रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 16 मार्च 2023 (15:25 IST)

H3N2 व्हायरसचा धोका टाळण्यासाठी ही काळजी घ्या, डॉक्टर म्हणतात-

H3n2 virus
H3N2 व्हायरसचा संसर्ग होऊन राज्यात नागपूर इथे दोन तर अहमदनगर इथे एकाचा मृत्यू झाला आहे.
 
राज्य सरकारने यासंदर्भात पत्रक जारी केलं आहे. इन्फ्ल्युएंझा हा आजार विषाणूमुळे होणार आजार आहे. इन्फ्ल्युएंझा टाईप ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत.
 
उदा.एच1एन1, एच2एन2, एच3, एन2 इ. या आजाराचे सर्वसाधारणपणे लक्षणे ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया आढळून येतात. इन्फ्ल्युएंझा बाबत रुग्ण सर्वेक्षण हे मुख्यत: लक्षणाधारित आहेत.
 
याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व त्याप्रमाणे लक्षणानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येतात.
 
उपाययोजना
प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यात उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
 
-फ्ल्यू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे.
 
-फ्ल्यू सदृश रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार केले जात आहेत.
 
-राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसंच वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
 
-उपचार सुविधा असणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांना स्वाईन फ्ल्यू उपचाराची मान्यता
 
-ऑसेलटॅमीवीर आणि इतर साधनसामुग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
 
-दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहातील गरोदर मातांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना फ्ल्यू प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते.
 
-महाराष्ट्र साथरोग प्रतिबंधक व नियंत्रक तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली आहे.
 
-अन्न आणि औषध विभागामार्फत सर्व खाजगी औषध दुकानांमध्ये ऑसेलटॅमीवीर उपलब्ध ठेवण्यासाठी आंतरविभागीय समन्वय करण्यात येतो.
 
-फ्ल्यू प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.
 
इन्फ्ल्युएंझा लसीकरण मोहीम
राज्य सरकारतर्फे 2015 पासून अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्ल्युएंझा लसीकरण उपलब्ध करुन दिलं आहे. सध्या दुसऱ्या व तिमाहीतील गरोदर मातांच्या बरोबरीने मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे.
 
राज्याने 2022-23 वर्षाकरता इन्फ्ल्युएंझा लसीचे 1 लाख डोस खरेदी केले आहेत.
 
दरम्यान 'खोकला सुरू होऊन तीन आठवडे झाले पण खोकला थांबतच नाही,' हा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल किंवा आपल्या आजुबाजुला खोकणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे असं तुम्हालाही जाणवत असेल. याचं कारण म्हणजे देशभरात फ्ल्यू रुग्णांची संख्या वाढल्याचं निदर्शनास येत आहे.
 
या फ्लूमध्ये H3N2 हा व्हायरस असल्याचंही दिसून येत आहे.
 
दरम्यान, H3N2 व्हायरसमुळे देशात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसमुळे कर्नाटकात एकाचा, तर हरियाणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
 
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय वेगवेगळ्या राज्यातील फ्लूच्या संसर्गावर लक्ष ठेवून आहे.
 
दरम्यान, या व्हायरसच्या संसर्गासंबंधी इंडियन मेडिकल असोसिएशनने एक पत्रक जारी केलं होतं. व्हायरल फ्लूची लागण झाली असल्यास अँटिबायोटिक्स घेऊ नका असंही आवाहन IMA कडून करण्यात आलं आहे.
 
फ्ल्यू आणि या व्हायरसविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. अँटिबायोटिक्स का वापरू नये?, या व्हायरसची लक्षणं काय? आणि काय काळजी घ्यायला हवी? लहान मुलांची काळजी कशी घ्याल? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले,
 
1. व्हायरसचा धोका किती आणि अँटिबायोटिक्स का वापरू नये?
डॉ. शिवकुमार उत्तुरे: व्हायरल इनफेक्शन सामान्य असलं आणि दरवर्षी फेब्रुवारीमध्ये रुग्ण दिसत असले तरी या व्हायरसचं आता म्युटेशन झालं आहे. H3n2 व्हायरसमध्ये खोकला कमीतकमी तीन आठवड्यांपर्यंत राहतो.
 
यामुळे रुग्ण हैराण होत आहेत. खोकला जात नाही म्हणून अँटिबायोटिक्स औषध घेतात. हे हानिकारक आहे असं इंडियन मेडिकल असोसिएशनचं म्हणणं आहे.
 
बऱ्याच वेळेला स्वत:हून अँटिबायोटिक्स घोतात. व्हायरल इनफेक्शनमध्ये अँटिबायोटिक्स घेत नाही. याला सिम्प्टमेटिक उपचार द्यायचे असतेत.
 
व्हायरल फिव्हर म्हणजे ताप आल्यास त्यासाठीही अँटिबायोटिक्स तुम्ही घेतले तर इतर आजारांसाठी अँटिबायोटिक्स काम करणार नाही कारण बॅक्टेरियाला त्याची सवय होते, त्याचा रेझिझटन्स वाढतो.
 
2. लक्षणं काय आहेत?
डॉ. शिवकुमार उत्तुरे: ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा, डायरिया सुरू होणं ही साधारण लक्षणं या व्हायरसची आहेत. यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यायला हवा. डॉक्टरही अँटिबायोटिक्स देतायत का हे सुद्धा तपासायला हवं.
 
आता केवळ सर्दी, खोकला असेल तर सुरुवातीचे दोन ते तीन दिवस तुम्ही थांबू शकता. परंतु ताप आल्यास तुम्ही तो अंगावर काढू नये.
 
तसंच डायरिया किंवा वीकनेस असल्यास तुम्ही नक्की डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.
 
सगळीकडेच प्रदुषण वाढलं आहे. बांधकाम, रस्त्यांची कामं, सुरू असलेली दिसतात. यामुळे सुद्धा श्वसन यंत्रणेला अधिक त्रास जाणवतो.
 
ड्रॉपलेटमुळे खोकला आल्यास विषाणुचा प्रसार वेगाने होतो असंही डॉ. शिवकुमार सांगतात.

3. काय काळजी घ्याल?
पुरेसं पाणी प्या
 
डॉ. शिवकुमार सांगतात, डॉक्टरांकडे गेला नाहीत तरी तुम्ही पुरेसं पाणी प्याल याची काळजी घ्या. दिवसभरात तीन लीटर पाणी शरीरात जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पुरेसं पाणी तुमच्याजवळ असेल अशी खबरदारी घ्या.
 
गर्दीत जाणं टाळा
 
कोव्हिड आरोग्य संकटात आपण ही गोष्ट शिकलोय की संसर्ग असेल त्यावेळी गर्दी टाळणं हे किती महत्त्वाचं आणि फायदेशीर ठरतं. आताही अनावश्यक असल्यास गर्दीत जाणं टाळा. खोकला वाढला असल्यास कार्यालयातही दोन ते तीन दिवस जाऊ नका. यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही.
 
व्हायरल फ्ल्यू असल्यास काही दिवस घरी आराम करू शकत असाल तर उत्तम. यामुळे तुम्हीही लवकर बरे व्हाल आणि प्रसारही थांबू शकेल.
 
मास्क वापरा
 
कोव्हिड काळात आपण सगळ्यांनी मास्क वापरला आहे. मास्कमुळे आपणही सुरक्षित राहतो आणि इतरही. त्यामुळे गर्दीत जाताना मास्क नक्की वापरा असं डॉक्टर आवर्जून सांगतात.
 
डॉ. शिवकुमार म्हणाले, हल्ली कपड्यांना मॅचिंगम्हणून सुद्धा कापडी मास्क वापरला जातो. परंतु सर्जिकल मास्क वापरणं अधिक योग्य ठरेल. सर्जिकल मास्क अधिक उपयुक्त आहे.
 
आहार
 
डॉक्टरांनुसार, तुम्ही पौष्टिक आणि योग्य आहार घेणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे योग्य आहारामुळेत शरीरात प्रतिकार शक्ती वाढू शकते. शरीराची इम्युनिटी किंवा प्रतिकार शक्तीच व्हायरसविरोधात लढत असते. प्रतिकार शक्ती चांगली असल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. यामुळे आहाराकडे लक्ष द्या.
 
हायड्रेशन आणि व्यायाम हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
 
हा व्हायरस ड्रॉपलेट इनफेक्शनमुळे एकमेकांमध्ये वेगाने पसरतो. आता सुदैवाने हा व्हायरस जीवघेणा नाही. परंतु हा व्हायरस वेगाने पसरतो आहे हे निश्चित.
 
4. लहान मुलं आणि वृद्धांनी काय काळजी घ्यायला हवी?
डॉ. शिवकुमार उत्तुरे: लहान मुलांना तुम्ही सतत घरी ठेऊ शकत नाही. त्यांना खेळायला जायचं असतं. आता तर उन्हाळ्याची सुटी सुरू होईल. पण जर त्यांना खोकला, सर्दी किंवा ताप असेल तर काही दिवस तरी त्यांना घराबाहेर पाठऊ नका. तसंच डायरिया झाला असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 
शिवाय, त्यांना खूप पाणी द्या. पाण्याची बाटली त्यांना द्या किंवा ते दिवसभरात किती पाणी पीत आहेत याकडे लक्ष ठेवा. त्यांच्या आहाराची काळजी घ्या. त्यांच्या शरीरात प्रतिकार क्षमता वाढले असा आहार त्यांना द्या.
 
डायरिया मुलांमध्ये सामान्य आहे. लगेच मुलांना डायरिया होतो. त्यामुळे डायरिया सुरू झाल्यास त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा.
 
कोमॉर्बीडीटीज हा शब्द आपण कोरोना काळात ऐकला आहे. आता ज्यांना कोमॉर्बीडीटी आहे त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांच्या शरीरात व्हायरसचा इफेक्ट लवकर होतोना दिसतो. त्यामुळे त्यांनी दोन-तीन दिवसही उपचारासाठी थांबू नये तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
 
IMA ने काय म्हटलं आहे?
 
देशात काही दिवसांत फ्लूसदृश रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
 
या आजारामध्ये खोकला, मळमळ, उलट्या, घसा दुखणे, ताप, अंगुखी आणि डायरिया यांच्यासारखी लक्षणे आढळून येत आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने एका प्रसिद्धीपत्रकामार्फत दिली आहे.
 
नागरिकांनी वरील लक्षणे आढळली तरी घाबरून न जाता काळजी घ्यावी.
 
या आजारामध्ये खोकला, मळमळ, उलट्या, घसा दुखणे, ताप, अंगुखी आणि डायरिया यांच्यासारखी लक्षणे आढळून येत आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने एका प्रसिद्धीपत्रकामार्फत दिली आहे. नागरिकांनी वरील लक्षणे आढळली तरी घाबरून न जाता काळजी घ्यावी.
 
IMA च्या पत्रकानुसार, ही लक्षणे पाच ते सात दिवस दिसू शकतात. ताप असल्यास तो तीन दिवसात बरा होतो. पण खोकला तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो. NCDC च्या माहितीनुसार यातील बहुतांश प्रकरणे ही 'H3N2' या विषाणूमुळे होत आहेत.