बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

निर्विवाद 'आशा'दायी 'स्वरयात्रा'

WDWD
साहित्यिक 'यादवी' आणि मानापमानाचे प्रयोग यांनी येथील मराठी साहित्य संमेलन वादात बुडाले असताना आशाताईंच्या सुरेल स्वरयात्रेने हे वादही आज काही क्षण विसरायला लावले. साहित्याने आणि साहित्यिकांनी दिलेले देणे स्मरणरंजनातून मांडताना त्यांनी स्वर आणि शब्दांची ओंजळ रसिकांना वाहिली. आपल्या खडतर आयुष्यात साहित्यानेच हसणे शिकवले हे प्रांजळपणे सांगताना साहित्य वाचले गेले नाही, तर ते साहित्य कसे राहिल, हा महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी मांडला.

डॉ. आनंद यादव यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि खुद्द महाबळेश्वरमध्ये मानापमानाचे नाट्य रंगल्यानंतरही आशाताई या संमेलनाला उपस्थित राहिल्या. वादाने ग्रासलेल्या या संमेलनात त्यांनी केलेले भाषण म्हणजे महाबळेश्वरच्या हवेत वार्‍याची जणू मंद झुळूक ठरली. उद्घाटनानंतर आशाताईंनी आयुष्याच्या कडेकडेने झालेला साहित्याचा प्रवास उलगडून दाखवला.

वीरधवल, ना. सी. फ़डके, गो. नि. दांडेकर यांच्यासह अनेक साहित्यिकांनी आपले जगणे सुखकर केल्याचे सांगून त्यांनी वाचनाची आवड जपण्यासाठी काय सोसले हेही सांगितले. वीरधवल यांची पुस्तके वाचताना त्या अगदी गुंगून जात. वेळकाळाचे भानही राहत नसे. एकदा श्री. भोसले (आशाताईंचे पती) आल्यानंतर त्यांनी जोरात मारून आशाताईंची वाचनसमाधी भंग केल्याची आठवण सांगताना श्रोत्यांनाही त्यांच्याच 'भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले'ची अनुभूती आली.

गानकारकिर्द भरात असतानाही कुठलाही साहित्यिक माझ्या नजरेखालून गेला नाही असे झाले नाही, असे सांगून, मुंबईत आल्यानंतर दादर वाचनालयातून पुस्तके आणून मी दाराच्या आतून येणार्‍या किरणांच्या प्रकाशात भीत भीत का होईन पुस्तके वाचली आहेत, असे त्यांनी हसत हसत सांगितले. त्याचवेळी साहित्याचे आणि साहित्यिकांचे महत्त्व अपार आहे हे सांगताना साहित्य वाचले गेले नाही, तर ते साहित्य कसे राहिल, हा त्यांनी मांडलेला मुद्दा आजच्या वादाच्या पार्श्वभूमीवर विचारप्रवर्तक ठरला.

भोसलेंशी लग्न केल्यानंतरही आशाताईंच्या आयुष्यात हसू फुलवले ते चि. वि. जोशींनी. त्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, 'चि.वीं.'ची पुस्तके वाचताना मी जोरजोरात हसायचे. माझ्या सासूबाई बघायच्या आणि म्हणायच्या, आशा, असं भिताड पडल्यासारखं काय हसते. त्यावर त्यांना पुस्तकाविषयी सांगायचे. मग त्या म्हणायच्या, हास बाई हास. माझा मुलगा रोज तुला रडवतुया. निदान आता तरी हास.' हसत राहिलो की सगळ्या गोष्टींवर मात करता येते, हे साहित्याने कळाले, ही आत्मजाणीवही त्यांनी व्यक्त केली.

बरीच वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहूनही आपण मराठी टिकवली ती या साहित्यामुळेच हे सांगताना त्या म्हणाल्या,
हिंदीच्या वातावरणात साठ वर्षे राहिले. तिथे रात्री दोन-दोन पर्यंत कानावर फक्त हिंदीत पडायची. आम्ही घरात आलो की हिंदीत बोलायला सुरवात करायचो. पण तरीही मराठी टिकली. कारण साहित्यिकांनी भरभरून शिकवल्याने आम्ही मराठी बोलतो.

यावेळी आशाताईंनी मराठी काव्य आणि गानविश्व समृद्ध करणार्‍या कविंच्या स्मृती त्यांच्या गाण्यांसह जागविल्या. या कविंच्या दोन ओळींच्या रचनाही गायल्याने रसिक खुष झाले. भा. रा. तांबे, माडगूळकर, शांता शेळके, पी. सावळाराम, खेबूडकर, महानोर, ग्रेस यांच्या आठवणी जागवताना सुरेश भटांचे नाव घेतल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. हिंदीतली मराठी गझल त्यांनी ताकदीने मराठीत आणणारा कवी अशा शब्दांत त्यांनी त्यांचा गौरव केला. ग्रेससारखे कवी नुसत्या कविता लिहित नाहीत, तर विचार करायला लावतात, असे त्या म्हणाल्या. त्यासाठी मंदिरे सुनी सुनी. कुठे ना दीप काजवा. मेघ वाही श्रावणात ये सुगंधी गारवा या ओळी गात त्यांनी त्याचे उदाहरणही दिले.

समारोपाला आल्यानंतर 'मी कवयित्री नाही. लेखिका नाही. माझं चरित्र बाहेर येईल, तेव्हा माझ्यातली साहित्यिक तुम्हा दिसेल.' असं सांगून त्यांनी या स्वरयात्रेची भैरवी केली.

शंकरराव जगताप, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, उल्हास पवार मोहन धारीया, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, फ मू शिंदे, शंकर सारडा, आनंदराव पाटील, कौतिकराव ठाले-पाटील व महामंडळाचे पदाधिकारी, नगराध्यक्ष युसूफ शेख यांनी स्वागत केले. साहित्य परिषद बबनराव ढेबे प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष रामराजे निंबाळकरांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.