बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Updated : मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (10:40 IST)

मराठी साहित्यातील अजरामर कवियत्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी

bahinabai choudhari
बहिणाबाईचा जन्म जळगावपासून २ कि. मी. अंतरावरील असोदे गावचा. असोदे गावातील प्रतिष्ठित महाजन घराण्यात त्या जन्माला आल्या होत्या. वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाबाई चौधरींचा, जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. सासरी एकत्र कुटुंबात बहिणाबाईना सर्वांचा स्नेह लाभला. पण अगदी तरुणपणीच त्यांना वैधव्य आले. सुरुवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नव-याच्या मृत्युनंतर बहिणाबाईना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली एक कन्या काशी आणि दोन पुत्र ओंकार आणि सोपान यांच्यावर चांगले संस्कार घडवले.
 
घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना काव्य सुचले आणि ते काव्य मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरले. मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे. पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर अनुभवांनी समृध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतेच. घराची चौकट आणि अगदीच झाले तर शेत अशा दोनच टप्प्यांत स्त्रियांचे जीवन बांधले गेले होते. अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता. तो होता काव्याचा. वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते आणि तेच स्त्रियांनी निवडले. त्यामुळेच मराठीला समृध्द अशी स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली. स्त्रीगीतांची मराठीतील परंपरा समृध्द आहे आणि तिच्या अग्रणी आहेत अंगभूत काव्याचं लेणं लाभलेल्या बहिणाबाई चौधरी.
 
बहिणाबाईच्या कवितांतून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्या-नात्यांतील परस्परसंबंध जाणवतो, स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो, उपदेशाचे देशी बोल जाणवतात, सहजसुंदर विनोदाची खोली जाणवते. त्यांच्या कवितांतून गद्य वाक्प्रयोग, बोली भाषेची नाना सुंदर वळणे, बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाफ जाणवतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भिडतो. वेडीवाकडी वळणं न घेता येणारी सहजसुंदर अशी बहिणाबाईची कविता आपल्याला शब्दांतून जाणवते.
 
बहिणाबाईच्या कवितांतून निसर्ग आपल्याला अनेक रुपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाची कितीतरी रुपं बहिणाबाईच्या कवितांतून भेटतात. बहिणाबाईचे आयुष्य शेती आणि घर अशा दोन टप्प्यांतले असल्यामुळे निसर्गविषयक काव्य करताना त्यातून आपोआपच आपल्याला शेतीशी संबंधित ब-याच घटनांचे चित्रण जाणवते.
 
बहिणाबाईच्या काव्याच्या निमित्ताने जळगाव-धुळे जिल्ह्यातील अहिराणी बोली प्रकाशात येते. अहिराणीच्या बोलीभाषेचे स्वरूप या काव्यातून समजते.
 
मराठी साहित्यात ज्या मोजक्या स्त्री साहित्यिकांनी दर्जेदार साहित्यनिर्मिती केली आहे, त्यापैकीच एक असणा-या बहिणाबाई चौधरी. पण अशिक्षित असूनही जे साहित्य त्यांनी निर्माण केले त्याला खरोखरच तोड नाही आणि हे जाणून घेण्याकरता तरी एकदा का होईना बहिणाबाईच्या काव्याचा आस्वाद घेतला पाहिजे.
 
बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला.