उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर किंवा प्रचंड उकाडा जाणवू लागल्यावर फ्रीजमधलं कडकडतून थंड पाणी पिण्यासारखा दुसरा आनंद नाही. पण हाच आनंद तुमच्या आरोग्यासाठी मात्र 'सायलेंट किलर' ठरू शकतो. आयुर्वेदासह आधुनिक वैद्यकशास्त्रातही अतिथंड पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले गेले आहे. उन्हाळ्यात अतिथंड पाणी पिण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, ते खालीलप्रमाणे आहेत:
१. पचनक्रिया मंदावणे
जेव्हा तुम्ही अतिथंड पाणी पिता, तेव्हा शरीराचे तापमान अचानक कमी होते. त्यामुळे पोटातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही आणि गॅस, अपचन, पोटदुखी किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात.
२. हृदयाच्या गतीवर परिणाम
अतिथंड पाण्यामुळे शरीरातील 'व्हॅगस नर्व्ह' उत्तेजित होते. ही नर्व्ह शरीरातील सर्वात लांब क्रेनियल नर्व्ह असून ती हृदयाची गती नियंत्रित ठेवण्याचे काम करते. थंड पाणी या नर्व्हला थेट प्रभावित करते, ज्यामुळे हृदयाचे ठोके मंदावण्याचा धोका असतो.
३. घसा खराब होणे आणि कफ वाढणे
फ्रीजमधले थंड पाणी पिल्यामुळे श्वसनमार्गात 'म्युकोसा' नावाचा संरक्षक थर तयार होतो. हा थर कमकुवत झाल्यामुळे घशात इन्फेक्शन होणे, खोकला येणे, टॉन्सिल्स सूजणे किंवा सर्दी होण्याचा धोका दुप्पट वाढतो.
४. शरीरातील ऊर्जेचा अपव्यय
आपल्या शरीराचे एक ठराविक तापमान असते. जेव्हा आपण अतिथंड पाणी पितो, तेव्हा त्या पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानाशी सुसंगत आणण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. यामुळे तुम्हाला तात्पुरती तृप्ती मिळाली, तरी शरीरातील ऊर्जा मात्र कमी होते.
५. डोकेदुखीचा त्रास
खूप थंड पाणी प्यायल्याने कपाळ आणि डोक्याच्या नसा अचानक थंड होतात. याला विज्ञानाच्या भाषेत 'ब्रेन फ्रीझ' म्हणतात. ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे, त्यांची डोकेदुखी थंड पाण्यामुळे अधिक वाढू शकते.
६. वजन वाढणे
काही संशोधनानुसार, जेवणानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने अन्नातील चरबी शरीरात गोठू लागते. चरबी घट्ट झाल्यामुळे ती वितळवणे शरीराला कठीण जाते, परिणामी वजन वाढू लागते.
७. दातांची संवेदनशीलता वाढू शकते
अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्याने दातांमध्ये झिणझिण्या येणे आणि वेदना होणे यांसारख्या समस्या अधिकच बळावू शकतात. ज्या व्यक्तींना आधीच दातांच्या संवेदनशीलतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही अस्वस्थता अधिकच तीव्र रूप धारण करू शकते.
तज्ज्ञांचा सल्ला: काय करावे?
मातीचे मटके वापरा: उन्हाळ्यात फ्रीजच्या पाण्याऐवजी मातीच्या माठातील पाणी प्या. हे पाणी नैसर्गिकरित्या थंड असते आणि शरीराला गुणकारी खनिजे पुरवते.
नॉर्मल पाणी मिक्स करा: जर फ्रीजचे पाणी पिणार असाल, तर त्यात थोडे साधे पाणी मिक्स करून पाण्याचे तापमान सामान्य करा.
लगेच पाणी पिणे टाळा: उन्हातून आल्या आल्या किंवा वर्कआऊट केल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे पूर्णपणे टाळा. शरीराचे तापमान सामान्य झाल्यावरच पाणी प्या.
उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे, पण त्यासाठी पाण्याचे तापमान योग्य असणे तितकेच महत्त्वाचे आहे!