गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (16:29 IST)

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे

असे म्हणतात की लहानपणी शिकलेल्या गोष्टी, ऐकलेले सगळे आपले व्यक्तित्व घडवतात. बालपणी उमटलेले ठसे आजन्म आपल्या मनावर कोरलेले राहतात. मोठ्यापणी आपण जे काही वागतो, बोलतो ती लहानपणची शिकवण असते, तेच अनुभव आपल्या कामी येतात आणि आपण पुढच्या वाटचालीसाठी तयार होतो. तरुणावस्थेत आपलं विश्वच वेगळ असतं, युवा म्हणजे वायु असं म्हणतात ना हे खरेच आहे की कारण या अवस्थेत आपण सतत् गतिमान असतो आणि आजच्या तरुणांबद्दल सांगायचे झाले तर ही पिढी कुशाग्र, तार्किक आणि बुद्धिमान आहे! 
 
ज्या भारत देशात आपण राहतो या जागेची किमया अशी की पुरातनकाळापासूच या मातीला तरुणाईचं प्रेम लाभलं आहे. आज आपल्या देशात अधिकाधिक संख्येत अत्यंत हुशार, तंत्रज्ञानाचा वापर करणारे, वैचारिक क्षमता असलेले, योग्य निर्णय घेण्यात सक्षम आणि ऊर्जेचा भंडार असलेले तरुण आहे. जे सतत् भारतभूमीची सेवा करून देशाचं नावं विश्वपटलावर स्थापित करून राहिले आहे! 
 
अश्या एका तरुणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्यानी एक अत्यंत वेगळा मार्ग निवडून तरुण पिढीसमोर उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत केले आहे. आजच्या उच्चशिक्षण आणि विदेशात नौकरीचे स्वप्न रंगवणार्या तरुण पिढितला एक आगळावेगळा तरूण आहे सौरभ कर्डे...
 
सौरभ हा मूळचा पुण्याचा. एक अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेला सर्व साधारण मुलगा पण त्याच्या कामगिरीमुळे तो अजिबात वेगळा सिद्ध झाला! 
 
माझे आवडीचे विषय म्हणजे इतिहास, त्यातील विविध घटनाक्रम, युद्ध असे आहेत. मराठी माणसाचं दैवत म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांनी स्वराज्यासाठी केलेली धडपड, त्यांचे मावळे या विषयांवर चर्चा किंवा व्याख्यान असले तर मला ते ऐकायची जाणून घ्यायची तीव्र इच्छा असते, तसेच एक व्याख्यान होते, "हिंदवी स्वराज्याचे शिलेदार" आणि वक्ते होते "श्री सौरभ कर्डे". हे वाचून माझ्या डोळ्यासमोर एक पन्नास वर्षाचा, खादीचा कुरता-पायजामा घातलेला, जाड भिंगाचा चश्मा आणि अर्धवट पांढऱ्या केसांचा माणूस उभा राहिला. मी काय तुम्ही पण हाच विचार केला असता. कारण विषयच इतका मोठ्ठा आणि गंभीर होता. 
 
इतिहासाची सखोल माहिती, पात्र, घटनाक्रम, तारखा, वेळ, हे सगळे व्यवस्थितपणे अभ्यास करायला अर्ध आयुष्य पण कमी पडतं. तरी पन्नास वर्षाचं असणं तर गरजेचं आहे हे असं मी स्वताशीच बोलत असतांना एक मुलगा तिथे समोर बसलेला दिसला. वय २४-२५ वर्षे, सावळ्या रंगाचा, डोळ्यावर स्टाइलिश चश्मा लावलेला, मला थोडं आश्चर्यच वाटलं, असही वाटलं की कोणी रटन्तु अशणार, थोड्याफार गोष्टी ऐकल्यावर फुकट प्रसिद्धी मिळवायला बरेच प्रकार असतात आजच्या काळात..... असा विचार माझा मनात सुरू असताना काही वेळात औपचारिकता पूर्ण करून त्याने व्यासपीठ गाठलं! त्यानंतर जे काही घडलं ते फार अचंबित करणारं होतं. मला तर विश्वासच होत नव्हता, दीड तास तो तरुण धाराप्रवाह बोलत होता आणि मी डोळे विस्फारून त्याचाकडे बघत होते. 
 
शिवाजी महाराज, मावळे, युद्ध, गनिमीकावा, सगळ्या विषयांवर तो इतकं सुरेख आणि ओजस्वी व्याख्यान करत होता की मला धक्काच बसला. पण खरं सांगू या धक्क्याने मन फार सुखावले, किती वयाचं ते पोर?? केवढा विशाल आणि गौरवास्पद विषय, कसाकाय हा इतकं सगळं बोलला असणार??? मी जाणून घ्यायचं ठरवलं, त्याला भेटून एकदा तरी त्याच कौतुक करायचं हा निर्धार केला! मला त्याचाविषयी जी माहिती त्यांनी सांगितली ती अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे
 
सौरभ महेश कर्डे हा पुण्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलचा एक अत्यंत बंड आणि डेंबीस मुलगा होता. शाळेतून पळून लालमहालात व शनिवारवाड्यात जायचा. महाराष्ट्राचे दोन मानबिंदू यांचा वास्तूत खेळत- बागडत त्यांच लहानपण गेलं. घरात आई-वडिल आणि लहान भाऊ होते. घरासमोर राहणाऱ्या एका दारूड्यामुळे या मुलांच्या कानावर घाणेरड्या शिव्या पडत असत, त्यावर युक्ती म्हणून आईने शिवाजी महाराज, स्वराज्य, मावळे, अशा निरनिराळ्या कैसेट्स आणून लावायला सुरुवात केली. हा नियम अनेक वर्षे चालला, आणि या एका घटनेमुळे सौरभचं आयुष्य पार बदललं. ही सर्व माहिती सौरभच्या मनावर कोरल्या गेली! पुरंदरे, वैद्य, चिंचोळकर, निनाद बेडेकर अशा अनेक इतिहासकारांनी त्याच्या बालमनावर शिवाजी महाराज आणि स्वराज्याबद्दल अतुलनीय प्रेम आणि आस्थेच निर्माण केलं!
 
 या सगळ्याचं श्रेय सौरभ आपल्या आई- वडिलांना देतो तसेच शाळेत दहाव्या वर्गात असतांना त्याचातील हा गुण एका शिक्षकांनी ओळखला. त्यांनी सौरभला वर्गात शिवाजींविषयी बोलतांना ऐकून प्रोत्साहन दिले व पुढे फ्री तासात सगळ्या वर्गांमधून भाषण द्यायला सांगितले, परिणामस्वरूप सौरभ आता फक्त वर्गात नव्हे तर इतर सर्वांसमोर व्याखान करू लागला. अश्या प्रकारे एका बंड मुलाचं रूपांतर एका शिवभक्तात झालं. 
 
पुढच्या प्रवासात त्याचा कॉलेजमध्ये बीए द्वितीय वर्षाला इतिहासाच्या पुस्तकात महाराजांविषयी चुकीचे मजकूर होते, सगळे गपचूप वाचायचे व घरी जायचे परंतु लहानपणापासून शिवरायांची भक्ती करणाऱ्या सौरभला हे काही पटलं नाही. त्यांनी तीव्र निषेध केला आणि त्या पुस्तकातील मजकूर बदलायला प्रकाशकाला भाग पाडले. आता सौरभ एक आंदोलन कर्ता झाला होता. शिवाजी महाराजांविषयी किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागेल असं काही घडलं तर विरोध करायचा, सामोरी जायचं आणि त्यांना त्यांची चूक सांगायची, हे आता त्याचा जीवनाचं उद्दिष्ट झालं होतं. 
 
जितकी ओजस्वी त्याची वाणी तेवढीच प्रखर त्याची लेखनी पण आहे. "हिंदवी स्वराज्याचे शिलेदार" भाग १ व २, "असे होते शिवराय" पुस्तक, व्रुत्तपत्र, सोशल मीडिया, लेख, अश्या अनेक प्रकारांनी तो सातत्याने हे कार्य पुढे नेतोय. गावागावांमध्ये जाऊन तिथल्या लोकांना माहिती देणं, भाषण करणं, वेगवेगळ्या शहरात स्वराज्य आणि शिवशाही वर व्याख्यान, तरूणांशी संवाद, लहान मुलांना गोष्टी सांगणं असे अनेक उपक्रम तो फार जिद्दीने व उत्साहाने करतो. केवळ त्याचा प्रयत्नांमुळे "एस पी कॉलेज" पुणे येथे " शिवचरित्र वर्ग" सुरू करण्यात आला! त्याचे जास्तीत जास्त श्रोते ५ ते २५ या वयोगटातील आहे. यावर त्याचं म्हणणं आहे की तरुणांना आणि लहानमुलांना हे कळलच पाहिजे. 
 
सौरभ हा वादन कलेत पारंगत असून पखावज, म्रुदंग, तबला अशा वादकांचा उत्तम वादक असून अनेक नामवंत कलावंतांसोबत तो संगत करीत असतो. त्याच्या या अत्यंत विलक्षण कारकिर्दीसाठी अनेकदा पुरस्कार देऊन त्याचे कौतुक करण्यात आले आहे. आदर्श युवा, सिंहगर्जना, कसबा कार्य गौरव, स्वराज्य शिलेदार असे अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहे. इतकच नव्हे तर ज्या आईने त्याला घडवलं त्यांना "आदर्श माता पुरस्कार" देण्यात आला आहे. फक्त २५ वर्षाच्या वयात मागचे १० वर्षे तो सतत् शिवाजी महाराजांविषयी बोलतोय, भाषण करतोय, संवाद साधतोय, यावर त्याच म्हणणं आहे "शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला सांगणे ही या राष्ट्राची सेवा करायची संधी मला मिळाली आहे. महाराजांसोबत असणाऱ्या, त्यांचा खांद्याला खांदा लावून झुंजणार्या, वेळ प्रसंगी बलिदान करणाऱ्या शूर मावळ्यांची कथा आजच्या तरुण पिढीला, लहान मुलांना कळलीच पाहिजे". 
 
अश्या सुंदर विचारांचा आणि ओजस्वी वाणी असलेल्या सौरभच्या मनात काय असतं जेव्हा तो इतरांना पाहतो, तर यावर त्याच मत फार स्पष्ट आहे, तो म्हणतो "माझे अनेक मित्र सवंगडी आज उच्चपदावर आहे, कोणी विदेशात आहे, कोणी नामवंत डॉक्टर कोणी आय ए एस ऑफिसर आहे, कोणाकडे भरपूर पैसा तर कोणाकडे मोठ्या गाड्या आहेत पण मी माझ्या या जीवनात फार आनंदी आहे. माझ्या कडे जरी ते सर्व नसलं तरी जे समाधान या कामातून मिळतं ते फार मोठ्ठं आहे. व्याख्यान झाल्यावर इतर काही मिळो न मिळो पण लोकांच्या मनात माझ्या बद्दल जे आदर, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण होतो हाच खरा खजिना आहे. मी त्यामुळेच इतका सुखी आहे"
 
सौरभने निवडलेला हा मार्ग आणि आत्तापर्यंत केललं कार्य हे निश्चितच फार कौतुकास्पद व अभिनंदनास्पद आहे. आजच्या तरूण पिढीपर्यंत स्वराज्याच्या इतिहासापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व ऐतिहासिक महापुरुषांचे जीवन चरित्र व ऐतिहासिक माहिती पर्यंत सर्व गोष्टी पोहोचविण्यासाठी तो दिवसरात्र परिश्रम करतोय. सध्या तो "सर सेनापति हंबीरराव मोहिते" या निर्माणाधीन चित्रपटात ऐतिहासिक घटना, लढाई व बाकी प्रसंगाचे लेखन करतोय... सौरभला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा आणि अभिनंदन...