जादूचा दिवा दे मला बप्पा
हो म्हणून नुसता मारू नको थापा...
घासून मी त्याला इवले इवले हात,
होऊ दे म्हणेन फुलांची बरसात,
आकाशातून येऊ दे छान छान परी,
गोड हसणारी सुंदर अन् गोरी,
मारीन तिच्यासंगे खूप खूप गप्पा,
जादूचा दिवा दे मला बप्पा ...
दिवा म्हणेल ला हवं ते माग,
मी म्हणेन बाबांचा संपू दे राग,
आणू दे येताना टोपलीभर पेढे,
मागामोग येऊ दे खेळणी अन् घोडे,
देईन मी बाबांना गोड गोड पापा,
जादूचा दिवा दे मला बप्पा ...
दिव्या दिव्या म्हणेन पाड जरा पाऊस,
शेतकरीदादाची फिटू दे हाऊस,
चारा मिळू दे गाईगुरांना,
जंगलात नाचू दे ऐटीत मोरांना,
बागेत फुलू दे सुगंधीचाफा,
जादूचा दिवा दे ला बप्पा,
नुसता हो म्हणून मारू नको थापा....
शांता सलगर