दृष्टिकोण
"काय ही आजकालची मुलं! तरुण वयातच ह्यांची गुडघी काय दुखतात, कंबर काय अखडते! सकाळी उठून भराभरा कामाला लागायचं ते तर कुठेच गेलं...सतत बाम चोळत राहतात नि गोळ्या खात राहतात. तरी आमच्यासारखी कबाडकष्ट करावी लागली नाहीत. न धुणं न भांडी न केरवारा.." बागेत बाकावर बसल्येल्या आजीबाई आजोबांसोबत बोलत होत्या."
अगं काळ बदलत चालला आहे. आजकालची मुलं मेहनतीची कामं कमी करतात. त्यांचं जीवन यांत्रिक झालं आहे. सगळ्या कामांसाठी मशीनी आहेत. पायी चालायला नको, जीने चढा-उतरायला लिफ्ट असते. एक बटण दाबलं की सारी कामं होतात. सादा टीव्ही चा आवाज जरी वाढवायचा असेल तरी रिमोट आहे!!" आजोबा उत्तरले."
हो न! आपण निदान तो लैंड लाईन फोन वाजला की कसे धावात जायचो ..आता तर चोविस तास तो मोबाईल हातातच असतो."
"सारं जग रिमोट मय झालंय. काही वर्षानंतर तर लोकं एका जागेवरून हलणार सुद्धा नाही, सारे काम बसल्या जागेवरूनच करतील का कोण जाणे!!" आजोबांच्या बोलण्यात एक काळजी होती.
त्याच बागेत व्हीलचेअर वर फिरायला आलेली ती मात्र हा संवाद ऐकून सुखावली. एक सोप्पं आणि आत्मनिर्भर भविष्य तिच्या डोळ्यात तरंगत होते.
©ऋचा दीपक कर्पे