बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By संदीप पारोळेकर|

खान्देशवासीयांचे कुलदैवत- मनुदेवी

महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना वेगळे करणार्‍या सातपुडा पर्वतराजीत निसर्गरम्य परिसरात श्रीक्षेत्र मनुदेवी हे खान्देशवासियांचे कुलदैवत वसले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल-चोपडा महामार्गाच्या उत्तरेस असलेल्या कासारखेडे-आडगाव गावापासून साधारण 8 किलोमीटरवर मनुदेवीचे प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजुंनी पर्वतराजी आणि हिरवळीने नटलेला आहे. संपूर्ण खान्देशातील नागरिक येथे पायी, वाहनाने येवून नवसाला पावणार्‍या मनुदेवीचे श्रध्देने दर्शन घेतात.

  WD
मुनदेवीच्या इथल्या वास्तव्यामागेही कथा आहे. इसवी सन पूर्व 1200 मध्ये सातपुडा पर्वत परिसरातील 'गायवाडा' येथे ईश्वरसेन नावाचा गवळी राजा राज्य करत होता. त्याच्याकडे भरपूर गायी होत्या. त्यातील काही गायी महाराष्ट्रातील तापी नदीवर तर काही मध्यप्रदेशातील नर्मदेवर पाणी पिण्यास जात असत. त्या काळी 'मानमोडी' या आजाराची साथ संपूर्ण सातपुडा परिसरासह खान्देशात पसरली. 'मानमोडी'ने अनेक लोक व गायी मृत्युमुखी पडल्या. 'मानमोडी' टाळण्यासाठी ईश्वरसेन राजाने 'गाववाडा' पासून 3 किलोमीटरवर जंगलात इसवी सन पूर्व 1250 मध्ये मनुदेवीची स्थापना केली. देवीचे मंदिर उभारले. मनुदेवी मंदिरापासून ते गायवाडा या तीन किलोमीटवर ठिकठिकाणी दिसणारी 13 फूट रूंद भिंत आजही त्याची साक्ष देते. मानमोडी व दानवापासून देवांचे रक्षण करण्यासाठी मनुदेवीला अवतार धारण केला असा उल्लेख देवी भागवतातही आढळतो. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी मनुदेवी सातपुड्यात वास करेल, असे श्रीकृष्णाने मथुरेला जाताना म्हटले होते, अशी आख्यायिका आहे.

  WD
मंदिराच्या परिसरात सात ते आठ विहिरी आढळतात. मंदिरातील मनुदेवीची काळ्या पाषाणाची शेंदूर लावलेली मूर्ती, गणपती, तसेच शंकराची पिंड, अन्नपूर्णा मातेची मूर्ती मंदिराचे बांधकाम करताना उत्खननात सापडल्या आहेत. मंदिराच्या चहुबाजुंनी उंच उंच कडे आहेत तर मंदिराच्या समोर असलेल्या सुमारे 400 फुट उंचीच्या कड्यावरून कोसळणारा 'कवठाळ' नदीचा नममोहक धबधबा भक्तांना आलेला प्रवासातील क्षीण नाहीसा करतो. कवठाळ नदीचे पाणी पाझर तलावात अडविण्यात आले आहे.

  WD
मनुदेवीच्या वर्षभरातून चार यात्रा असतात. चैत्र माघ शुध्द अष्टमीला नवचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी पिठोरी आमावस्येला यात्रा भरते. नवरात्रीचे पूर्ण दहा दिवस यात्रा असते. खान्देशातील लाखो भाविक देवीचे मनोमावे दर्शन घेवून नवस फेडतात. खान्देशातील नवदाम्पत्य देवीच्या दर्शनानंतरच संसाराला सुरवात करतात. वर्षभर येथे भाविकांचे रेलचेल सुरूच असते. 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर पूजेच्या साहित्यांची दुकाने आहेत. पूर्वी मनुदेवीला येण्यासाठी सातपुड्याच्या जंगलातून केवळ एकच पायवाट होती. आता तेथे शासन व सातपुडा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने खडीकरण व कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.

जायचे कसे?
रस्ता मार्ग - यावल व चोपड्याहून आडगाव (मनुदेवीचे) पर्यंत बससेवा आहे. तेथून रिक्षांने जावे लागते. किंवा खाजगी वाहनाने थेट मनुदेवीच्या मंदिरापर्यंत जाता येते.

रेल्वे मार्ग- भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. तेथे सर्व राज्यामधून येण्यासाठी रेल्वेगाड्या आहेत.