शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

Love Tips : सोळावं वरीस धोक्याचं...

तारूण्याच्या दिशेने झुकणारे सोळावे वर्ष खरोखरच धोक्याचंच असतं. या वयातच प्रेमाच्या विषाणूची बाधा होते. त्याच्या किंवा तिच्या आठवणींनी व्याकूळ होण्याचा हाच खरा काळ असतो. करीयरची शिडी चढण्याच्या या काळातच प्रेमाची गाडीही भरधाव वेगाने सुटलेली असते. म्हणूनच 'सोळावं वरीस धोक्याचं' असं म्हटलं जातं. 
 
या वयातल्या तारूण्य भावना सहाजिक असतात. शिवाय काही अनुकरणातूनही येतात. म्हणूनच या काळात स्वत:ला जपलं पाहिजे. कारण घसरण्याच्या जागा या काळात अजिबात दिसत नाहीत. म्हणूनच योग्य ठिकाणी सावरलं नाही तर घसरणे अटळ आहे. प्रेमाच्या विषाणूची बाधा होण्यात गैर काही नाही. पण हा विषाणू तुमचे करीयर आणि नातेसंबंध यांचा सत्यानाश करू शकतो. त्यामुळे याचा डंख मर्यादित राहू द्यायला शिकले पाहिजे. 
 
घाईगडबडीत घेतलेला निर्णय पश्चातापाशिवाय काहीच देत नाही. सोळाव्या वर्षी 'तो' तिच्या व 'ती' त्याच्याकडे पहाणे स्वाभाविक आहे. परंतु, यात स्वत:चा तोल सांभाळणे अधिक महत्त्वाचे असते. स्वप्न पाहण्याचा सगळ्यांना हक्क आहे. मात्र ती पाहण्याचाही कुठला काळ असतो याचे भान तरूण-तरूणींनी ठेवले पाहिजे. या वयात घेतलेले निर्णय सहसा चुकीच्या मार्गाने जाणारे असतात. त्यामुळे घरच्यांचा विरोध पत्करावा लागतो. एका बाजूला करियर तर दुसर्‍या बाजूला 'प्रेम' अशी 'द्विधावस्था' होते. अशा काळात प्रेमाची बाधा अभ्यासाला आपल्यापासून दूर करते आणि मग ही प्रेमी मंडळी लपून छपून प्रेमाचे रंग उधळत असतात. 
 
आता पुढे काय करायचे? हा प्रश्न भंडावून सोडतो. आपलं गुपित घरच्यांना कळले तर काय होईल? अशा दडपणामुळे वैफल्य निर्माण होते. त्यामुळे समाजात मनोरूग्णांची संख्या सतत वाढत आहे. 'प्रेम' करणे चुकीचे नाही. परंतु, स्वत:च्या पायावर उभे राहून 'प्रेम' केवळ करायचे नाही तर ते शेवटपर्यंत निभवायचे असते. कारण प्रेम करणे सोपे आहे, मात्र ते निभवणे कठीण आहे. 
 
आपल्याला प्रत्येक वयात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे घाईत घेतलेला निर्णय भविष्याची डोकेदुखी ठरता कामा नये. त्यामुळे सोळाव्या वर्षात तोलून मापून पाऊल उचलले पाहिजे. 
 
सोळाव्या वर्षी घ्यावयाची काळजी- 
* आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. शिक्षणच आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडेल. 
* लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका, निर्णय घेताना विवेकबुध्दीचा वापर करा. 
* काहीच सुचत नाही, अशा स्थितीत विश्वसनीय मित्राचा सल्ला घ्या. 
* आपले चुकीच्या दिशेने पडणारे एक पाऊलही कुटुंबासाठी नुकसानदायी ठरू शकते.
* तारूण्याच्या उंबरठ्यावर चुकीचा निर्णय किंवा चुकीच्या दिशेने पडणारे पाऊल भविष्य उध्ववस्त करू शकते. 
* आपल्या मनातील गोष्ट आई- वडिलांसोबत शेयर करा, त्याने तुमचे मन हलके होईल व अभ्यासात तुमचे मन रमेल.