गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

उज्जैनची कालिका देवी

- अनिरुद्ध जोशी

धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला उज्जैनच्या कालिका देवी गडाचे दर्शन घडविणार आहोत. या गडावरील काल‍िका देवीचे हे मंदिर अति प्राचीन असून काल‍ी घाटात असलेल्या या मंदिराला कालिका मंदिर म्हणून ओळखले जाते. देवींच्या अनेक रूपांपैंकी कालिकेचे हे रूप अत्यंत प्रभावी आहे.

कवी कालिदास कालिका देवीचे उपासक होते. कालिदासांनी या मंदिरात पूजा-अर्चना करण्यास सुरवात केल्यापासून त्यांची प्रतिभा बहरली असे मानले जाते. त्यांनी रचलेले 'शामला दंडक' हे कालिका स्तुतीपर स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. महाकवीच्या मुखातून सर्वप्रथम हेच स्तोत्र प्रकट झाले होते, असे म्हटले जाते. येथे दर वर्षी आयोजित होणार्‍या कालिदास समारंभाच्या पूर्वसंध्येला कालिका देवीची आराधना केली जाते.

WD
या गडाच्या दर्शनासाठी रोज हजारो भक्तांची रांग लागलेली असते. या प्राचीन मंदिराचा इतिहास कोणालाही माहिती नाही. परंतु, या मंदिराची स्थापना महाभारत काळात झाली होती. तर मूर्ती सत्ययुगातली असल्याचे मानले जाते. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार परमारकालीन सम्राट हर्षवर्धन यांनी केल्याचा उल्लेख पुराणात आहे. संस्थान काळात ग्वाल्हेरच्या महाराजांनी मंदिराचे पुन:निर्माण केले.

का‍लिका देवी गडाचा शक्तीपीठात समावेश नाही. परंतु, उज्जैनमध्ये देवी हरसिद्धी शक्तीपीठ असल्यामुळे या मंदिराचे महत्त्व वाढले आहे. उज्जैनच्या क्षिप्रा नदी किनारी असलेल्या भैरव पर्वतावर देवी भगवती सतीच्या ओठांचा स्पर्श झाल्याचा उल्लेख पुराणात सापडतो.

नवरात्र महोत्सवादरम्यान मोठ्या यात्रा, उत्सव आणि यज्ञांचे आयोजन येथे केले जाते. या काळात दूरदूरवरून कालिका देवीच्या दर्शनाला लोक येतात.

कसे पोहचाल?

हवाईमार्गे- उज्जैन ते इंदुर विमानतळ सुमारे 65 किलोमीटरवर आहे
.
रेल्वेमार्गे- उज्जैन ते मक्सी-भोपाळ मार्गे (दिल्ली-नागपूर लाइन), उज्जैन-नागदा-रतलाम मार्गे (मुंबई-दिल्ली लाइन) आपण सहजपणे उज्जैनला पोहचू शकता.

रस्ता मार्गे- उज्जैन-आग्रा-कोटा-जयपुर मार्गे, उज्जैन-बदनावर-रतलाम-चित्तौड मार्गे, उज्जैन-मक्सी-शाजापूर-ग्वाल्हेर-दिल्ली मार्गे, उज्जैन-देवास-भोपाळ मार्गे देशातील कोणत्याही कानाकोपर्‍यातून उज्जैनला पोहचता येते.