शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (15:00 IST)

साप चावल्यानंतर तातडीने काय करायचं?

सिनेमात किंवा मालिकांमध्ये जसं दाखवतात त्याप्रमाणे साप डूख धरून बदला घेतात का?
 
साप चावल्यानंतर लगेचच काय उपचार करायला हवेत?
 
सर्पदंशावर कोणते उपचार उपलब्ध आहेत?
 
या प्रश्नांची आणि सापांसंबधींच्या इतर प्रचलित समजुतींबद्दलची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या लेखात केला आहे.
 
आकडेवारीचा विचार केला तर जगात दरवर्षी सर्पदशांने जितके मृत्यू होतात, त्यांपैकी निम्मे मृत्यू हे भारतातच होतात.
 
2017मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं सर्पदंशाचा समावेश दुर्लक्षित उष्णकटीबंधीय आजारांच्या यादीत केला होता.
 
यासाठी काही महत्त्वाची कारणंही आहेत. मृत्यूंची अपुरी आकडेवारी, सर्पदंश झाल्यावर गैरसमजुतींवर विश्वास ठेवून चुकीचे उपचार घेणं, विषरोधक औषधांची कमतरता अशा अनेक बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळेच सर्पदंश हे आजही मोठं आव्हान ठरताना दिसतं.
 
 
देशात सर्पदंशाने किती मृत्यू होतात?
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 5 कोटी लोकांना सर्पदंश होतो आणि त्यापैकी निम्म्यांहून अधिक लोकांना विषारी साप चावलेला असतो.
 
दरवर्षी 81 लाख ते 1 कोटी 38 लाख लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो.
 
सर्पदंशामुळे झालेल्या अनेक मृत्यूंची नोंदच होत नाही कारण बरेचसे रुग्ण अवैद्यकीय उपचार घेतात किंवा त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत.
 
जुलै 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनामध्ये भारतात 2000 ते 2019 या काळात सर्पदशांमुळे 12 लाख लोकांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ दरवर्षी सर्पदंशामुळे 58 हजार लोकांचा मृत्यू होतो.
 
सापाबद्दल कोणत्या गैरसमजुती प्रचलित?
भारतात साप आणि सर्पदंशाबद्दल अनेक गैरसमज, कथा-कहाण्या प्रचलित आहेत.
 
देशातील काही समुदायांमध्ये सापाची देवाप्रमाणे पूजा केली जाते. देवानं आपल्या शेतांचं रक्षण करण्यासाठीच सापांची निर्मिती केली असल्याची अनेक आदिवासी समुदायांची श्रद्धा आहे.
 
अनेक सिनेमांमध्ये किंवा मालिकांमध्ये आपण पाहतो की, साप बदला घेतो. जर कोणी कोब्रा सापाला मारलं, तर त्याचा जोडीदार परत येऊन बदला घेतो, अशी अंधश्रद्धाही काही समुदायांमध्ये आहे.
 
डॉ. राहू गजपी यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, अशाप्रकारच्या अंधश्रद्धांमुळेच सर्पदंशाने होणारे मृत्यू होतात.
 
याशिवाय अनेकदा खेड्यापाडयांमध्ये, दुर्गम वस्त्यांमध्ये साप चावल्यानंतर रुग्णाला डॉक्टरांकडे न नेता मांत्रिक किंवा भगताकडे नेलं जातं. ते प्रथमोपचारांऐवजी मंत्रतंत्र आणि जडीबुटी वापरून रुग्णाला बरं करायचा प्रयत्न करतात.
 
सिनेमामध्ये अजूनही एक गोष्ट अनेकदा पाहायला मिळते, ती म्हणजे कोणाला साप चावला तर लगेचच तोंडाने ओढून विष काढलं जातं. पण डॉक्टर मात्र असं काहीही न करण्याचाच सल्ला देतात.
 
साप चावल्यानंतर नक्की काय करायचं?
संशोधकांच्या मते, भारतात जेवढे सर्पदंश होतात त्यांपैकी 70 टक्के सर्पदंश हे बिनविषारी सापामुळे झालेले असतात. 30 टक्के रुग्णांमध्ये चावलेला साप विषारी असतो.
 
पण नेमका कोणता साप चावला आहे, याची कल्पना रुग्णांना नसते.
 
त्यामुळे सर्पदंश झाल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाणंच योग्य.
साप चावल्यानंतर रुग्णालयात जाण्याआधी कोणतेही अन्नपदार्थ किंवा पर्यायी औषधं घेऊ नका.
रुग्णाने स्वतः चालत किंवा वाहन चालवत दवाखान्यात जाऊ नये. अँब्युलन्समधून किंवा दुसऱ्या एखाद्या वाहनातून रुग्णाला घेऊन जावं. अंगावरील दागिने तसंच अतिशय तंग कपडे काढून ठेवावेत.
सर्पदशांची जखम धुणे, तिथे चीर देणे, ती जागा घट्ट बांधणे, कोणत्याही झाडपाल्याचं औषध लावणे यांसारख्या उपचारांमुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच होऊ शकतं.
तज्ज्ञ सांगतात की, सर्पदंशानंतर रुग्णाला तातडीने रुग्णालयातच न्यायला हवं. घरगुती उपचारांच्या नावाखाली वेळ घालवणं योग्य नाहीये.
भारताकडे सर्पदंशावर पुरेसे उपचार आहेत का?
काट्याने काटा काढला, असं आपण म्हणतो त्याप्रमाणे सर्पदंशावर सापाचं विष हा उपाय असतो. बरीचशी विषरोधक औषधं ही सापाचं विष काढून त्यापासून बनवली जातात.
 
1895 साली फ्रेंच फिजिशियन अल्बर्ट कामेट यांनी भारतीय कोब्राच्या विषावर पहिलं विषरोधक औषधं बनवलं.
 
पण भारतात हे औषध वापरण्यामध्ये दोन अडचणी होत्या- एक म्हणजे औषधांचा पुरेसा साठा नाहीये आणि दुसरं म्हणजे हे औषध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं हेही आव्हान होतं.
 
याशिवाय रुग्णाला किती प्रमाणात आणि कसं औषध द्यायची याबद्दलही पुरेशी जागरुकता नाहीये. आपला मेडिकल स्टाफही पुरेसा प्रशिक्षित नसल्याचंही काही अहवालांमधून सांगण्यात आलं आहे.
 
प्रमुख विषारी साप
सगळेच साप हे विषारी नसतात.
 
भारतात सापांच्या 300 जाती आहेत. पण त्यांतील केवळ 60 जाती या विषारी आहेत. त्यांपैकी चार साप हे अत्यंत हानीकारक असतात.
 
मण्यार
 
मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, आणि काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. त्याचे खवले हे डोक्याकडे आणि शेपटीकडे कमी होत जातात.
 
घोणस
 
घोणस अजगराप्रमाणे दिसत असल्याने अनेकांचा गैरसमज होऊ शकतो. घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणार्‍या तीन समांतर रेषा आणि त्याचे बेडकासारखं तोंड. घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात. घोणसाचे विष अतिशय जहाल असते.
 
फुरसे
 
हा विषारी साप भारतात जवळजवळ सगळीकडे आढळतो. यांचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. या सापाची लांबी अतिशय कमी असते, पण त्याचं विष मात्र जहाल असतं.
 
किंग कोब्रा
 
किंग कोब्रा हा जगातील आकाराने सर्वांत मोठा विषारी सर्प आहे. घनदाट जंगलांमध्ये हा साप वास्तव्य करतो आणि माणसांच्या कमीत कमी संपर्कात येतो.
 
किंग कोब्राचा रंग ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवा, काळसर तपकिरी किंवा काळा असतो.पोट फिकट पिवळे पांढरे , खवले मऊ एकसारखे असतात. लहान नागराजाच्या काळ्या शरीरावर त्याला ओळखण्याची खरी खूण त्याचा फणा असतो. पूर्ण वाढ झालेल्या किंग कोब्राचे डोके मोठं वजनदार भासतं.
 
या सापांचं विष हे प्राणघातक असतं. म्हणूनच सर्पदंशापासून वाचण्याचा उपाय म्हणजे तात्काळ, वेळ न दवडता रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं.