मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

अमंगलांचे होते मंगल - मंगलनाथ

पुराणांनुसार येथे धरतीपुत्र मंगळ ग्रहाचा जन्म झाला होता

धार्मिक यात्रा या सदरात आज आपण उज्जैन येथील मंगलनाथ मंद‍िराची माहिती घेणार आहोत. मध्यप्रदेशाची धार्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या उज्जैन येथे हे मंदिर आहे.

याशिवाय उज्जैन मंगळाची जननी म्हणूनही ओळखले जाते. कुंडल‍ीत मंगळ असलेल्या व्यक्ती शांती आणि पूजा करण्यासाठी येथे  येतात. देशात मंगलनाथाची अनेक मंदिरे आहेत. परंतु, उज्जैन त्यांचे जन्मस्थळ असल्यामुळे येथे केलेली पूजा विशेष महत्त्वाची असते. 

हे अति प्राचीन मंदिर असून शिंदे घराण्याने याची पुनर्स्थापना केली होती. भगवान महाकालेश्वराची नगरी म्हणूनही उज्जैन ओळखले जाते. भगवान मंगलनाथाच्या शिवरूपी प्रतिमेचे पूजन करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी भक्तांची रांग लागलेली असते. मंगळ ग्रहाचा जन्म कसा झाला याची कहाणी अशा प्रकारे आहे.
Shruti WD  

अंधकासुर नावाच्या राक्षसाच्या रक्तापासून अनेक राक्षस जन्म घेतील असे वरदान भगवान शिवाने त्याला दिले होते. शंकराचे वरदान मिळाल्यानंतर अंधकासुराने अवंतिकेत धुमाकूळ घालण्यास सुरवात केली.

त्याच्या त्रासाला कंटाळून लोकांनी शंकराची प्रार्थना केली. तेव्हा शंकराने स्वत: अंधकासुराशी युद्ध केले.

Shruti WD  

दोघांत घनघोर युद्ध चालू असताना शंकराच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. घामाच्या गरम धारांमुळे उज्जैनला तडा गेला आणि ते विभक्त झाले. यामधून मंगळ ग्रहाचा जन्म झाला. शंकराने अंधकासुराचा संहार केला आणि त्याच्या रक्ताच्या थेंबाला मंगळ ग्रहाने आपल्यामध्ये सामावून घेतल्यामुळे मंगळ भूमी लाल रंगाची आहे असे स्कंद पुराणात सांगितले आहे.
ShrutiWD

या मंदिरातील आरती सकाळी सहा वाजता सुरू होते. आरती संपल्यानंतर प्रसादासाठी परिसरातील पोपट मोठ्या प्रमाणात जमा होतात. प्रसाद मिळेपर्यंत तिथेच घिरट्या घालत राहतात. प्रसाद देण्यासाठी थोडासा उशीर झाला तरी ते किलकिलाट करतात, असे पुजारी निरंजन भारती यांनी सांगितले.

पक्ष्यांच्या रूपात स्वत: मंगलनाथ प्रसाद खाण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे. मंगळ ग्रहाला मूलत: मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानले जाते. मंगळ ग्रह असलेल्या व्यक्ती मंगळ शांती विशेष पूजा करण्यासाठी येथे येतात. मार्चमध्ये येणार्‍या अंगारकी चतुर्थीला मंगलनाथाची विशेष पूजा केली जाते. यादिवशी विशेष यज्ञ केला जातो. यावेळी मंगळ ग्रह शांतीसाठी दूर-दूरचे लोक उज्जैनला येतात.
ShrutiWD


मंगलनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर कुंडलीत उग्ररूप धारण केलेला मंगळ शांत होतो अशी श्रद्धा असल्याने प्रत्येक वर्षी हजारो नवदांपत्य मंगळदोष शांती पूजा करण्यासाठी येतात.

उज्जैनला कधी जावे- मंगलनाथ मंदिरात प्रत्येक मंगळवारी भक्तांची रांग लागलेली असते. परंतु, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भव्य देखावा असतो. आपण आपल्या सवडीनुसार कधीही येऊ शकता. येथे प्रत्येक मंगळवारी विशेष पूजा-अर्चना चालू असते.

उज्जैनला कसे जावे-

रस्ता मार्ग - उज्जैन-आग्रा-कोटा-जयपुर मार्गे, उज्जैन-बदनावर-रतलाम-चितोडमार्गे, उज्जैन-मक्सी-शाजापुर-ग्वालियर-दिल्ली मार्गे, उज्जैन-देवास-भोपाळ मार्गे, उज्जैन-धुळे-नाशिक-मुंबईमार्गे.
ShrutiWD

रेल्वे मार्ग- उज्जैनपासून मक्सी-भोपाळ मार्गे (दिल्ली-नागपुर रेल्वे ), उज्जैन-नागदा-रतलाम मार्गे (मुंबई-दिल्ली रेल्वे), उज्जैन-इंदुर मार्गे (मीटरगेज खांडवा रेल्वे), उज्जैन-मक्सी-ग्वालियर-दिल्ली मार्गे

हवाईमार्ग- उज्जैनपासून इंदूर विमानतळ 65 किलोमीटरवर आहे.

राहण्याची व्यवस्था- उज्जैनमध्ये चांगल्या हॉटेलापासून सर्वांना परवडेल अशा धर्मशाळा आहेत. तसेच महाकाल समितीच्या चांगल्या धर्मशाळा आहेत. धर्मशाळेत वातानुकूलित, साध्या खोल्या आणि हॉल उपलब्ध आहेत.