इकडून-तिकडून माणूस घेऊन येतो संदर्भ आई-वडिलांचे, शेजार्यांचे शिक्षणाचे आणि व्यवसायाचे
त्या संदर्भातूनच एका आशयघन, अर्थगर्भ आयुष्याचा आलेख रेखला जातो
मनाच्या पाटीवर साकार होतात एका गूढ पण ओढ लावणार्या कथेचे आराखडे जीवनपटावरील ओरखड्यांचेही हिशोब लावले जातात काटेकोरपणे
कुणीतरी गौरवितं, गुणी दूषणं देतं राग-विरागाचं बीज पेरलं जातं नकळतच जीवनाला वेग येतो एका असोशीनं जीवन भोगलं जातं
जीवन तेच, पण एका तिर्हाइताच्या दृष्टीनं त्याला न संदर्भ, ना अर्थ ना आशय, ना मूल्य मीच माझ्या घरात जेव्हा असा होतो बाहेरचा तेव्हा पाटीच्या कोर्या गंधानं होतो वेडापिसा.