शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

कमळ आणि चिखल

एका देवळाच्या मागे एक दलदलयुक्त तळे असते. त्यात खूप सुंदर कमळे उमललेली असतात. त्या कमळामुळे परिसर खूप सुंदर दिसत असतो. येणारा जाणारा प्रत्येक जण कमळांची प्रशंसा करत असतो. 
 
एक दिवस त्यातील एक कमळ स्वतःची स्तुती ऐकून खूश होते. त्याचवेळी त्याच्या मनात येते मी इतके “सुंदर” पण हे काय?! माझ्या आजूबाजूला इतकी घाण, अस्वच्छता. याने माझे सौंदर्य कमी होत आहे. आणि सारखा असाच विचार करून ते कमळ दुःखी होऊ लागते. मग ते देवाकडे तक्रार करते. देवा तू मला असं चिखलात का ढकललं? ते काही नाही तू मला लवकर एका सुंदर तळ्यात राहायला जागा दे. 
 
देव त्याला समजावतो पण ते कमळ काही ऐकत नाही. मग देव त्या कमळाची रवानगी एका राजवाड्यातल्या स्वच्छ तळ्यात करतो. तिथे पण जाणारा येणारा प्रत्येक जण त्या कमळाची स्तुती करतो. अन तळे स्वच्छ असल्याने तिथली माणसे, राजपुत्र  छान म्हणून त्या कमळाला हात लावून ओरबाडू लागतात. त्या कमळाला आता पूर्वीपेक्षा जास्त त्रास होतो. 
 
मग ते देवाकडे जाऊन क्षमा मागते. मग देव त्याला समजावतो अरे तुझ्या आजूबाजूला चिखल हे तुझ्या संरक्षणार्थ व हिताचे आहे. कुठलीही गोष्ट उगाच नसते. कमळाला ते पटते आणि ते पूर्वीसारखे जुन्या तळ्यात आनंदाने राहू लागते. 
 
थोडा विचार केला तर आपल्या आजूबाजूचे होणारे दुःख, त्रास हे आपले बळ वाढवणारे व हिताचेच असते. पण अहंकारामुळे आपण ते दुर्लक्ष करतो. थोडे आत्मनिरीक्षण, संयम बाळगला तर अशा दुःखरुपी चिखलात पण आपण आनंदाने व समाधानाने कमळासारखे दिमाखात उभे राहू शकतो.
 
तात्पर्य:- " या विश्वात कुठलीही गोष्ट उगाच नसते , ईश्वराची योजना दिव्य आहे अचूक आहे "