शनिवार, 28 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

आठवांचे गाव

अमोल कपोले

आठवांचे गाव
तुझ्या माझ्या अंगणात
पावसाचा ओला वारा
तुझ्या माझ्या आठवांचा
आज खळाळला झरा

तुझ्या माझ्या अंगणात
पावसाचे चार थेंब
तुझ्या माझ्या अद्वैताचे
त्यात उमटले बिंब

तुझ्या माझ्या कानातून
पावसाचे ओले श्वास
तुझ्या माझ्या रितेपणी
भेटीचे ते जुने भास

तुझ्या माझ्या उरी झरे
पावसाची मुकी सर
तुझ्या माझ्या ओळखीचा
अर्थ होई तिचा स्वर

तुझ्या माझ्या असण्याला
अशा पावसाचे नाव
त्याच्याविना तुझे माझे
सुने आठवांचे गाव !