बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (19:12 IST)

तू नसशील

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होई

पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजता ना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.

एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळझळती  केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारख तू
म्हणाल होतास,
“आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? ”
हे सारे उद्याही तसेच असेल.

ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील
संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात 
अवघा आसमंत न्हाउन निघेल.
आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा
कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल
हे सारे तसेच असेल
फक्त तू नसशील.तू नसशील

मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची
लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.
 
– अनुराधा पोतदार