शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (12:06 IST)

बोध कथा : मनःशांती

एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते.
 
विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे?
 
सस्मित चेहर्‍याने विष्णूंनी उत्तर दिले, 'तू अजिबात चिंता करू नकोस. मजजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत  आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.'
 
लक्ष्मीने विचारले, 'सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.' विष्णू म्हणाले, 'तिचं नाव आहे शांती' जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे.