रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (11:10 IST)

समजलंच नाही

हाफ चड्डीत सायकलच्या पुढच्या दांडीवर एका बाजूला दोन पाय टाकून तिरका बसायचो आणि बाबा अंगातला सगळा जोर लावून पायडल मारत सायकल पुढे न्यायचे. त्यावेळी मला फक्त सायकलला झूम करून येणारा वेगच समजायचा आणि मन सुखावून जायचं.. त्यामागे बाबांनी दातओठ खाऊन लावलेला तो जोर कधी जाणवलाच नाही! संसाराचा सगळा गाडा त्यांनी आणि आईनी असाच जोर लावून पुढे नेला. मला समजला तो माझ्या आयुष्याला मिळत राहिलेला वेग... समजली ती फक्त माझी होत असलेली प्रगती - शारीरिक वाढीतली, खेळातली, स्पर्धांमधली,  शिक्षणातली, व्यवहारज्ञानातली... आणि मी अभिमानानं सुखावत गेलो... त्यामागे आई-बाबांनी लावलेला जोर त्यांनी कुठून आणि कसा आणला हे समजलंच नाही.
ते वयच नव्हतं बहुदा, हे असलं काही समजून घेण्याचं. पण कालचक्राला सगळं समजतही असतं आणि उमजतही! प्रत्येक गोष्टीत बाबांना गृहीत धरणारा, ते आहेत, ते बघतील, ते करतील असं म्हणणारा मी अलगद स्वतः बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो समजलंच नाही.
 
तेव्हा आम्ही शनिवारवाड्यावर गणपती बाप्पा आणायला जायचो. ही मूर्ती घेऊ की ती घेऊ असं व्हायचं. वेगवेगळ्या मूर्ती बघत असताना त्यातून आपल्या घरी कुठली न्यायची याची निवड माझं 'वय' करायचं तर बाबांचा अनुभव आणि सुजाणपणा ती निवड करायचा. "पण बाबा ती कित्ती मस्त आहे? ती मूर्ती का नको?" असा हट्ट करणारा, प्रसंगी रडणारा मी,
"अरे! ही बघ ही घेऊया. ती छान आहे पण ती नाही चालणार आपल्याकडे." हे उत्तर ठामपणे कधी देऊ लागलो समजलंच नाही.
"बाबा आज मी करू देवपूजा?" "बाबा आज मी करू बाप्पांची आरती?" अशी हट्टपूर्वक विनंती करणारा मी कधी या सगळ्या गोष्टींना सरावलो समजलंच नाही.
आणि "अजून थोडा मोठा झालास की कर", "अरे हात दुखतील तुझे ताम्हन धरून, थोडा मोठा झालास की करायचीच आहे आरती," असं म्हणणारे बाबा अलगद आरतीच्या वेळी गर्दीत सगळ्यात मागे जाऊन कधी उभे राहू लागले ते ही समजलंच नाही.
 
आज वयाच्या अशा नेमक्या टप्प्यावर आलोय की सगळा पट उलगडल्यासारखा वाटतोय. मला पडणारे प्रश्न माझ्या मुलाला पडू लागलेत, मी करायचो तो हट्ट मुलगी करू लागलीये. आणि त्यावेळी बाबा द्यायचे तशी उत्तरं माझ्या तोंडी आलीयेत.
आजही बाप्पा आणायला आम्ही एकत्र जातो. 'सायकल'ची जागा आता 'सेदान'नं घेतलीये. पण "तुम्ही या घेऊन, मी हिच्या बरोबर घरी थांबून स्वागताची तयारी करतो." असं बाबा कधी म्हणायला लागले समजलंच नाही.
आरतीचं ताम्हन मला जड होईल, असा विचार करणाऱ्या बाबांना आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं जड होऊ लागलंय. त्यांचा तो जोर कधी, कसा निघून गेला समजलंच नाही.. 
 
बाबा ...  मला सायकलच्या दांडीवर बसवून वेगात पायडल मारण्याचा तो जोर तुम्ही कुठून, कसा आणला होतात, आणि कधी, कसा निघून गेला समजलंच नाही. पण तो जोर गेला कुठे? याचा उलगडा झालाय मला..
तो सगळा जोर तुम्ही माझ्या मनगटात भरलाय आणि ती सगळी जिद्द मला वारसा म्हणून दिलीये हे आता मला नक्की समजलं आहे!
 
मी हे बोलून दाखवणं कधी बंद झालं समजलं नाही, पण - 
आजही मला तुम्ही खूप आवडता.... अगदी गणपती बाप्पांइतकेच !!!!

लेखक : समीर गोडसे.