मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By

भारत-पाक सीमेवरचे अनोखे तनोट माता मंदिर

जैसलमेरपासून 130 किमी दूर भारत-पाक सीमेवर 1200 वर्षाचे जुने तनोट माता मंदिर तेथे घडलेल्या चमत्कारांमुळे आज देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. आवड माता मंदिर या नावानेही ते ओळखले जाते. अश्विन व चैत्र नवरात्रीला येथे प्रचंड मोठी यात्रा भरते. बलुचिस्तानातील हिंगलाज मातेचेच हे रूप असल्याचे सांगितले जाते. हिंगलाज माता मंदिर हे देवी सतीच्या 52 शक्तिपीठातील एक स्थान आहे.
 
या मंदिराचे वैशिष्टय़ व महत्त्व जगापुढे आले ते 1965 सालच्या भारत-पाक युद्धानंतर. या मंदिर परिसरात पाकिस्तानने 3000 बाँबचा वर्षाव केला होता मात्र या मंदिराला त्यांचा कोणताही उपसर्ग पोहोचला नाही. इतकेच नव्हे तर मंदिर परिसरात पडलेले 450 हून अधिक बाँब फुटलेच नाहीत. हे बाँब आज मंदिरातील संग्रहालयात जतन करण्यात आले आहेत. या मंदिराची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे व तेथे त्यांची चौकी पण आहे. 

दुसरी घटना म्हणजे 4 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतावर लोंगोवालमधून आक्रमण केले ते स्थान या मंदिराजवळच आहे. पाकिस्तानी रणगाडे या ठिकाणी चाल करून आले तेव्हा लोंगोवाल चौकीवर अवघे 120 जवान होते. मात्र मातेने दिलेल्या शक्तीने सीमा सुरक्षा दल व भारतीय जवानांनी पाकिस्तानी रणगाडय़ांचा धुव्वा उडवून ही भूमी रणगाडय़ांचे कब्रस्तान बनवून टाकली होती. या पराक्रमानिमित्त तनोट माता मंदिरात विजयस्तंभ उभारला गेला आहे. दरवर्षी 16 डिसेंबरला तेथे शहीद जवानांच्या स्मरणार्थ उत्सव साजरा केला जातो. या मंदिराची कहाणी अशी सांगतात, मामडिया नावाच्या एका भाविकाच्या पोटी संतान नव्हते म्हणून त्याने हिंगलाज मातेची 7 वेळा पायी यात्रा केली व देवी मातेला माझ्या पोटी जन्म घे अशी प्रार्थना केली. त्या नंतर या कुटुंबात सात मुली व 1 मुलगा जन्मला. या सातही मुली अतिशय तेजस्वी होत्या व अक्के चमत्कार त्या करत असत. त्यातील एकीचे नाव आवड होते. तिने हुणांचे आक्रमण झाले तेव्हा या तत्कालीन माड प्रदेशाचे संरक्षण केले. तिच्यामुळे या माड प्रदेशात बळकट रजपूत राज्य स्थापन होऊ शकले. तिने स्वत:ची सदेह स्थापना करून घेतली व तेथेच राजा तुणराव भाटी याने मंदिर उभारून देवीला सुवर्णसिंहासन दिले. 828 साली या मंदिरात मूर्ती स्थापन केली गेली.