अजून उजाडत नाही गं, नाही गं
दशकांमागुन सरली दशके
अन् शतकांच्या गाथा गं,
ना वाटांचा मोह सुटे, वा
ना मोहाच्या वाटा गं,
पथ चकव्याचा गोल सरळ वा
कुणास उमगत नाही गं,
प्रवास कसला फरफट अवघी,
पान जळातुन वाही गं॥
कधी वाटते दिवस-रात्र हे
नसते काही असले गं,
त्यांच्या लेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले गं,
स्पर्श आंधळे, गंध आंधळे
भवताली वनराई गं,
तमातली भेसूर शांतता
कानी कुजन नाही गं॥
एकच पळभर एखादी कळ
अशी सणाणून जाते गं,
क्षणात विरती अवघे पडदे
लख्ख काही चमचमते गं,
ती कळ सरते, हुरहुर उरते,
अन् पिकण्याची घाई गं,
वर वर सारे शिंपण काही
आतून उमलत नाही गं॥
– संदिप खरे