मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. वेबदुनिया विशेष 07
  3. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

सुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा

तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अद्वितीय असे मानावे लागेल. स्वातंत्र्य मिळविण्याचे त्यांचे मार्ग वेगळे होते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याशी त्यांचा संघर्षही झाला. पण त्यांची लोकप्रियता मात्र या संघर्षानंतरही वाढतच राहिली.

लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव वेगळा होता. कटक येथे बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल रायबहादूर जानकीनाथ बोस कटक येथील नगरपालिका व जिल्हा बोर्डाचे प्रमुख होते. शहरातील बुद्धिमंतात आणि वकिलांमध्ये त्यांचे नाव घेतले जाई.

सुभाषचंद्र यांचे प्राथमिक शिक्षण युरोपियन शाळेत झाले. तेथे असलेल्या वातावरणाचा खोल परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडला. ते स्वतः धार्मिक असले तरी धर्माच्या नावावर चाललेल्या ढोंगावर त्यांचा विश्वास नव्हता. देवनशा शाळेत मॅट्रिकची परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी कोलकत्याच्या प्रेसिडेंट कॉलेजमध्ये प्रवेश केला. पण त्यावेळी ते अध्यात्मिक विचारांकडे झुकले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला.

याच विचारात ते गुरूच्या शोधात सोळा-सतरा वर्षाच्या वयात हिमालयात निघून गेले. चांगला गुरू त्यांना मिळाला नाही. पण स्वामी विवेकानंद यांच्या सानिध्यात राहून त्यांनी रामकृष्ण मिशन संदर्भात माहिती घेतली. त्यांच्या आई-वडिलांनी इंग्लंडला जाऊन आयसीएस करण्याचा सल्ला दिला. पण त्यावेळी वातावरण सरकारविरोधात होत होते. गांधीजींचे असहकार आंदोलन जोर पकडत होते. जालियनवाला बाग हत्याकांडाचा संताप अजूनही शांत झालेला नव्हता. अशावेळी सुभाषचंद्र यांचे रक्त तापत होते. या आंदोलनात उडी घेण्याची त्यांची इच्छा होती. शेवटी मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या सल्ल्यामुळे अखेर आयसीएस करण्यासाठी ते इंग्लंडला गेले.

१९२० मध्ये ते आयसीएस उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी घरच्यांना पत्र लिहिले. दुर्देवाने या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो आहे. पण मी प्रशासकीय अधिकारी बनणार की नाही हे मी सांगू शकत नाही. मला असे वाटते की मी माझा देश आणि ब्रिटिश साम्राज्य या दोघांची सेवा एकावेळी करू शकणार नाही. लवकरच मला यापैकी एक निवडावे लागेल.

त्यानंतर त्यांनी देशसेवेचा मार्ग पत्करला. परीक्षेनंतर मिळालेल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते भारतात परतले. १६ जुलै १९२१ ला भारतात परतल्यानंतर ते मुंबईत महात्मा गांधी यांना भेटले. तेथे त्यांच्यात एक तास चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी गांधीजींना विचारले होते, असहकाराचा अर्थ मला समजतोय. पण ही अहिंसा म्हणजे काय?

अहिंसेचा मार्ग त्यांना कधीच मान्य नव्हता. त्यामुळेच त्यांचे कायम गांधीजींशी मतभेद राहिले. पुढे २५ डिसेंबर १९२१ मध्ये प्रिंस ऑफ वेल्स कोलकता येथे आले. त्यावेळी संपूर्ण देशात त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. कोलकत्यात झालेल्या निदर्शनात भाग घेऊन सुभाषचंद्र यांना सहा महिन्याची शिक्षा झाली. त्यानंतर दासबाबू यांनी स्वराज दल स्थापन केले. सुभाषचंद्र या दलाचे प्रमुख होते. या दलाचे मुखपत्र फॉ़रवर्डचे ते संपादकही होते.

सुभाषबाबूंच्या मनातील मार्ग ब्रिटिशांनी ओळखून त्यांना १९२४ मध्ये नजरकैदेत ठेवले. त्यांच्यावर ते क्रांतीकारक असल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यावेळी दासबाबूंनी सुभाषचंद्र यांना सोडून द्यावे किंवा त्यांच्यावर खटला तरी चालवावा अशी मागणी केली. पण सरकारने त्यांना ब्रह्मदेश येथील मंडालेच्या तुरूंगात पाठवले. संपूर्ण देशात याविरूद्ध संतापाची लाट पसरली.

पुढे नंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण तेथून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. पुढे मलाया आणि सिंगापूर येथे भारतीय सैनिकांना एकत्र करून त्यांनी रास बिहारी बोस यांच्या सहकार्याने आझाद हिंद सेना स्थापन केली. ४ जून १९४३ ला सिंगापूरमध्ये या फौजेचे काम सुरू झाले. तेथेच त्यांनी भारताचे हंगामी सरकार स्थापन केले. पुढे जपानच्या सहकार्याने त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढाई सुरू केली. त्यांनी इंफाळ व कोहिमापर्यंत मजल मारली. पण शस्त्रसाधनांच्या कमतरतेमुळे त्यांना पुढे यश मिळू शकले नाही.

जपानच्या शरणागतीनंतर आझाद हिंद सेनेसमोरही कोणताच पर्याय नव्हता. २८ मे १९४५ नंतर आझाद हिंद सेनेचे संघटन संपुष्टात आले. त्याचवेळी सुभाषबाबू विमानाने टोकियोत चालले होते. पण वाटेतच विमान अपघात झाला आणि भारतात बातमी आली सुभाषबाबू अपघातात मृत्युमुखी पडले. त्यानंतर सुभाषबाबू जिवंत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. सुभाषबाबूंच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क असले तरी त्यांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीविषयीच्या स्मृती मात्र कधीच विसरल्या जाणार नाहीत.