गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

दिवाळीतले किल्ले-एक आठवण

आजकाल सगळ्याच गोष्टी बाजारात मिळू लागल आहेत. मोठमोठय़ा मॉलमधून तर सर्वच वस्तू उपलब्ध असतात. आकाशदिवे, पणत्याच काय, आजकाल छोटे छोटे किल्लेही तिथे विकत मिळतात. या मुलांना कष्ट नको आहेत. त्यांना सर्व आयते हवे आहे. आईबाबांनी किल्ले, मावळे विकत आणायचे आणि ते मांडूनही त्यांनीच द्यायचे. त्यात त्या चिन्यांनी तर आपली बाजारपेठ काबीज करून आपल्या सामान्य, घरगुती वस्तू बनविणार्‍यांचे बाजार, व्यापार संपुष्टात आणले आहेत. 
 
माझ्या लहानपणीचा अभ्रकाच्या कागदाचा रंगीबेरंगी, खाली पतंगाच्या शेपटीसारख्या असंख्य शेपटय़ा असलेला स्वदेशी आकाश दिवा विक्रीला येत असेल पण चिन्यांच्या स्वस्त आणि तकलादू गोष्टींची भुरळ पडलेल्या आपणा सर्वांच्या घरांवर चिनी बनावटीचेच आकाशदिवे आणि लाईटच्या रंगीबेरंगी माळा दिसू लागल्या आहेत. 
 
आम्ही चाळीत शोभानगरला राहात होतो. तेव्हा आमच्या लहानपणी त्या शोभानगरात 14 बिर्‍हाडांची एक चाळ अशा सहा चाळी आणि त्या समोर सहा टीन बंगले होते. प्रत्येक घरात दोन किंवा तीन मुले असत. आमच्या चार नंबर चाळीतच आम्ही एकूण वीस, बावीस मुले होतो. सहामाही परीक्षा सुरू झाली, की ती कधी संपते आणि दारात विटा, कौले गोल आणि पिवळट मातीच्या सहायाने किल्ले कधी बनवतो असे आम्हाला व्हायचे. तळमजल्यावर राहणार्‍या निम्मयाजणांकडे तरी किल्ला बनवला जायचा. 
 
आम्ही तिघे भाऊ प्रथम विटा गोळा करत असू किंवा परसदारातील बागेतील आळे केलेल्या विटा घेत असू. ह.दे. प्रशालेतून येताना तिथे मड्डमचा एक भूतबंगला, मधल्या वाटेवर होता. तिथे गोल कौले घरावर होती, सहज हाताला यायची, पाच, सहा बुरूजांसाठी पाच, सहा कौले आम्ही तिथून आणत असू. आमच्या चाळीशेजारी रेल्वे अधिकार्‍यांचे बंगले होते. त्याच्या मागील बाजूस कंपाऊंडभोवती मुरमाड अशी ती पिवळी माती होती. ती उकरून पोत्यात भरून, सायकलवर लादून आणायची. घरातील लोखंडी चाळणीने ती माती चाळून घ्यायची, ती मऊ चाळलेली माती आम्ही किल्ला बनवायला वापरत असू. विटा आडव्या उभारून तटबंदी बनवायची. त्याला थोडय़ा थोडय़ा अंतरावर कौले उभी करून सहा, सात बुरूज तयार करायचे. माती पाण्यात कालवून त्याच्या लगद्याने भोवतालची तटबंदी, बुरूज तयार व्हायचे. 
 
मधल्या भागात डोंगराळ असा भाग दगड, मातीचा चाळ हे टाकून तयार केल्यावर त्यावर शिवाजी महाराजांसाठी आसन असायचे. तटबंदीवर मातीचे छोटे छोटे त्रिकोण लावून किल्ल्यासारखे बनवायचे. चाळीच्या मागील बाजूस, भैय्या शेठजींचा बंगला होता. त्या बंगल्यातून चालत मागे शासकीय दूध डेअरीच्या रस्त्यावर आम्ही जात असू, तिथून बैलगाडय़ा, गाई, म्हशीच्या वर्दळीने शेण पडलेले असायचे. ते एका पाटीत गोळा करून आणून, पाण्यात कालवून तो किल्ला तटबंदीसह दोन दिवस सारवायचा. मग त्याला चुना किंवा काव कालवून रंग द्यायचा आणि काळ्या किंवा पांढर्‍या रंगाच्या रेघा मारून भिंतीसारखा किंवा विटांचा आकार चितारायचा. मधल्या भागात काळी माती टाकून त्यावर आळीव पेराचे. ते आळीव उगवले की किल्लयाची शोभा वाढायची.
 
किल्ल्याच्या मुख्य दरवाजा दोन विटा उभ्या, दोन आडव्या ठेवायच्या, बाहेर दोन कौलाचे बुरूज दोन बाजूला आणि मधल्या भागाला चिखलाचा घट्ट लादा घेऊन त्याला कमानीचा आकार द्यायचा, समोर वहीच्या पुठ्ठय़ाचे दाराचे आकार कापून, रंगवून दिंडी दरवाजा बनवायचा आणि संपूर्ण किल्ला तयार झाला की, त्यावर सिंहासनाधिष्ठित छ. शिवाजी महाराज, तटबंदीवर मावळे, बुरूजावर तोफा ठेवायचा. त्यावेळी ऐतिहासिक काळात गेल्याचा आम्हा तिघा भावांना आनंद व्हायचा.
 
सर्व शोभानगरमध्ये आमचा तो भुईकोट किल्ला दृष्ट लागणसारखा सुंदर व्हायचा. रात्री त्यावर पणत्या ठेवल्या जायच्या आणि वरच आकाशदिव्यातून त्यावर रंगीबेरंगी प्रकाश पडला की, किल्ला नितांत सुंदर दिसायचा. दिवाळीचे चार दिवस आम्ही तो किल्ला खूप जपायचो कारण आमच्यावर खुन्नस असणारी काही मुले तो किल्ला तोडण्याचा दरवर्षी प्रयत्न करायची. त्यांच्यावर खिडकीतून बारीक लक्ष ठेवून तो किल्ला वाचवायचा म्हणजे आम्हाला लुटूपुटूची गनिमी काव्याची लढाई केल्याचा आनंद व्हायचा.
 
पुढे जसजसे आम्ही मोठे होऊन वरच्या वर्गात गेलो तेव्हा आपोआप अभ्यासामुळे मनात असूनही किल्ला बनविणे कमी झाले. आज 56 व्या वर्षीही दिवाळी आली की ती ऊर्मी दाटून येते आणि आठवणीतले दिवाळीत बनवलेले सर्व किल्ले समोर येऊन जातात. आमच्याही   मुलांनी कधी किल्ले बनविले नाहीत फक्त आमच्या आठवणी ऐकून घेतल्या. आजकाल किल्ला बनविणच्या स्पर्धा होतात, तेथील किल्ले पाहूनच समाधान मानायचे.

गिरीश दुनाखे