शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (14:47 IST)

शतावरी अर्थात "१०० नर ताब्यात असलेली नारी"

शतावरी ही भारतभरात सगळीकडे वाढणारी, छोट्या जंगलांमधे, बागांमधे वाढणारी एक औषधी वेल आहे. ही कडू-गोड चवीची, काटेरी झुपकेदार आरोहिणी वेल, म्हणजेच औषधी वनस्पती मुख्यत: आम्लपित्त दोषासाठी वापरली जाते. शतावरी वनस्पतीची मुळे आणि पाने उपचारांसाठी वापरली जातात. 
 
भारतामधे शतावरी वनस्पती ही मुख्यत: स्त्रीयांसाठीची वनस्पती, अश्वगंधाच्या बरोबरीची मानली जाते. ह्या वनस्पतीचा प्रामुख्याने स्त्रीयांच्या प्रजोत्पादनासाठी उपयोग केला जातो, त्यामुळे शतावरी ह्या शब्दाचा अर्थच शत-आवरी म्हणजेच - "१०० नर ताब्यात असलेली नारी" असा होतो. ऑस्ट्रेलियात या वनस्पतीचा वापर गॅस्ट्रोइंटेस्टाईनल डिसॉरडर ह्या विकारासाठी आणि बाह्य जखमा साफ करण्यासाठी केला जातो. 
 
ह्या काटेरी झुपकेदार आरोहिणी वेलीच्या फांद्यांवर उभ्या रेषांमुळे पन्हळी तयार होतात. शतावरीच्या पानांना पात्राभास काण्ड असे नाव आहे. ही पाने गुच्छाने उगवतात. शतावरीची फुलेही गुच्छाने येतात. ही सुगंधी फुले पांढरी किंवा गुलाबी असतात. ह्या वनस्पतीला वाटाण्याच्या आकाराची फळे येतात. त्यामधे एक किंवा दोन बिया असतात. शतावरीला मूलस्तंभापासून जाड, लांबट गोल, दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी अनेक मुळे फुटतात. पावसाळ्याच्या सुरवातीला, मृगनक्षत्र सुरू होण्याच्या आसपास मुळापासून नवीन शाखा फुटतात व त्यानंतर फुले व शरद ऋतूत फळे येतात. 
 
शतावरी ही मुख्यत: स्त्रीयांसाठीची वनस्पती असली तरीही पुरषांनाही त्याचा वेगळ्या त-हेने उपयोग होतो. स्त्रीयांमधील प्रजोत्पादन शक्ती वाढवणे, त्यांना लैंगिक आत्मविश्वास देणे, लैंगिक इच्छाशक्ती देणे अशी अनेक कामे ही वनस्पती करते. स्त्री-पुरुष संबंधांमधे शतावरीमुळे एक आत्मविश्वास आणि खेळीमेळीचे वातावरण तयार होते. ह्यामुळे प्रजोत्पादन प्रक्रिया सुलभ होते. 
 
शतावरीचा वापर गर्भपात झालेल्या स्त्रीयांच्या उपचारांवर, गर्भाशयावर खूप प्रभावी रितीने होतो. रजोनिवृत्तीतून जात असलेल्या स्त्रीयांना, किंवा हिस्ट्रेक्टोमी झालेल्या स्त्रीयांना शतावरीची खूपच गरज असते. याने रक्तशुद्धीकरण तर होतेच, शिवाय प्रजोत्पादन अवयवांना सुद्धा त्याची मदत होते. शतावरी हे शरिरातील सत्त्व वाढवणारे औषध आणि सकारात्मक रितीने बरे करणारे औषध म्हणूनही ओळखले जाते. स्त्रीयांच्या स्तन वृद्धीसाठी शतावरीच्या मुळ्या दुधात वाटून लावल्या जातात. 
 
शतावरीचा अजून उपयोग पोटाचा अल्सर, ज्वर, शरिरपुष्टता, वात, पित्त, जुलाब यासाठीतर होतोच, शिवाय ब्रॉन्कायटिस, मुदतीचा ताप आणि मुख्य म्हणजे शरिरातील द्रव्याचा समतोल राखण्यासाठीही होतो. अशा त-हेने अनेक व्याधींसाठी उपकारक असलेल्या शतावरीस ’वनस्पतींची राणी’ संबोधले नाही तरच नवल!