बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी वाईट टिपले- गज्वी

- खास प्रतिनिधी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर-

WDWD
महाबळेश्वर,पुरस्कारासाठी किंवा प्रसिध्दीसाठी नव्हे तर मला जे दिसले, भावले ते मी लिहित आलो. मी कायम संस्कृतीच्या विरोधात बोलतो अशी ओरड केली गेली पण, समाजातील अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी वाईट टिपले असे सांगत ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी आपली लेखन भूमिका स्पष्ट केली.

समर्थ रामदास व्यासपीठावर आज पहिल्या सत्रात ‘प्रसिध्द लेखकाची मुलाख’ या कार्यक्रमात गज्वी बोलत होते. डॉ. वि. भा. देशपांडे, ऋषीकेश कांबळे व डॉ. शोभा देशमुख यांनी त्यांना बोलते केले.

या मुलाखतीमध्ये गज्वी यांनी घोटभर पाणी, देवनवरी, तनमाजोरी, जय जय रघुवीर समर्थ, गांधी- आंबेडकर या नाटकांमागील लेखनाची भूमिका स्पष्ट केली. प्रश्न पडल्याशिवाय लिहिणे होत नाही आणि मला कायम प्रश्नच पडत गेले. हे प्रश्नही मला विपरीत बाजूंनी पडल्याने समाजातील वास्तव दिसत गेले. मला कायमच वाईट दिसते असा आरोप केला जातो. त्याचे मला काही वाटत नाही. कारण समाजातील अपप्रवृत्ती नष्ट होण्यासाठीच माझा प्रयत्न असतो, अशा शब्दांत त्यांनी आपली लेखनामागील भूमिका मांडली.

दलितांना पूर्वीच्या काळात पाणी मिळत नव्हते. आजही मिळत नाही, याच वस्तुस्थितीवर मी घोटभर पाणी लिहिले. देवदासींच्या प्रश्नावरती हे नाटक लिहिताना स्त्री दु:खाचे भांडवल करायचे नव्हते पण, देवदासींवर बलात्कार होतो ही भयानकता मांडायची होती. दुदैवाने मराठी वाड्मयात चांगल्या अर्थाने व सकारात्मक दृष्टीने चिकित्सा होत नाही. देवनवरी हे नाटक अशा चिकित्सेअभावी मागे पडले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

  डॉ. लागू यांनी प्रेमानंद गज्वी यांच्या किरवंत या नाटकावर प्रतिक्रिया व्यक्त करताना या नाटकाचा लेखक ब्राह्मण असता तर त्याला संपुर्ण देशाने डोक्यावर घेतले असते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.      

गज्वी यांनी वेठबिगारीवरील तनमाजोरी या नाटकाचे संदर्भ सांगताना समाजातील भयावह आर्थिक विषमतेचा उल्लेख केला. शेणामध्ये सापडणा-या धान्यावर जगणा-या समाजाची अगतिकता मांडल्याचे त्यांनी सांगितले. विक्रम गोखले हे ताकदीचे द‍िग्दर्शक असल्याने या नाटकामागची माझी भूमिका रंगमंचावर उतरू शकली, अशी कबुलीही त्यांनी दिली.

'किरवंत' या नाटकात ब्राह्मण समाजातील अस्पृश्य पोटजातीच्या वेदना मांडल्या आहेत. गज्वी यांनी प्रत्येक माणसाच्या मनात ‘किरवं’ दडलेला असतो, जो दुस-याला तुच्छ लेखतो असा चिमटा काढताना ते म्हणाले, डॉ. लागू यांनी या नाटकावर प्रतिक्रिया व्यक्त करताना या नाटकाचा लेखक ब्राह्मण असता तर त्याला संपुर्ण देशाने डोक्यावर घेतले असते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पण, याचा चांगला अनुवाद न झाल्याने हे नाटक मर्यादीत राहिले. स्मशानात काम करणा-या ब्राह्मणाला अस्पृश्यतेची वागणून देणारा ब्राह्मण धर्म आहे का? ते हे तुम्हीच ठरवा अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

जय-जय रघुवीर समर्थ हे नाटक समर्थ संप्रदायातील विचार व आचारांवर टीका करणारे होते. या संप्रदायातील एका अधिकारी व्यक्तीने हे नाटक सुरू रहावे असा सल्ला दिला, त्यामागचे कारण सांगताना ते म्हणाले संप्रदायातील चुकीच्या पध्दती आम्ही बंद करू शकलो नाही ते बंद करण्याचे काम तुम्ही करत आहात त्यामुळे हे नाटक वास्तवाला धरून असल्याचे तो म्हणाला. आता दलित ते बोधी रंगभू‍मी असा प्रवास आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले.