रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

श्री जगदंबा देवी

वेबदुनियाच्या धर्मयात्रा या भागात आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील 'श्री जगदंबा देवीचे' दर्शन घडविणार आहोत. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराची ख्याती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर पाथर्डी तालुक्यातील मोहटे या गावी देवीचे स्वयंभू मंदिर असून हे एक जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.

मोहटे गावातील दहिफळे घराण्यातील बन्सी दहिफळे हे माहुरच्या देवीचे भक्त होते. त्यांनी आपल्या भक्तीच्या जोरावर देवीला गावाजवळ येऊन दर्शन देण्याची प्रार्थना केली. तेव्हा देवीने स्वप्नदृष्टांत देऊन गावाजवळील डोंगरावर प्रकट होणार असल्याचे आपल्या भक्ताला सांगितले. त्यानुसार 'तांदळा' सापडेपर्यंत भाविकांमध्ये ती गायीच्या रुपात वावरली आणि प्रकट झाल्यानंतर ग्रामस्थांना गाय पुन्हा दिसली नाही अशी अख्यायिका आहे.

  WD
देवीचा तांदळा ज्या दिवशी प्रकट झाला तो दिवस आश्र्विन शुद्ध एकादशीचा होता म्हणून या दिवशी देवीचा यात्रा उत्सव साजरा केला जातो. हा तांदळा अत्यंत सुंदर व आकर्षक असून पूर्वाभिमूख म्हणजे माहूरगडाच्या दिशेने आहे. मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर देवीची न्हाणी व शिवमंदरी आहे. या न्हाणीत आंघोळ केल्यानंतर शरीर रोगमुक्त होते असा गावकर्‍यांचा समज आहे.
 
पाथर्डी तालुका हा राज्यात उसतोडणी कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. या मजुरांचे आराध्यदैवत आणि लोककलाकरांचे (तमाशा मंडळ) श्रद्धास्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. कारण, राज्यात लोक कलेचा पहिला नारळ मोहटादेवीच्या यात्रेत फोडला जातो आणि त्यानंतर राज्यभर रंगारंग कार्यक्रम आयोजित केली जातो.

निजामकाळात चरत चरत भरकटलेल्या काही म्हशी गावकर्‍यांनी आपल्या गोठ्यात बांधल्या होत्या. ही बातमी निजामला मिळताच त्याने म्हशी सोडून आणण्यास आणि गावकर्‍यांना बंदी करण्याचा हुकूम आपल्या सैनिकांना दिला. तेव्हा गावकर्‍यांनी देवीला नवस केला, की आमच्यावर लावलेला आरोप खोटा असून यातून आमची सुटका कर. आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकूण देवीने एका रात्रीतून काळ्या म्हशीचा रंग 'भुरका' केला होता, असे गावकर्‍यांनी सांगितले. तेव्हापासून या गावात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांची विक्री आजपर्यंत केली जात नाही. कोणत्याही प्रकारचे दुध न विकणारे बहुधा हे भारतातील एकमेव गाव असावं.

WD
मध्यप्रदेशातील इंदुर येथे ग्वाल्हेर राजाच्या दरबारात या परिसरातील काही कामगार काम करत होते. राजाला पुत्र नसल्यामुळे तो नेहमी दु:खी असायचा. त्यावर दरबारातील काही कामगारांनी महाराजाला धाडस करून मोहटादेवीला नवस करायचा सांगितला. देवीचा चमत्कार म्हणजे राजाला अनेक वर्षानंतर पुत्र रत्न प्राप्त झाले. त्यानंतर 1907 ते 1951 या काळात आपला नवस पूर्ण करण्यासाठी ते या ठिकाणी आले होते. देवीस चांदीचा पाळणा, चांदीची मूर्ती आणि मंदिर जीर्णोद्धारासाठी त्यांनी मोठी देणगी दिली होती, असे सांगितले जाते.

महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी, श्री क्षेत्र माहुरगडची रेणुका माता स्वयंभू, जागृत व नवसास पावणारी आई जगदंबादेवी म्हणजेच मोहटादेवी होय. हा परिसर श्री भगवान वृद्धेश्वर, श्री भगवान मच्छिंद्रनाथ, श्री भगवान कानिफनाथ, श्री भगवान गहिनीनाथ, श्री भगवान जालिंदरनाथ, श्री. भगवान नागनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे.

WD
हे मंदिर अति उंचावर असून येथे नेहमी विज भारनियमन होत असतं. म्हणून देवस्थानच्यावतीने विजेची कमतरता भासू नये म्हणून 20 कि. वॅटचा पवन उर्जा प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिर सुंदर आणि आकर्षक दिसते. तसेच, भाविकांना विश्रांतीसाठी मोठा सभामंडप असून भक्त निवासाची सोय आहे. रेणुका माता ट्रस्टच्यावतीने रेणुका माता विद्यालय आणि उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधण्यात आले आहे.

WD
देवस्थानच्या चार बसेस भाविकांना ने-आण करण्यासाठी‍ ट्रस्टने उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिर परिसरात वीस हजार औषधोपयोगी वनस्पती आणि विविध जातींच्या झाडांचे वृक्षारोपण केले असल्याचे म‍ंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भालचंद्र भणगे यांनी सांगितले. मंदिराच्या जीर्णोद्धाराचा आराखडा आखण्यात आला असून त्यासाठी लागणारा 15 कोटींची निधी ट्रस्टने जमा केला आहे. हा प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असल्याचेही भणगे यांनी सांगितले.

''दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मोहटे गावानजीक पाझर तलावाचे भूमीपूजन करण्यासाठी आल्या असता देवीचे दर्शन न करताच दिल्लीला परतल्या होत्या. देवीने त्यांना स्वप्नदृष्टांत दिला. तेव्हा मंदिराच्या पायर्‍यांचे बांधकाम चालू होते. त्यासाठी त्यांनी मदत केली होती. असे सांगितले जाते.''

कसे पोहचाल?
रस्ता मार्गे:- अहमदनगर ते मोहटे पाथर्डीमार्गे बसने 70 किलोमीटर अंतर आहे. या ठिकाण‍ी पोहचण्यासाठी सरकारी आणि खाजगी वाहने उपलब्ध असतात.

रेल्वे मार्गे:- अहमदनगर रेल्वे स्टेशन सर्वात जवळ आहे.

हवाईमार्गे:- पुणे विमानतळ अगदी जवळ असून पुणे ते अहमदनगर हे अंतर 180 किलोमीटर आहे. तसेच, मराठवाड्यातील औरंगाबाद विमानतळापासून औरंगाबाद-पैठण-शेवगाव-पाथर्डी मार्गे हे अंतर 110 किलोमीटर आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....