखती घेतल्या. या सर्वाना नेहमीच वेळेनुसार झोप घेण्यास सांगितले. त्यांना चार दिवस तीन गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्या वेगवेगळ्या वेळेस घ्यायच्या होत्या. या गोळ्यांमध्ये कॅफेनचे मिश्रण होते, असे हेन्री फोर्ड झोप संशोधन केंद्रातील संशोधक ख्रिस्तोफर द्राके यांनी सांगितले.
 
झोपण्यापूर्वी विविध वेळी कॅफेनचे सेवन केल्यानंतर काय होते याचा अभ्यास करण्यात आला. हे संशोधन जर्नल ऑफ क्लिनिकल स्लीप मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झाले.